राधाबाई,………
यवतमाळ च्या रस्त्यावर भाजी विकणारी एक निरक्षर विधवा महिला. ५ मुली पदरात आणि अठराविश्व दारीर्द्र्य घरात. अचानक एक दिवस इंग्लन्दाहून तिच्याच समाजातील एक माणूस उगवला. त्याची बायको हि नुकतीच देवाघरी गेली होती. समाजातील प्रथे प्रमाणे दुसरे लग्न करणे भाग होते. मग कोणा मध्यस्थाने दिला या दोघांचा पाट लावून.
नवीन नवरा हिला घेऊन बोटीने लंडनला गेला. बरोबर पाचातल्या दोन मुली घेतल्या. बाकीच्यांना नातेवाईकांच्या भरवशावर इथेच ठेवले.तिथे त्याच्या मुलांनी हिला ठेऊन घ्यायला नकार दिला. मग कसाबसा हा अजब संसार चालू राहिला. एक दिवस आकाश कोसळले. थोड्या आजाराचे निमित्त होऊन नवर्याचा मृत्यू झाला. नंतर काही दिवसातच घरातल्यांनी ह्या बाईच्या हातात बोटीची ३ तिकिटे आणि ५० पौंड ठेवले आणि घरा बाहेर काढले. ते हि ऐन हिवाळ्यात.
बाईच्या हाताल धरून दोन लहानग्या मुली, एक वळकटी आणि जेमतेम चार इंग्रजी शब्द .यावर हि अशिक्षित ९ वारी नेसलेली बाई लंडन च्या बर्फात सुन्न होऊन उभी होती. एका जवळ राहणार्या भल्या ज्यू माणसाने तिला घरी नेले आणि कसाबसा संवाद साधत तुला काय येते विचारले. हि म्हणाली “स्वयंपाक”. त्याने हिला आपल्या घरातील मोकळी जागा दिली आणि म्हणाला मग कर स्वयंपाक. तुझ्या देशातले लोक येतील बघ खायला.आणि असा “आजीबाई वनारसे खानावळ ” या लंडन मधल्या खानावळीचा जन्म झाला.
लंडन मध्ये अस्सल मराठी जेवण मिळते हे कळल्यावर त्यांच्याकडे तिथे गेलेल्या मराठी मुलांची आणि कामाला गेलेल्या एकट्या बाप्यांची रीघ लागली, पुढे या बाईंनी कॉट बेसिस वर रहायला जागा द्यायला सुरवात केली, असे होता होता आजीबाईंची खानावळ इतकी प्रसिध्द झाली कि लंडन ला जाऊन त्यांच्याकडे न गेलेला मराठी माणूस मिळायचा नाही.
पुल, अत्रे, यांपासून अनेक मराठी दिग्गज त्यांच्याकडे राहून, जेऊन गेले.
बाई ९ वारी साडी नेसून लंडन च्या मेट्रोने एकट्या प्रवास करीत (शेवट पर्यंत त्या ९ वारी साडीच नेसत होत्या) स्टेशन ची नावे वाचता येत नसत म्हणून कितवे स्टेशन ते विचारून घेत आणि मोजून उतरत.बाई वारल्या तेव्हा त्यांच्या मालकीची लंडन मध्ये ५ घरे होती. लंडन मधला गणेशोत्सव त्यांनी चालू केला. तिथले पहिले देऊळहि त्यांनीच बांधले.त्यांच्या अंतयात्रेला राणीचा प्रतिनिधी म्हणून लंडन चा मेयर हजर होता. आणि सगळ्यात गम्मत म्हणजे त्या शेवटपर्यंत अशिक्षितच राहिल्या. जेमतेम RADHABAI अशी सही करीत.
*तात्पर्य: फक्त शिक्षण व पैसे ह्या बाबी व्यवसाय करण्यासाठी इतक्या महत्वाच्या नाहीत. सर्वात महत्त्वाचे आहेत ते चिकाटीने प्रयत्न करणे, मेहनत घेणे व काहीतरी करून दाखवण्याची जिद्द.*
सलाम राधाबाई !!!
Leave a Reply