आज ११ सप्टेंबर.. सुप्रसिद्ध मराठी कवी आत्माराम रावजी देशपांडे उर्फ कवी अनिल यांची जयंती
कवी अनिल यांचा जन्म ११ सप्टेंबर १९०१ रोजी झाला. कवि अनिलांना मुक्तछंद ह्या काव्यप्रकाराचे प्रवर्तक समजले जाते. तसेच दशपदी १० चरणांची कविता हा काव्यप्रकार अनिलांनी सुरू केला.
भारतीय कलांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी कोलकातायेथे प्रयाण केले. त्यांना अब्रिंद्रनाथ ठाकूर आणि नंदलाल बसू ह्यांचे मार्गदर्शन मिळाले.
त्यानंतर १९३५ साली विधिशाखेची पदवी मिळाली. सनद घेतल्यावर वकिलीचा व्यवसाय केला. त्यांची १९४८ साली मध्यप्रदेश सरकारतर्फे सामाजिक शिक्षण संस्थेचे उप-मुख्याधिकारी म्हणून नेमणूक झाली. १९५६ साली राष्ट्रीय मूलभूत शिक्षण केंद्र, दिल्ली इथे मुख्याधिकारीपदावर व पुढे १९६१ साली भारत सरकारच्या समाज शिक्षण मंडळाचे सल्लागार ह्या पदांवर नेमणुक झाली.
कवी अनिलांना १९७९ ची साहित्य अकादमीची फेलोशिप प्रदान करण्यात आली होती. कवी अनिल हे मराठीत मुक्तछंदाचे प्रवर्तक म्हणून अधिक प्रसिद्ध असले, तरी त्यांनी प्रचलित केलेला ‘दशपदी’ हा काव्यप्रकार देखील तितकाच लक्षणीय आहे. सुनीत ज्याप्रमाणे चौदा ओळींचे असते, तशाच दशपदी कवितेत दहा ओळी असतात. अनिलांच्या दशपदींमध्ये मुख्यतः एखाद्या निसर्गचित्राचे शब्दांकन किंवा मनाच्या भावावस्थेचे चित्रण केले आहे.
कवी अनिल यांचे निधन ८ मे १९८२ रोजी झाले.
संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
कवी अनिल यांची एक कविता
‘तळ्याकाठी’
अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे, मला वाटते,
जिथे शांतता स्वतःच निवारा शोधीत थकून आली असते
जळाआतला हिरवा गाळ निळ्याशी मिळून असतो काही
गळून पडत असताना पान मुळी सळसळ करीत नाही
सावल्यांना भरवीत कापरे जलवलये उठवून देत
उगीच उसळी मारून मासळी, मधूनच वर नसते येत
पंख वाळवीत बदकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो
दूर कोपर्याबत एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो
हृदयावरची विचारांची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते
अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे, मला वाटते!
खूपच छान..
..