नवीन लेखन...

३ फेब्रुवारी – क्रांतिसूर्य उमाजी नाईक यांची पुण्यतिथी !

3 February - Death Anniversary of KrantiSoorya Umaji Naik

प्रत्येक जातीत काही उपजत गुण असतात. त्या गुणांचा फायदा करून घेण्याची समाजाची मानसिकता असली तर समाज निकोप बनतो. रामोशी हि जात सुद्धा त्यातलीच. छत्रपती शिवरायांना प्रत्येक जातीच्या असलेल्या अंगीभूत गुणांची पारख होती.म्हणूनच रामोशी समाजाला त्यांनी फार मोठेपण दिले. अत्यंत धाडशी,काटक,अनेक प्रसंगांना तोंड देण्याची त्याची मानसिकता. धन्यासाठी प्राण देण्याची आणि दुस-याचा प्राण घेण्याची तयारी याचा फायदा शिवरायांनी स्वराज्य निर्मितीसाठी करून घेतला. महाराजांनी महार आणि रामोशी समाजाला जवळ घेतले. त्यांना” नाईक ” हि पदवी प्रदान केली.हेरगिरीसाठी त्यांचा उपयोग करून घेतला. हा समाज सुद्धा महाराजांशी एकनिष्ठ राहिला. कधीही प्रलोभनांना बळी पडला नाही. क्रांतिसूर्य उमाजी नाईक सुद्धा याच समाजातले.

३ फेब्रुवारी ही त्यांची पुण्यतिथी. त्या निमित्ताने त्याची माहिती आणि त्यांच्या कार्याला मनापासून नमस्कार!!!!

मराठेशाहीतील उत्तरार्धात पेशवाई बुडाल्यानंतर हिंदुस्थानावर इंग्रजांचा अंमल सुरु झाला तेव्हा श्रीखंडोबा भक्त उमाजी नाईकने इंग्रजी सत्तेविरुद्ध पहिले बंड पुकारले म्हणून त्यांला आद्य क्रांतिवीर असे म्हणतात. छत्रपती शिवाजी राजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी गनिमी काव्याने लढत इंग्रजांशी झुंज दिली.

नरवीर उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदर किल्ल्याची रखवाली करीत असलेल्या रामोशी-बेरड समाजात लक्ष्मीबाई व दादोजी खोमणे यांच्या पोटी ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या भिवडी गावामध्ये झाला. उमाजी जन्मापासूनच हुशार,चंचल,शरीराने धडधाकट,उंचपुरा,करारी त्यामुळे त्याने पारंपारिक रामोशी हेरकला लवकरच आत्मसात केली होती.जसा उमाजी मोठा होत गेला तसा त्याने दादोजी नाईक यांच्याकडून दांडपट्टा, तलवार, भाते, कु-हाडी, तीरकामठ, गोफणी चालवण्याची कला अवगत केली. या काळात इंग्रजांनी हिंदुस्तानात आपली सत्ता स्थापन करण्यास सुरवात केली. हळू हळू मराठी मुलुख हि जिंकत पुणे ताब्यात घेतले. १८०३ मध्ये पुण्यात दुस-या बाजीराव पेशव्यास स्थानपन्न केले आणि त्याने इंग्रजी पाल्य म्हणून काम सुरु केले. सर्वप्रथम त्याने इतर सर्व किल्ल्याप्रमाणे पुरंदर किल्ल्याचे संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडून काढून घेऊन आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले. त्यामुळे रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली. जनतेवर इंग्रजी आत्त्याचार वाढू लागले. अशा परिस्थतीत करारी उमाजी बेभान झाला. छत्रपती शिवरायांना श्रद्धा स्फूर्तीचे स्थान देत त्याने त्यांचा आदर्श घेऊन स्वताच्या आधीपात्त्याखालील स्वराज्याचा पुकार करत माझ्या देशावर परकीयांना राज्य करू देणार नाही, असा पण करत विठुजी नाईक, कृष्ण नाईक, खुशाबा रामोशी, बाबू सोळंसकर यांना बरोबर घेऊन कुलदैवत जेजुरीच्या श्रीखंडेरायला भंडारा उधळत शपथ घेतली व इंग्रजांविरोधात पहिल्या बंडाची गर्जना केली.

इंग्रज, सावकार, मोठे वतनदार अशा लोकांना लुटून गोरगरिबांना आर्थिक मदत करण्यास सुरवात केली. कोणत्याही स्त्रीवर अत्याचार, अन्याय झालाच तर तो भावासारखा धावून जाऊ लागला. इंग्रजांना त्रास दिल्यामुळे उमाजीला १८१८ ला एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सरकारने दिली. परंतु तो काळ सत्कारणी लावत त्याने त्याकाळात लिहिणे वाचणे शिकले. आणि सुटल्यानंतर इंग्रजांविरुद्धच्या कारवाया आणखी वाढवल्या. उमाजी देशासाठी लढत असल्याने जनताही त्याला साथ देऊ लागली आणि इंग्रज मेटाकुटिला आले.

उमाजीला पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी मॉकिनटोष याने क-हेपठारच्या मामलेदारास फर्मान सोडले. मामलेदार इंग्रज सैन्य घेऊन पुरंदरच्या पश्चिमेकडील एका खेड्यात गेला असता तेथे त्यांच्यात आणि उमाजीच्या सैन्यात तुंबळ युद्ध झाले आणि इंग्रजांना पराभव स्वीकारावा लागला. उमाजीने पाच इंग्रज सैन्याची मुंडकी कापून मामलेदाराकडे पाठवली. त्यामुळे इंग्रज चांगलेच धास्तावले. उमाजीचे सैन्य डोंगरात टोळ्या करून राहत असत एका टोळीत जवळ जवळ पाच हजार सैन्य होते.

१८२४ ला उमाजीने भांबुर्डा येथील इंग्रज खजिना लुटून तो देवळाच्या देखभालीसाठी जनतेला वाटला होता. ३० नोव्हेंबर १८२७ ला इंग्रजांना त्याने ठणकावून सांगितले कि,आज हे एक बंड असले तरी असे हजारो बंड सातपुड्यापासून सह्याद्रीपर्यंत उठतील व तुम्हास जेरीस आणतील,फक्त इशारा देऊन न थांबता त्याने इंग्रजांना सळो कि पळो करून सोडले.२१ डिसेंबर १८३० ला उमाजीनी आपला पाठलाग करणा-या इंग्रज अधिकारी बोईड आणि त्याच्या सैन्याला मांढरदेवी गडावरून बंदुका, गोफणी चालवून घायाळ करून परत पाठवले होते.आणि काहीचे प्राण घेतले होते.

१६ फेब्रुवारी १८३१ रोजी इंग्रजी सत्तेविरुद्ध एक जाहीरनामाच त्याने प्रसिद्ध केला त्यात नमूद केले होते,इंग्रजी नोक-या सोडाव्यात. देशवासीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी गोंधळ घालावा आणि इंग्रजांविरुद्ध अराजकता माजवावी. इंग्रजांचे खजिने लुटावेत, इंग्रजांना शेतसारा,पट्टी देऊ नये. इंग्रजांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार आहे. त्यांना कोणीही मदत करू नये तसे केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करेल. असे सांगून एकप्रकारे त्याने स्वराज्याचा पुकारच केला होता. तेंव्हापासून उमाजी जनतेचा राजा बनला. या सर्व प्रकारामुळे इंग्रज गडबडले आणि त्यांनी उमाजीला पकडण्यासाठी युक्तीचा वापर केला. मोठे सावकार,वतनदार यांना आमिषे दाखवण्यात आली उमाजीच्या सैन्यातील काहीना फितूर करण्यात आले.त्यातच उमाजीने एका स्त्रीचे अपहरण केले म्हणून हात कलम केलेला काळोजी नाईक इंग्रजांना जाऊन मिळाला. इंग्रजांनी उमजीची माहिती देणा-यास १० हजार रुपये आणि चारशे बिघे जमीन बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली. तसेच नाना चव्हाण हि फितूर झाला आणि त्यांनी उमाजीची सर्व गुप्त माहिती इंग्रजांना दिली.

१५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील उतरोली या गावी रात्री बेसावध असताना उमाजीला इंग्रजांनी पकडले. त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला आणि पुण्यात मामलेदार कचेरीतील एका काळ्या खोलीत ठेवण्यात आले अशा या खोलीत उमाजी असताना त्याला पकडणारा इंग्रज अधिकारी मॉकिनटोष दररोज महिनाभर त्याची माहिती घेत होता. त्यानेच उमाजीची सर्व माहिती लिहून ठेवली.

नरवीर उमाजीस न्यायाधीश जेम्स टेलर याने दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. ३ फेब्रुवारी १८३२ ला पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४१ व्या वर्षी देशासाठी सर्वप्रथम नरवीर उमाजी नाईक हसत हसत फासावर चढला. अशा या उमाजीचे प्रेत इतरांना दहशत बसावे म्हणून कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते.

— चिंतामणी कारखानीस

चिंतामणी कारखानीस
About चिंतामणी कारखानीस 75 Articles
चिंतामणी कारखानीस हे ग्राहक संरक्षण सेवा समिती या संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष होते. त्यांना या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल २०१० चा Consumer Awareness Award हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे ते माजी अध्यक्ष आहेत. विविध वृत्तपत्रांत व मासिकांत त्यांचे लेख प्रकाशित झाले असून आकाशवाणीवर भाषणेही प्रसारित झाली आहेत. ते शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रवक्ते आहेत.

2 Comments on ३ फेब्रुवारी – क्रांतिसूर्य उमाजी नाईक यांची पुण्यतिथी !

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..