नवीन लेखन...

अडचणीचे `हिंदुत्व’

येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपने `हिंदुत्व’चा मुद्दा बाजूला ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपचे नेते आणि पंतप्रधानपदाचे इच्छुक उमेदवार नरेंद्र मोदी यांनी `मी फक्त हिंदूंचा नेता नाही’, असे जाहीरपणे सांगितले होते. त्यानंतर भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह यांनीही `हिंदुत्व हा भाजपसाठी निवडणूक मुद्दा असणार नाही’, असे स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वी हरिद्वारमध्ये मोदी यांनी सर्वांच्या कल्याणाची भाषा केली होती. मोदींच्या पावलावर पाऊल ठेवत भाजप आता पुढे जाणार असे दिसत आहे. तसे संकेत राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी दिले आहेत. ‘आमची विचारधारा विकासाचीच आहे. त्याच मुद्यावर आम्ही निवडणुका लढणार आहोत. हिंदुत्व ही एक जीवनशैली आहे. धर्म आणि जातीशी त्याला जोडता येणार नाही, हिंदुत्व हा निवडणूक प्रचाराचा मुद्दा असू शकत नाही आणि आम्ही तसे करणारही नाही.’ असे राजनाथ सिंह यांनी जाहीर केले आहे. भाजपने हिंदुत्वाची तलवार म्यान करण्याचे ठरवले आहे, हे योग्य झाले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी आता राम मंदिराचाही अट्टहास सोडावा. खरेतर रामाच्याऐवज़ी शंबूकाचे मंदिर बांधणे अधिक चांगले होईल. वर्णभेदाविरुद्ध बंड करणारी पहिली व्यक्ती म्हणून शंबूकाचे मानाचे स्थान आहे. या मागणीस 70 टक्के लोकांचा पाठिंबा मिळू शकतो. हिंदुत्व हा धर्म किंवा समाज कधीही नव्हता. हिंदुत्व ही केवळ एक जीवनशैली आहे. ही जीवनशैली मानणारे अनेक समूह आहेत. ते वेगवेगळ्या देवदेवतांना पूजतात. इतकेच नव्हे, तर ही जीवनशैली अंगीकारणार्यांना देवाची पूजा करण्याची कोणतीही सक्ती नसते. त्यामुळे तांत्रिकदृष्टय़ा हिंदुत्व हा धर्म मानता येत नाही. जिथे सर्व लोकच एक कायदा आणि एका नियमाचे पालन करतात, विशिष्ट देवालाच भजतात, त्यांनाच समाज किंवा धर्म म्हणता येऊ शकते. एकसंध समाजाची ही व्याख्या केवळ मुस्लिम आणि ख्रिश्चनांना लागू होते. `हिंदू’ हा शब्द भौगोलिक अस्तित्व दाखवण्यापुरता मर्यादित होता. `हिंदू’ ही संज्ञा `सिंधू’ या भौगोलिक कारणावरून अस्तित्वात आली. 1857 च्या उठावानंतर जो महाप्रचंड हाहाकार माजला, त्यात इंग्रजांनी सुरुवातीला मुसलमानांना मिळेल तेथे ठेचण्याचा घाट घातला आणि त्याचवेळी त्यांचे लांगूलचालनही सुरू केले. त्यातून स्वकीय दुखावले गेले आणि अस्मितेचा जन्म झाला. त्याला अलीकडे `हिंदुत्व’ वगैरे म्हणतात आणि जे आज विनाकारण अस्तित्वात आहे. `मुस्लिम’ वा `ख्रिस्ती’ या संज्ञा उपासनापद्धती दर्शवतात तशी `हिंदू’ ही संज्ञा उपासनापद्धती दर्शवत नाही. चार्वाकासारखा नास्तिकही हिंदू असतो आणि शंकराचार्यही हिंदूच असतात. हिंदू म्हणजे, ज्ञात इतिहासात आक्रमण करून इथे न आलेली, म्हणजे इथेच वसणारी जमात. या पलीकडे या संज्ञेला काही अर्थ सापडत नाही. आगामी निवडणुकीसाठी `सुशासन संकल्प ः बीजेपी विकल्प’! अशी भाजपाची घोषणा आहे `सुशासना’चे उदाहरण म्हणून गुजरातचे नाव पुढे करून मोदींना स्वीकारार्हता मिळावी याची धडपड केली जात आहे. निवडणुकीपुरते हिंदुत्व गुंडाळून ठेवण्याची भाजपाची खेळी असून `हिंदुत्वा’चा जप करण्यापेक्षा सर्व समाजघटकांमध्ये स्वीकारार्हता मिळविणे अधिक उपयुक्त आहे एवढे शहाणपण भाजपापाशी नक्कीच आहे. यासाठी मग हिंदुत्व आणि सुशासन या दोन्हींचा चेहरा असलेल्या मोदी यांना बाशिंग बांधून बोहल्यावर चढविण्याचा घाट घातला जात आहे. आगामी निवडणुकीत जेथे हिंदुत्व अडचणीचे ठरत असेल तेथे सुशासनाचा मुद्दा पुढे रेटायचा आणि जेथे सुशासनाचा मुद्दा तितकासा प्रभावी ठरणार नाही, तेथे हिंदुत्वाचा वापर करायचा अशी एकंदर रणनीती भाजपा राबवणार आहे असे दिसते. `रालोआ’ला `विशाल ‘ बनविण्याच्या प्रयत्नात कोणत्याही घटक पक्षाशी वैचारिक संघर्ष टाळण्यासाठी भाजप प्रयत्नशील असून , हिंदुत्ववादी अजेंडय़ातले सर्व वादग्रस्त विषय बाजूला ठेवण्याबाबत विचार सुरू आहे. आघाडीतल्या संभाव्य बिगर – काँग्रेस पक्षांसाठी लवचिक भूमिका स्वीकारून तयार केलेल्या आराखडय़ात प्रादेशिक अस्मितेच्या सन्मानाला विशेष महत्त्व देण्यात येणार आहे. `विशाल एनडीए’साठी भाजपची नजर तृणमूल काँग्रेस, बिजू जनता दल, अण्णाद्रमुक, तेलुगू देसम पार्टी, तेलंगणा राष्ट्र समिती, आसाम गण परिषद, चौटालांचा इंडियन नॅशनल लोकदल आणि ईशान्य भारतातील स्थानिक छोटे पक्ष यांच्यावर आहे. आपल्या देशात सेक्युलॅरिझमची व्याख्या नेमकेपणाने करण्यात आलेली नाही. सेक्युलॅरिझम ही एक टोपी आहे, ती टोपी जो आपल्या डोक्यावर घालतो तो ती आपल्या डोक्यावर फिट बसते, असा दावा करतो. म्हणजे आपल्या देशातल्या अनेक संघटना आणि राजकीय पक्ष आधी स्वतःला सेक्युलर म्हणवतात आणि आपण धर्माच्या संबंधात जो आणि जसा व्यवहार करतो तो व्यवहार म्हणजे सेक्युलॅरिझम असा दावा करतात. एका बाजूला सेक्युलॅरिझमची अशी ओढाताण सुरू असते, तर दुसर्या बाजूला हिंदू आणि हिंदुत्व यांच्या बाबतीतही असाच प्रकार सुरू असतो. हिंदुत्व हा धर्म नसून जीवन प्रणाली आहे असे कितीही म्हटले जात असले, तरीही या जातीयवादी संघटनांना हिंदुत्वात अभिप्रेत असलेला धर्म हिंदू धर्मच असतो. हिंदू असणे आणि हिंदुत्ववादी असणे यात फरक आहे. भाजपाचा मात्र सगळ्या हिंदूंनी हिंदुत्ववादी असावे असा छुपा आग्रह असतो. त्यांनी आता सत्तेसाठी आपला आग्रह गुंडाळून ठेवल्याचे दिसते. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही हेच खरे !

– भगवान निळे

— भगवान निळे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..