त्यांचा जन्म १० फेब्रुवारी १८०३ रोजी झाला. मुंबईच्या १९ व्या शतकातील इतिहासाचे प्रणेते म्हणून मा. नाना शंकरशेट यांना ओळखले जाते. जगन्नाथ शंकरशेट यांचे खरे नाव नाना मुरकुटे. मुरकुटे कुटुंब हे मुळातच सधन. नानांचे एक पूर्वज बाबूलशेट हे कोकणातून १८ व्या शतकात मुंबईत आले.
म्हैसूरच्या १७९९ च्या टिपू-इंग्रज युद्धात वडिलांना खूप पैसा मिळाला. आई भवानीबाई नानांच्या लहानपणीच वारली. नानांनी तिच्या स्मरणार्थ पुढे भवानी शंकर मंदिर व एक धर्मशाळा गोवालिया तलावाजवळ बांधली. वडील गेल्यावर तरुणपणीच त्यांच्यावर प्रपंचाची व व्यापाराची सर्व जबाबदारी पडली. मा.नाना शंकरशेट हे त्या शतकातील मुंबईच्या प्रमुख व्यापाऱ्यांमध्ये गणले जात. नानांनी आपला व्यापार इतका पद्धतशीरपणे वाढवला, की त्यांनी अल्पावधीत प्रचंड पैसा मिळवला. तोही सचोटीने आणि आपली विश्वासार्हता कायम राखून. त्यांचे नाव आणि त्यांची विश्वासार्हता एवढी पक्की होती, की अरब, अफगाण आणि अन्य परदेशी व्यापारी बँकांकडे आपली संपत्ती ठेवण्याऐवजी नानांकडे ठेवत असत, असे म्हटले जाई. १९ व्या शतकाच्या मध्यापर्यंत मुंबईतील असे एकही क्षेत्र नव्हते ज्यावर मा.नानांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटला नाही. समाजकारण, समाज सुधारणा, प्रशासन, विकास, धार्मिक रुढी अशा सर्व क्षेत्रांत नानांनी भरीव कामगिरी बजावली. नानां त्यांवर सर जमशेटजी जिजिभाईंची छाप पडली होती. हिंदवासियांत शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे, यासाठी एल्फिन्स्टनने १८२२ मध्ये हैंदशाळा व शाळापुस्तक मंडळी काढली, त्यांचे आधारस्तंभ नानाच होते. ही पहिली शैक्षणिक संस्था स. का. छत्रे यांच्या साह्याने स्थापिली. पुढे हिचे १८२४ मध्ये बाँम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीत रूपांतर झाले.
एल्फिन्स्टननंतर उच्च शिक्षणाच्या सोयीसाठी ४,४३,९०१ रुपयांचा एल्फिन्स्टन फंड जमविण्यात आला. त्याचे नाना हे विश्वस्त राहिले. या संस्थेचे एल्फिन्स्टन कॉलेज झाल्यावर (१८३७) तिला एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट म्हणण्यात येऊ लागले. १८५६ मध्ये महाविद्यालय व विद्यालय पृथक झाले.बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना १८४१ मध्ये झाली. बोर्डातील तीन एतद्देशीय सभासदांत सतत सोळा वर्षे नाना निवडून आले. १८५५ मध्ये त्यांनी विधी महाविद्यालयाचा पाया घातला. सर ग्रँटच्या मृत्यूनंतर ग्रँट मेडिकल कॉलेजची १८४५ मध्ये स्थापना करून येथे आंग्ल वैद्यक-शिक्षणाची सोय त्यांनी केली.
मुंबई कायदे मंडळाच्या आरंभीच्या सभासदांत ते प्रमुख होते. नानांचे सामाजिक कार्यही मोठे होते. त्यांनी सतीच्या चालीस बंदी घालणाऱ्या कायद्यास पाठिंबा दिला. सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे, या तत्त्वावर स्त्रीशिक्षणास प्राधान्य दिले. भारतीयांना कलाशिक्षण मिळावे, म्हणून सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या स्थापनेत सक्रिय भाग घेतला. याशिवाय ग्रँड ज्यूरीत भारतीयांचा समावेश व्हावा, तसेच जस्टिस ऑफ द पीस अधिकार भारतीयांस मिळावा, यासाठी त्यांनी खटपट केली व काही अधिकार मिळविले. मुंबईच्या प्रशासनात कार्यरत असताना त्यांनी आरोग्यव्यवस्था, विहिरी, तलाव वगैरे योजना अंमलात आणल्या. गँस कंपनी सुरू केली; धर्मार्थ दवाखाना काढून तसेच पुढे जे. जे. हॉस्पिटलचा पाया घालून त्यांनी रुग्णसेवेस चालना दिली. बाँबे स्टीम नॅव्हिगेशन कंपनीची स्थापना, मुंबई-ठाणे रेल्वेचा प्रारंभ, नाटकांचे प्रेक्षागृह, सोनापूरच्या स्मशानभूमीचे रक्षण याही गोष्टींचे श्रेय नानांनाच द्यावे लागेल. विशेष म्हणजे बोरीबंदर ते ठाणे पहिली रेल्वेगाडी १८५३ मध्ये धावली, तिचे कार्यालय नानांच्या राहत्या घरातच होते. मा.नाना आणि गिरगाव यांचे नाते नानांच्या अंतापर्यंत अतूट राहिले. गिरगावचा नानांनी अक्षरश: कायापालट केला. गिरगावातला नानांचा वाडा आज अस्तित्वात नाही, त्याजागी आता आधुनिक वास्तू उभी आहे. पण या जुन्या वाडय़ाचा इतिहास, त्या वाडय़ाला भेट दिलेली महनीय मंडळी, नानांचे देवघर, दिवाणखाना आणि दारावरची घंटा आणि तिचा नाद या सर्वाना कालपरवापर्यंत दंतकथांचे स्वरूप होते. मा. नानांच्या निधनानंतर मा.नानांच्या स्मरणार्थ मॅट्रिकला संस्कृत विषयात पहिल्या येणाऱ्या विद्यार्थास शंकरशेट शिष्यवृती देण्यात येऊ लागली. मा.नाना शंकरशेट यांचे ३१ जुलै १८६५ निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
Leave a Reply