त्याचा आईचा फोन आला, तू बाप झाला, मुलगी झाली आहे. हि आनंदाची बातमी कळताच तो तडक दिल्लीला निघाला. दुसर्या दिवशी सकाळीच आपल्या नवजात परीला बघायला तो बी एल कपूर हॉस्पिटल वर पोहचला.
त्याला बघताच बायकोच्या चेहर्यावर मंद स्मित पसरले, तिने पाळण्याकडे इशारा केला. पाळण्यात ती चिमुकली परी शांत झोपलेली होती. त्याने अलगद त्या चिमुकल्या परीला उचलले. अचानक त्याला हसू आले. असे हसता काय, बायकोने विचारले. तो हसतच म्हणाला कशी डोळे वटारून पाहते आहे अगदी तुझ्या सारखी. आता तुला मैत्रीण मिळाली, तुम्ही दोघी मिळून माझ्या डोक्यावर किती मिरे वाटणार या कल्पनेनेच मला हसू आले. बायको म्हणाली, तुमच्या जिभेला काही हाड… ‘नाहीच आहे, हो न परी‘, म्हणत तो जोरात खळखळून हसला. त्याचा आयुष्यातला सर्वात मोठा आनंदाचा क्षण.
तो बेंच वर वार्डच्या बाहेर बसला होता. एक वयस्क बाई त्याच्या शेजारी येऊन बसली. तिने त्याला विचारले, क्या हुआ ‘काके‘. ‘लक्ष्मी आई है घर में’, तो उतरला. ते ऐकून तिचा चेहरा काळवंडला, त्याच्या पाठीवर हात फिरवत सांत्वन करत म्हणाली, चिंता मत कर काके, अगली बार लड़का होगा. तिचे सांत्वन करणारे शब्द ऐकून त्याचे डोके सटकले ‘मला मुलगी झाली, मी खुश आहे, हिला कशाचे दुःख‘. चांगले सुनावले पाहिजे हिला. पण तो थबकला. दोन दिवस अगोदरच त्या बाईच्या मुलीला, मुलगी झाली होती. अद्याप हि सासरहून कुणी ही भेटायला आले नव्हते, तिचा नवरा सुद्धा.. ..
(काके = पोरा (मुलगा))
Leave a Reply