आला आला पाऊस आला…मला भिजवून ओलेचिंब करून गेला…असे मनातल्या मनात गुणगुणत असेल ती उन्हाने लाही लाही झालेली आपली धरणी माता. जगभरातील शेतकरीच नव्हे तर प्रत्येक माणूस पावसाची, पावसाळा सुरू होण्याची चातकासारखी वाट पाहत असतो. त्याच्या आगमनाला जरा जरी उशीर झाला तरी शेतकर्यांसह सर्वांचाच जीव कासाविस होतो. पहिल्या पावसात सारेच भिजण्यासाठी आतूर असतात. काहींना तर पावसात भाजण्याचा जणू छंदच असतो अस म्ह्टल तर ते वावग ठरणार नाही. फक्त पावसावर आपल्या देशात वेगवेगळ्या भाषेतील कवींनी हजारो कविता लिहलेल्या आहेत. पावसाळ्यात कदाचित कविंना निसर्गता काव्य स्फुरत असावे. मुंबईतील पाऊस हा देशातील इतर भागातील पावसापेक्षा निश्चितच वेगळा असतो कारण मुंबईतील पाऊस सर्वांनाच हवा असतो पण त्यामुळे निर्माण होणार्या अडचणी आणि खोळंबे सर्वांनाच नको असतात. मुंबईकर पावसात काय करावे याची फक्त स्वप्नेच रंगवत असतात जी स्वप्ने प्रत्यक्षात कधीच पूर्ण होत नाहीत. मुंबईकर जवळ छत्री असताना विचार करतो ,’’ आज मस्त पावसात रस्त्यावरून पायपीठ करू या ! पण दुसर्याच क्षणाला त्याला रस्त्याखालून जाणार्या एखादया गटारावरील झाकण निघालेले दिसते अथवा त्यातून गटाराचे पाणी बाहेर रस्त्यावर वाहताना दिसते मग तो रस्त्यावरून चालण्याचा विचार सोडून निमूट रिक्षा नाही तर टॅक्सी पकडतो. हल्ली मुंबईत जागोजागी सरकारी उद्याने निर्माण केलेली आहेत त्यात हिरवळ बर्यापैकी आहे. पण पावसाळ्यात तेथे जावून पावसाचा आनंद लुटण्याचा विचार कोणी करणार नाही कारण या उद्यानात असणार्या बसण्याच्या बाकावर छप्पर नाही आणि जेथे छप्पर असते तेथे बसायला बाके नसतात पावसाळयात खाली बसने कोणालाही प्रशस्त वाटत नाही. पावसाळ्यात मुंबईकरांना आवडतात ते ही खासकरून तरूणांना ती म्ह्णजे अलिशान मॉल बाहेरील अलिशान बसस्टॉप कारण तेथे बसून आरामात पाऊस पाहता येतो. रस्त्यावरून भिजत चालणारी लोक पाहता येतात. जवळ छत्री असतानाही पावसात भिजण्याचा आनंद लुटणार्यांचा आनंद थोडा उसना घेता येतो. बाजूलाच असणार्या टपरीवरून भजी विकत घेऊन खाण्याचा आनंद ही मिळविता येतो. जेथे भजी असणार तेथे चहा कॉफी ही असणार म्ह्णजे दुग्ध शर्करा योगच तयार होतो. त्यात त्याच बसस्टॉपवर बसून तरूण तरूणींना पाऊस पाहत गळ्यात गळे घालून मनसोक्त गप्पा ही मारता येतात. मोबाईल हे एकमेव उपकरण आहे जे मुंबईकरांच्या पावसात भिजून आनंद लुटण्यावर मर्यादा घालत. त्यामुळे बर्याचदा मुंबईकर मोबाईल गाडीत ठेवून पावसात भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी मुंबईच्या बाहेर जातात आणि कधी – कधी आपल्या जीवावरच संकट ओढावून घेतात. मुंबईत मुसळ्धार पाऊस कोसळ्त असताना बर्याच गाडया रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दिसतात ज्यात बसून त्यातील माणसे बंद काचेतून बाहेर कोसळ्णार्या पावसाचा आनंद घेत असतात. पावसात न भिजताही पावसाचा आनंद कसा उपभोगायचा याचे तंत्र कदाचित त्यांनी औगत केलेले असते. पावसात भिजल्यामुळेच आपण आजारी पडू ही भिती मुंबईकरांना सर्वाधिक व्यतीत करीत असते त्यामुळे त्यांना छत्री ओझ वाटत असतानाही ते तिला सोबत वाह्त असतात. पण त्याला तिची काळजी अजिबात नसते तो तिला कोठे ही विसरतो, त्यामुळे मुंबईकरांना प्रत्येक पावसाळ्यात नवी छत्री लागते…
— निलेश बामणे
Leave a Reply