22 ऑगस्ट 1896 हा दिवस कुमार श्री रणजितसिंहांसाठी अत्यंत संस्मरणीय ठरला. प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये दोन्ही डावात शतके काढण्याचे पराक्रम इंग्लिश जनतेला नवीन नव्हते पण एकाच दिवशी दोन्ही डावांत शतके? रणजींनी हा अचाट पराक्रम या दिवशी करून दाखविला.
होवमधील काऊंटी ग्राऊंडवर 20 ऑगस्ट या दिवशी यॉर्कशायरच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. 407 धावांचा डोंगर यॉर्कशायरने उभारला. दुसर्या दिवशी संध्याकाळी ससेक्सने 2 बाद 23 धावा केल्या होत्या. रणजितसिंहजी आणि त्यांचा साथीदार प्रत्येकी शून्य धावांवर खेळत होते. तिसर्या दिवशी वैयक्तिक 100 धावांवर रणजी बाद झाले. ससेक्सचा डाव 191 धावांवर संपला. फॉलोऑननंतरच्या डावात रणजींनी पुन्हा एकदा शतक केले. या खेपेला मागच्यापेक्षा 25 धावा जास्त आणि नाबाद! सामना तीनच दिवसांचा होता. तो अनिर्णित राहिला. सांगण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे या सामन्यात पंचके होती – अर्थात आज ज्याला ‘षटक’ म्हटले जाते ते षटक या सामन्यात 5 वैध चेंडूंचे मिळून बनलेले होते. षटक आणि पंचकाच्या संदर्भात इथे कविवर्य ग्रेस यांची एक ओळ उद्धृत करावीशी वाटते. ते म्हणतात ‘भाषाच ही निकामी शब्दासही पुरेना, संवेदनाच द्यावी अर्थास काय पुन्हा’!
22 ऑगस्ट 1992. कोलंबोच्या सिंहलीज स्पोर्ट्स क्लबवरील श्रीलंका-ऑस्ट्रेलियादरम्यानचा 1992च्या मालिकेतील पहिला कसोटी सामना. ऑस्ट्रेलिया 256 आणि 471. श्रीलंका 547 आणि आता केवळ 181 धावांचे आव्हान. दुसरा गडी संघाच्या 79 धावांवर बाद झाला. ऑफस्पिनर क्रेग मॅथ्यूज आणि वेगवान गोलंदाज क्रेग मॅक्डरमॉटच्या गोलंदाजीच्या जोरावर यजमानांची स्थिती 7 बाद 147 अशी झाली. आता 3 गडी शिल्लक आणि 34 धावांची गरज. प्रमोदया विक्रमसिंघे, डॉन अनुरासिरी आणि रंजिथ मदुरासिंघे यांना एकाच गोलंदाजाने बाद केले – अनुक्रमे 2, 1 आणि 0 धावांवर. श्रीलंका सर्वबाद 164. 16
धावांनी कांगारूंचा अविस्मरणीय विजय. ‘तो’
गोलंदाज – 31 चेंडू, 3 षटके निर्धाव, 11 धावा आणि 3 बळी! या गोलंदाजाचा हा केवळ तिसरा कसोटी सामना होता आणि या सामन्याआधी त्याच्या नावावर केवळ 1 कसोटी बळी होता. शेन कीथ वॉर्नचे आगमन आता गाजणार होते!
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply