ओट्स, सीरियल्स, ऑलिव्ह तेल, किवी आदी पदार्थाचे गुण काय आहेत, याचा बराच गवगवा केला जातो. परंतु त्यांचे दोष काय, हे कधीच सांगितले जात नाही.
सफरचंदाने होणारा मलावरोध आणि मलावरोधजन्य विकृती, शरीरात वाढणारे शीतत्व व शीतत्वजन्य विकार, किवीच्या आंबटपणामुळे होणारे घशाचे विकार, ओट्समुळे मंदावणारी आतडय़ाची पुर:सरण गती, पचनाचे विकार व मलावरोध, ओट्समधील फायटिक अॅसिडमुळे आतडय़ांमधून कॅल्शिअम, जस्त व लोहाच्या शोषणामध्ये येणारा अडथळा, ब्रेकफास्ट सीरियल्समुळे स्थूलत्व आणि स्थूलत्वजन्य अनेक विकृतींचा धोका, शरीरात वाढणारा कोरडेपणा व रूक्षत्वजन्य विकृती, बदामामुळे होणारी कठीण मलप्रवृत्ती, ऑलिव्ह तेलामुळे होऊ शकणारे पित्तविकार- या सर्व आरोग्यसंकटांकडे भारतीयांनी काणाडोळा करावा काय?
आपल्या उत्पादनांचे ढोल पिटताना या अन्नपदार्थाचे हे आरोग्यधोके का सांगितले जात नाहीत?
हा प्रश्न केवळ आपल्या आरोग्यापुरताच मर्यादित नाही, तर त्याला आर्थिक पलूसुद्धा आहे. २०१५-१६ या वर्षांत परदेशी सफरचंदे खरेदी करण्यासाठी भारताला तब्बल १७५५ कोटी रुपये मोजावे लागले. या वर्षी ऑलिव्ह तेलाची भारताची खरेदी १३,५०० टनांवर जाईल अशी अपेक्षा आहे. ऑलिव्ह तेलाच्या लीटरमागे अगदी वीस टक्के- म्हणजे २०० रुपये फायदा आहे असे गृहीत धरले तरी १३,५०० टन तेल विकले गेल्यास दोन अब्ज सातशे कोटी रु. इतका फायदा विक्रेत्यांना होईल.
आजमितीस भारतीयांना एक कोटी १७ लाख टन खाद्यतेल लागते. त्यातला केवळ ०.१ टक्क्याहून कमी वाटा ऑलिव्ह तेलाचा आहे; जो वाढविण्यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न केले जात आहेत.
भारतीयांना ज्याची गरज नाही अशा ऑलिव्ह तेलाचा आपल्या खाद्यतेलांच्या सेवनातील हा वाटा जर दहा टक्क्यांवर गेला तर परकीय देशांना त्यातून होणाऱ्या नफ्याचा आकडा किती प्रचंड असेल याची कल्पनाच केलेली बरी.
सकाळचा नाश्ता, रोजच्या जेवणासाठी लागणारे खाद्यतेल, जेवणातील प्रमुख धान्य, भाजी, फळे, सुकामेवा असे सगळेच अन्नपदार्थ जर आपण अमेरिका व युरोपमधून आयात करणार असू, तर त्याचा आपल्या देशाचा आर्थिक ताळेबंद आणि एकंदर आíथक स्थर्यावर काय व किती विपरीत बोजा पडेल याची कल्पनासुद्धा करता येणार नाही.
परकीय खाद्यान्नातून देशाचे होणारे हे आíथक नुकसान व भारतीयांच्या आरोग्याला संभवणारे धोके समाजासमोर येणे म्हणूनच अगत्याचे आहे.
या ओट्स, ऑलिव्ह तेल, ब्रेकफास्ट सीरियल्स, किवी, ब्रोकोली वगरे पदार्थाबाबत असे काही चित्र उभे केले जाते, की यांचे सेवन केले की हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, स्थूलत्व आदी भारतीयांना ग्रासणाऱ्या जीवनशैलीजन्य आजारांवर सहज मात करता येईल. परंतु ही चक्क फसवणूक आहे. कारण या सगळ्या प्रकारात जीवनशैलीजन्य आजारांची जी खरी कारणे आहेत, त्यांकडे साफ दुर्लक्ष झालेले दिसते.
साखर, मदा, रिफाइण्ड धान्ये, मीठ, जंक फूड, तळलेला आहार यांचे नित्य सेवन, आहारसेवनाचे दोष, व्यस्त, स्पर्धात्मक, तरीही बठी जीवनशैली, परिश्रमांचा, व्यायामाचा, घामाचा अभाव, पोटावरची चरबी, स्थूल शरीर, मानसिक ताण आदी मूळ कारणांचा विचार न करता केलेले अन्य प्रयत्न निर्थक आहेत.
मूळ कारणांकडे दुर्लक्ष करून केवळ हे अन्नपदार्थ खाऊन तुम्ही आजारांचा प्रतिबंध करू पाहत असाल तर तो प्रयत्न फोल ठरेल यात शंकाच नाही.
ऑलिव्ह, ओट्स, ब्रोकोली, किवी, सफरचंद वगरे कोणतेही परकीय फळ वा भाजीची बी आपल्या भूमीमध्ये निसर्गत: उगवत नाही. इथेच खरे तर ते पदार्थ आपल्यासाठी बनलेले नाहीत याचा संदेश निसर्गाने दिलेला आहे.
प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, अग्नी, बल, वय, कामाचे स्वरूप या सर्वाचा विचार करून आपल्याला सात्म्य होईल ते अन्न सेवन करावे. तेसुद्धा ऋतू-काळ-प्रदेश यांना अनुसरून- असे आयुर्वेदात म्हटले आहे.
परंतु परकीय पदार्थाचे सेवन करताना या मूलभूत आरोग्यनियमांना पूर्णपणे धाब्यावर बसवले जाते.
आज जग जवळ आले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या देशांतील अन्नपदार्थाचा चवीमध्ये बदल म्हणून आनंद घेण्यास काहीच हरकत नाही. मात्र, तो आपल्या नित्य सेवनाचा आहार बनला तर आरोग्याची पार वासलात लागेल, हे नक्की.
आयुर्वेदानुसार, जो आहार देशसात्म्य आहे- अर्थात निसर्गत: तुमच्या प्रदेशामधील आहे, तोच तुमच्या आरोग्याला अनुकूल आहे. आपल्या गुणसूत्रांना सर्वस्वी परक्या प्रदेशांमध्ये पिकलेले अन्नपदार्थ आपल्या आरोग्याला पूरक होण्याची शक्यता नाहीच; उलट, ते बाधक ठरेल. तसेच विविध आजारांनाही कारणीभूत ठरेल.
आफ्रिका आणि आशिया खंडांमधील मूलनिवासी जोवर आपल्या मूळ आहाराला चिकटून होते, तोवर त्यांच्यामध्ये आधुनिक जीवनशैलीजन्य आजार दिसत नव्हते, हे सांगणारे अनेक संशोधकांचे अहवाल आज उपलब्ध आहेत.
हा इतिहास असतानाही आपण जर ओट्स, ब्रेकफास्ट सीरियल्स, ऑलिव्ह तेल आदी परकीय पदार्थाच्या मागे लागणार असू, तर दुर्दैव आपल्या आरोग्याचे आणि आपल्या देशाचेही!
आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा की, याच पाश्चात्त्यांनी आपल्या बापजाद्यांना लाल तांदूळ सोडून पांढरा, रिफाइण्ड तांदूळ खायला शिकवले; जे आता पांढरा तांदूळ आरोग्याला कसा घातक आहे, हे पटवून लाल तांदळाचे गुणगान गाऊ लागले आहेत.
याच पाश्चात्त्यांनी दातांवर मिठाचे मंजन करणाऱ्या आपल्या पूर्वजांना अडाणी ठरवून टुथपेस्टने दात घासायला शिकवले. आणि आता त्याच टुथपेस्टमध्ये मीठ आहे का, म्हणून विचारताहेत.
यांनीच आपल्या मागच्या दोन पिढय़ांना वनस्पती घी खायला घालून रोगी बनवले आणि नंतर वनस्पती घी कसे घातक आहे, ते सांगू लागले.
यांनीच खोबरेल तेलामुळे कोलेस्टेरॉलचा व हार्ट अटॅकचा धोका बळावतो असे सांगितले; आणि आज तेच खोबरेल तेलाचे प्राशन कसे दीर्घायुष्य देते, हे सांगत आहेत.
यांनीच गूळ खाल्ल्यामुळे कृमी होतात, असे सांगून भारतीयांना साखरेची चटक लावली; आणि आता साखरेमुळेच अनेक रोग होतात, असे ते म्हणू लागले आहेत.
ज्या पाश्चात्त्यांची आहारासंबंधीची मते हरघडी बदलत असतात, त्यांच्या सल्ल्यावर, आहारावर विश्वास ठेवायचा कसा? तोही आयुर्वेदासारखी संपन्न आरोग्य परंपरा व समृद्ध आहार-संस्कृती ज्यांना लाभली आहे त्या देशवासीयांनी?
वैद्य अश्विन सावंत
drashwin15@yahoo.com
(पोषणसंदर्भ : नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ न्युट्रिशन, हैदराबाद)
Leave a Reply