तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे ?
एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ?
अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला;
अजुन मी विझले कुठे रे ? हाय ! तू विझलास का रे ?
सांग, ह्या कोजागरीच्या चांदण्याला काय सांगू ?
उमलते अंगांग माझे.. आणि तू मिटलास का रे ?
बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा गार वारा..
रातराणीच्या फुलांचा गंध तू लुटलास का रे ?
उसळती हुदयांत माझ्या अमृताच्या धुंद लाटा..
तू किनार्यांसारखा पण कोरडा उरलास का रे ?
गीत – सुरेश भट
संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर
राग – बागेश्री
“तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास का रे….”
हृदयनाथ मंगेशकरांनी सुरेश भटांच्या अनेक गझलांचे रुपांतर सुंदर गाण्यात केले, या अप्रतिम गझलांपैकीच एक, “तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास का रे ?” ही श्रवणीय गझल आहे.
हेच गाणं आशाजींच्या कर्णमधुर आवाजात ऐकलं की डोळ्यात पाणी येते. या गझलेमागे एक करुण कथा आहे असं जर मनात गृहीत धरून हे गाणं ऐकलं तर या गझलेचे भाव पूर्णतः बदलून जातात. ती केवळ शृंगारिक रचना न राहता एक आर्त करूण शोकगाथा बनून जाते, जी आपले हृदय पिळवटून टाकते…खरंच ही करूण, दुःखद घटनेवरची गझल आहे का ? नक्की काहीच सांगता येत नाही,
युद्धभूमीवर मारल्या गेलेल्या एका वीर जवानाचा मृतदेह घरी आणलेला आहे. त्याच्या पाठीमागे आता फक्त त्याची तरूण पत्नी व चिमुरडे मूल राहिले आहे. आपल्या पतीच्या निष्प्राण देहाकडे विमनस्क अवस्थेत शांत बसलेली पत्नी. तिने तिचा अश्रुंचा बांध थांबवलेला आहे, ती ओठ मिटून बसली आहे काहीच बोलत नाहीये. तिने आपल्या भावनांचा बांध खुला करावा, मनातलं आभाळ रितं करावं म्हणून तिचे सगळे स्नेहीजन एका वेगळ्या भ्रांतेत आहेत. पण ती काही केल्या निश्चल अवस्थेतून बाहेर येत नाही हे लक्षात आल्यावर एक वृद्धा उठते आणि तिच्या तान्हुल्या बाळाला तिच्या मांडीवर ठेवते. त्या बाळाच्या हुंदक्याने तिची समाधीतल्लीनता भंगते आणि तिच्या डोळ्यातून अश्रूंची वाट मोकळी होते… अशी ही कविता..
आयुष्यातल्या एका अल्वार वळणावर तो तिची साथ सोडून गेला आहे आणि त्याचे कलेवर घरी आणलेलं आहे.ते दृश्य बघून तिला काही कळतच नाहीये, ती दिग्मूढ होऊन गेलीय आणि नुसते त्याच्याकडे बघत बसलीय. रात्र उलटत चाललीय आणि हा सहवास कुठे तरी संपुष्टात येणार याची पुसटशी जाणीव तिला झालेली आहे. तिच्या मनात अशा वेळेस भावभावनांचे कोणते कल्लोळ उमटत असतील यांचे एक अप्रतिम काव्यचित्र म्हणजे ही गझल होय.
तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास का रे ?
एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ?
रात्र नुकतीच झाली आहे, ती तरुण आहे (आणि तो देखील ) प्रेमाच्या या हृदयीचे त्या हृदयी होण्याची ही वेळ आहे. तरीही तु असा निजलेला आहेस. खरे तर आपलं फुलासारखं नाजूक प्रेम तु माझ्या केसात माळण्याचं सोडून तु इतक्यातच त्या कुशीवर वळला आहेस. तु असं का केलं आहेस. ही काय जाण्याची वेळ आहे का असं तिला सुचवायचं आहे.
अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला;
अजुन मी विझले कुठे रे ? हाय ! तू विझलास का रे ?
मला आठवतं की, तुझं प्रदीप्त धगधगतं मन तु असंच माझ्या डोळ्याच्या पारयात तु हलकेच रितं करायचास अन चंद्रासारखा शीतल होऊन जायचास. एक शब्दही न बोलता सारं माझ्या कानात हळूच ओठांनी स्पर्शून सांगून जायचास. आपल्या उत्कट प्रेमाला साक्ष असणारया या भव्य अंधारलेल्या दिगंतातल्या तारकांच्या त्या दीपमाला अजूनही तेवत आहेत, त्यांनाही अजून आपल्या मिलनाची ओढ आहे. एव्हढेच नव्हे तर मी देखील अजून तुझ्यावरील आसक्त भावनेत तग धरून आहे. ( नाहीतर मी देखील विझले असते ) पण तूच असा दगा का दिलास बरं ? का तू माझ्याशी प्रतारणा करून निघून गेला आहेस ?तुझ्या हृदयातला प्रेमाचा ध्रुवतारा असा कसा निमाला?
सांग, ह्या कोजागरीच्या चांदण्याला काय सांगू ?
उमलते अंगांग माझे.. आणि तू मिटलास का रे ?
तू हे जे काही केलं आहेस ते एकवेळ मी मनाच्या समजूतीसाठी स्वतःला काहीतरी सांगेन पण आपल्या प्रेमाला सोबती असेलेल हे कोजागिरीचं टिपूर चांदणं जे मोठ्या आशेनं माझ्याकडे बघतंय त्याला आता काय सांगू हा प्रश्न पडलाय. त्यांना पाहून सवयीने आपसूक माझ्या मनातल्या गुलबक्षीच्या फुलाच्या पाकळ्या आपसूकच उमलतात त्यांचं मी काय करू आणि तु तर असं स्वतःला मिटून घेऊन ( अज्ञाताच्या अनंत प्रवासाला ) निघून गेला आहेस. अगदी हृदय पिळवटून जाईल असं हे हळवे रुदन आहे.….
बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा गार वारा..
रातराणीच्या फुलांचा गंध तू लुटलास का रे ?
आसमंतातल्या तारकाना मी डोळ्याच्या पापण्याआड करून त्याकडे डोळेझाक करू शकते पण तुझ्यामाझ्या सवयीचा झालेला पश्चिमेचा हा अवखळ वारा जो आपल्या देहाला थरथरता स्पर्श करूनच पुढं जातो. त्याला या स्पर्शाचा आभाळभर कैफ चढला आहे, तो देखील तुझ्याबद्दल विचारतोय त्याला काय सांगावे काही कळत नाही. आपण दोघे एकमेकाच्या पाशात विसावलो की खिडकीतून येणारा रातराणीचा बेधुंद करणारा गंध आपल्या भोवती नजाकतीने पिंगा घालत बसायचा. त्याला आपली सवय झाली होती आणि मला त्याच्या त्या नशील्या गंधाची ! पण तु आता जाताना रातराणीचा गंध तुझ्यासवे नेला आहेस की काय असे वाटावे इतके त्या रातराणीने स्वतःला गंधबंधित करून मिटवून टाकले आहे, ती आता खिडकीतून डोकावत नाही. मला तर काहीच सुचत नाही ( आता तूच ते काय सांग ) असं विचारत ती तिची कैफियत सुरु ठेवते…
उसळती हुदयात माझ्या अमृताच्या धुंद लाटा..
तू किनार्यातसारखा पण कोरडा उरलास का रे ?
शेवटच्या पंक्तीत कवी सुरेश भटांनी कमाल केलीय. अमृत म्हणजे अमर होण्यासाठी देवतांनी प्राशन केलेले पेय होय.तो जरी असा ( निश्चल ) बनून राहिला असला म्हणून काय झालं, तिच्या हृदयात प्रेमाच्या लाटा या उसळत आहेत त्या सदैव अखंडितपणे उसळत राहतील याची तिला खात्री आहे. पण तिला खंत आहे की या धुंद प्रेमाच्या लाटा उसळत असताना त्याची अनुभूती घेण्यासाठी तो मात्र सचेत नाही. तो किनारया सारखा कोरडा झालाय. पण म्हणून काय झालं, लाट ही शेवटपर्यंत त्या किनारयाकडे येतच राहणार अन त्याच्या पायाला स्पर्शून आपले अमर प्रेमगीत त्याच धुंदीने गात राहणार. इतकी ती तिच्या प्रेमावर फिदा आहे आणि त्यावर जगत राहणार आहे. पण त्यानं असं का वागावं, त्यानं असं ( अकाली ) विझून जावं ? याची तिच्या मनाला पोखरणारी खंत आहे ती तिला काही केल्या गप्प बसू देत नाहीये….
या कवितेमागील नेमकी पार्श्वभूमी अशीच आहे का याला मात्र त्यांनी कधी दुजोरा दिला नाही मात्र त्याबरोबरच त्यांनी या गझलेमागील नक्की भावबिंदू कोणते हे देखील सांगितले नाही. पण त्यांच्या जिवलगाला म्हणजे हृदयनाथ मंगेशकरांना मात्र याविषयी सांगतले असावे त्यामुळेच की काय त्यांनी बागेश्री रागात ही गझल आर्त अशा सुरात गुंफली असावी.
— संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ :- समीर गायकवाड.
“तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास का रे….” हे गाणे.
मा.आरती अंकलीकर
https://www.youtube.com/y1j3nP1E6cc&list=PL99D9CC5EA52821B8&index=7
मा.आशा भोसले
https://www.youtube.com/7YaMnvWnYBI
मा.पद्मजा फेणाणी
https://www.youtube.com/94Y5UUkPY6Q
शंकर महादेवन
https://www.youtube.com/EH4TuZq0YOI
पं. ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजातला खुलासा:
“… कुणीतरी या गाण्याचा अर्थ सांगताना हे मृत्युगीत आहे असा अर्थ सांगण्यात आला. मला वाटत नाही कि मी मृत्युगीताला इतकी शृंगारिक चाल लावेन. आणि ती चाल भटांनी पण ऐकली होती भटांना अतिशय आवडलेली चाल आहे ती. आणि भटांनी असा माझ्याजवळ कधीही उल्लेख केला नाही कि हे मृत्युगीत आहे म्हणून. पण हे शृंगारिक गाणे आहे. प्रेयसी प्रियकराची मनधरणी करते. आणि तो तिच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतोय. तिने जास्तीत जास्त तिच्यात आर्तता यावी.तिने अधिक संवेदनशील व्हावं ह्या उद्देशाने तो तिच्याकडे दुर्लक्ष करतोय हे भटांचं म्हणणं होतं…”
इथे ऐका:
https://youtu.be/EXrwDBiUyOM?t=172