मधुमेहामुळे मोतीबिंदू, काचबिंदू हे आजार तर होऊ शकतातच; पण मुख्यत्वे मधुमेहामुळे रेटिनावरील रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. डायबेटिक रेटिनोपॅथीसुद्धा एक प्रकारच्या जीनवर अवलंबून असते. डायबेटिक रेटिनोपॅथी फक्त डायबेटिस नीट कंट्रोल न झाल्याने होते असे नाही. तो किती दिवसांपासून आहे यावरही रेटिनोपॅथी अवलंबून असते. असेही पाहण्यात आले आहे की, रेटिनोपॅथीसुद्धा एक प्रकारच्या जीनवर अवलंबून असते. त्यामुळे डायबेटिक रुग्णाने दरवर्षी रेटिनाची तपासणी केली पाहिजे. रेटिनाची तपासणी हे एक स्वतंत्र तंत्रज्ञान आहे. यामध्ये सर्वसाधारणपणे डोळ्यांत औषध टाकून डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या केल्या जातात. नंतर इनडायरेक्ट किंवा क्वचित डायरेक्ट ऑफथॅलमोस्कोपद्वारे रेटिनाची पाहणी केली जाते. रेटिनाचे फोटोग्राफ फंड्स कॅमे-याद्वारे घेता येतात. एक औषध शिरेत देऊन रेटिनाच्या रक्तवाहिन्यांची अँजिओग्राफीही केली जाऊ शकते. कशा प्रकारे तपासणी केली त्यापेक्षा तपासणीत काय दिसले हे महत्त्वाचे. आपल्या रेटिनाची रचना अशा प्रकारे केलेली असते की, त्याच्या निरनिराळ्या लेअर्स असतात. रेटिना हे डोळ्यांच्या आतील पातळ पटल आहे. यावर आर्टरीज आणि व्हेन्स (रक्तवाहिन्या) ठराविक पद्धतीने पसरलेल्या असतात. रेटिनाच्या बाहेरील बाजूस कोराईड व डोळ्यांबाहेरील आवरण म्हणजे स्कलेरा असतो. रेटिना संवेदनशील असून त्यावर पडलेल्या प्रतिमेस ज्ञानतंतूंद्वारे ऑप्टिक डिस्कमधून ऑप्टिक नव्र्हद्वारे मेंदूस माहिती दिली जाते. ती आपणास दिसते.
लक्षणे : या रेटिनावर मॅक्यूला नावाचा अतिसंवेदनशील भाग असतो. त्याच्या मध्यास फोबिया नावाचा सर्वांत जास्त संवेदनशील भाग केवळ काही मायक्रॉनच्या साईजचा असतो. या भागावरच संपूर्ण दृष्टीची तीव्रता अवलंबून असते. मधुमेहामध्ये रेटिनाच्या रक्तवाहिन्या कमजोर होतात. त्यामुळे रेटिनावर जागोजाग रक्तवाहिन्या फुटून रक्तस्राव होतो. काही ठिकाणी पांढरा पदार्थ तयार होतो. ब-याच ठिकाणी अत्यंत बारीक नव्या रक्तवाहिन्या तयार होतात (निओ व्हॅस्क्युलॅरायझेशन). या अत्यंत नाजूक असतात. म्हणून त्या फुटतात. त्यामुळे रेटिनावर रक्तस्राव होतो. वारंवार होणारे रक्तस्राव, व्हाईट एक्झिडेट्स आणि नवीन तयार झालेल्या रक्तवाहिन्या यामुळे मेंबरेन तयार होते. हे मेंबरेन आकसून गेल्यास ते रेटिनाला ओढते. त्यामुळे रेटिना आपोआप बाजूला सरकतो. यास डिटॅचमेंट ऑफ रेटिना असे म्हणतात.
उपचार : हे सर्व टाळता येऊ शकते. योग्य वेळी रेटिनाची तपासणी केल्यास या रक्तवाहिन्यांवर लेसर किरणोपचार करून त्यांना फुटण्यापासून थांबवता येते. तसेच जाणारी दृष्टी रोखता येते. आज जगात मोतीबिंदू नंतर अंधत्व भिंगारोपण शस्त्रक्रियेने कायमस्वरूपी दूर करता येते; पण रेटिनोपॅथीने आलेले अंधत्व पूर्णपणे दूर करता येत नाही, तर दृष्टीस येणारे नुकसान थांबवता येते. त्यामुळे डायबेटिक रेटिनोपॅथीमध्ये लेसर उपचारास फार महत्त्व आलेले आहे. ब-याच वेळेस हा उपचार वारंवार करण्याची गरज भासते. जागतिक पातळीवर व्हिजन २०२०, तर भारतात केंद्र सरकारने याला अंधत्व निवारणात खूप महत्त्व दिले आहे. यासाठी सरकारी पातळीवर बरेच कार्यक्रम राबवले जात आहेत. हा उपचार अत्यंत सुलभ आणि रुग्णास त्रास न होता करता येतो. यात कोठेही कापाकापी किंवा जखम होत नाही. योग्य उपचारांनंतर रुग्णास लवकर घरी जाता येते. डोळ्यांना पट्टी किंवा चष्मा लावण्याची गरज नसते. मात्र, डॉक्टरी सल्ल्याशिवाय कोणताही निर्णय किंवा उपचार करू नये.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply