वार्याची झुळुक अंगावर आल्यावर आंबलेले मन प्रसन्न होते. अशी एक व्यक्ती काही वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात आली आणि आयुष्याला एक वेगळे वळण मिळाले. आपल्या आयुष्यात अनेक व्यक्ती येतात नि जातात. पण क्वचितच आपल्या मनात घर करुन राहतात. “आनंद कॅलेंडरच्या लाल तारखांत बंद असू नये. तो असावा हजारो क्षणात, लाखो पळांत, मनाने मनापासून उपभोगलेला अगदी मनमुराद”. असं आपल्याच मस्तीत म्हणणारे आमचे हरहून्नरी नार्वेकर सर आम्हा सर्व मुलांच्या मनात घर करुन राहिलेत. त्यांनी आम्हाला रंगमंचावर उभं राहण्यापासून ते बोलावे कसे इथपर्यंत सगळे शिकवीले. हा लेखप्रपंच म्हणजे गुरुवंदनाच.
नार्वेकर सर यांचं संपूर्ण नाव किशोर यशवंत नार्वेकर. २५ सप्टेंबर १९६० रोजी एका मध्यम वर्गीय कुटूंबात त्यांचा जन्म झाला. मध्यम बांधा, कृष्णवर्ण, टवटवीत डोळे आणि बुद्धिमत्तेचं प्रतिक असलेलं रुंद लांब कपाळ अशी त्यांची रेखीव आकृती. त्यांनी कॉलेजपासूनंच वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायला सुरुवात केली व पारितोषिकेही पटकवली. १९८१ पासून “प्रयोग मालाड” या नाट्यसंस्थेतून लहान सहान भुमिका करत व बॅकस्टेज सांभाळत त्यांनी नाट्यक्षेत्रात पदार्पण केले. प्रयोग मालाडच्या “गच्ची नाट्य उपक्रमात” सहभाग घेतला. त्यांनी अनेक एकांकिकेतून भुमिका केल्या. गुंता, देवनगरी, म्हॉ, कोण हसलं आपल्याला, अंगाई या एकांकिकेतून वेगवेगळ्या भुमिका केल्या. ज्याची दखल त्यावेळच्या सर्व वर्तमानपत्रांनी घेतली. प्रेमानंद गजवी लिखित राज्यनाट्य स्पर्धेत सहभाग. दिल्ली येथे “प्रयोग मालाड” या संस्थेने संगीत नाटक स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेत प्रयोग मालाडने “आषाढातील एक दिवस” ह्या नाटकाचा प्रयोग केला. ह्या नाटकाच्या नेपथ्यास उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. याचे नेपथ्य नार्वेकर सरांनी केले.
त्यांनी चित्रकलेची व काव्यलेखनाची आवड जपली. उत्कृष्ट काव्य व चित्रे त्यांनी रेखाटली. १९८९ पासून ते लेखनाकडे आत्कृष्ट झाले. “गुलजार थिएटर” या नाट्यसंस्थेमधून लेखक म्ह्णून प्रवास सुरु. खंडणी, बॅचलर पार्टी, यस आय एम गील्टी या एकांकिकेस त्यांना लेखनासाठी प्रथम पारितोषिक मिळाले. मृण्मयी, किमयागार, चक्रधरस्वामी या मराठी मालिकांमध्ये तर शगून, हॅलो इन्स्पेक्टर या हिंदी मालिकेतून भुमिका केल्या. “ब्रिज” नावाच्या एका भोजपूरी सिनेमातही काम केले. संवाद लेखक म्हणून चक्रधर स्वामी मालिकेचे जवळ जवळ १०० भागाचे लेखन व सहदिग्दर्शन केले. सौजन्याची ऎशी तैशी या व्यवसायिक नाटकाचे संकलन, दिग्दर्शन व नेपथ्य केले.
नाटक ही एक चळवळ आहे असं त्यांना वाटतं. म्हणून नाट्यक्षेत्रात पैसे मिळवण्यापेक्षा लोकांचे प्रबोधन करण्यावर त्यांनी जास्त भर दिला. म्हणूनच त्यांनी गणेशोत्सवात नाट्य चळवळ आरंभीली. सौजन्याची ऎशी तैशी, चाळ म्हणाली बिल्डींगला अशी नाटके व एकांकिका करुन समाज प्रबोधन केले. पाणी वाचवा, वीज वाचवा अशी पथनाट्येही केली. लहान मुलांना एकपात्री, भाषण लिहून देणं व ते कसं कारावं याचं मार्गदर्शन त्यांनी केलं. आपण ज्या राष्ट्रात म्हणजेच ज्या समाजात वावरतो त्या समाजाचे आपल्यावर ऋण असते ही जाणीव ठेवून मालाड नववर्ष स्वागत समिती, समर्पण संस्था, पाझर प्रतिष्ठान अशा सामाजिक संस्थांमधून समाजकार्य केले. परंतु हे सर्व करीत असताना त्यानी पैशांची अपेक्षा ठेवली नाही. समाजाचे प्रेम हे पैशाहून कैक पटीने मौल्यवान असते याची जाणीव त्यांना आहे. जगातील वाईट माणसं खाण्यासाठी जगतात आणि चांगली माणसं जगण्यासाठी खातात. म्हणूनंच चांगल्या लोकांना ईश्वर निराश करत नाही. फोटोग्राफी व ग्राफीक डिझाई्नींग या माध्यमातून त्यांचे चांगले उदरनिर्वाह होते. बुद्धी स्थिर ठेवून प्राप्त परिस्थितीत स्वतःचे कर्तव्य कोणते, ते ओळखणे आणि रागलोभ बाजूला ठेवून अनन्यभावाने त्यानुसार आचरण करणे म्हणजे गीतामय होणे, असे ज्येष्ठ लेखक व पत्रकार श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी म्हणतात. नार्वेकर सरांनीही त्यानुसार आचरण केले आहे. परंतु त्यांना प्रसिद्धि मिळाली नाही. प्रसिद्धिसाठी ते हापापलेले नाहीत. अशा असामान्य कर्तृत्व असणार्या परंतु सर्वसामान्य वृत्ती असणार्या नार्वेकर सरांना वंदन.
लेखक : जयेश शत्रुघ्न मेस्त्री
— श्री.जयेश शत्रुघ्न मेस्त्री
Leave a Reply