गेल्या पाच एकदिवसीय सामन्यात कामगिरी खराब झाली म्हणून ऑस्ट्रेलियन क्रिकेट नियामक मंडळाने त्यांचा माजी कप्तान रिकी पाँटिंग याला संघातून वगळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लगेचच पाँटिंग याने या क्रीडाप्रकारातून आपली निवृत्ती जाहीर केली. पाँटिंग भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी कसोटी क्रिकेटमध्येही चाचपडत होता आणि तिथे कामगिरी सुधारली नसती तर त्याला कसोटी संघातूनही डच्चू देण्याची तयारी तेथील क्रिकेट नियामक संघटनेने केली होती. परंतु भारताविरोधात त्याने तडाख्याने फलंदाजी केली आणि कसोटी क्रिकेटमधील त्याची गच्छंती टळली. जगातील सध्याचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या शतकांचा विक्रम मोडू शकेल इतक्या ताकदीचा एकमेव खेळाडू सध्या आहे; तो म्हणजे रिकी पाँटिंग. परंतु महान आहे म्हणून त्याची खराब कामगिरी आपण सहन केलीच पाहिजे, असे ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघटना मानत नाही.याच्या बरोबर उलट आपल्याकडील परिस्थिती. एखादा मोठा आहे म्हणून त्याला देव्हाऱ्यात डकवून टाकायचे आणि सर्व गुन्हे माफ करायचे. इतकेच काय, त्याने घेतलेल्या मोटारीवरील करही माफ करण्याचा अगोचरपणा आपल्याकडे होतो. त्यामुळे खेळ वा संस्थेपेक्षा व्यक्तीस महत्त्व येते आणि नंतर तर परिस्थिती इतकी हाताबाहेर जाते की ती व्यक्ती म्हणजेच खेळ वा संस्था असे मानले जायला लागते. हे मागास समाजाचे लक्षण आहे आणि आपल्याकडे ते अनेक क्षेत्रांबाबत पाहायला मिळते.तुम्हाला काय वाटते?
— बातमीदार
Leave a Reply