1 ऑगस्ट 1924 रोजी वेस्ट इंडीज द्वीपसमूहातील बार्बडोस बेटांवरील एम्पिरिअल क्रिकेट मैदानापासून जवळच असणार्या एका घरात एक बालक जन्माला आले. यथावकाश त्याचे नामकरण फ्रॅंक मॉर्टिमर मॅग्लीन वॉरेल असे करण्यात आले. हा पुढे जाऊन एक उच्च श्रेणीचा शैलीदार फलंदाज बनला. नियमितपणे वेस्ट इंडीजचे नेतृत्व करणारा तो पहिलाच कृष्णवर्णीय खेळाडू ठरला, तेही एक डझन श्वेतवर्णीय कर्णधारांनंतर. क्रिकेटच्या सामाजिक इतिहासातील ही अत्यंत महत्त्वपूर्ण घटना होती.1950च्या इंग्लंड दौर्यात त्याने 89.83 च्या सरासरीने 539 धावा काढल्या. मालिकेतील इतर कोणत्याही फलंदाजापेक्षा ही कामगिरी सरस होती. 261 ही कारकिर्दीतील सर्वोत्तम ठरलेली खेळी त्याने ट्रेन्टब्रिजवर केली. 1951च्या ऑस्ट्रेलिया दौर्यात एका कसोटीत जॉफ नोब्लेटच्या गोलंदाजीवर तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. हा दौरा त्याला तसा वाईटच चालला होता. नशीब बदलवण्याच्या इराद्याने त्याने आपल्या कपड्यांचा धागा-न-धागा उसवून काढला आणि दुसर्या डावात पूर्ण नव्या कपड्यांनिशी मैदानावर उतरला. निकाल मात्र बदलला नाही. पुन्हा पहिल्याच चेंडूवर बाद! मैदान सोडता सोडता त्याची भेट भेदरलेल्या क्लाईड वॉलकॉटशी झाली. वॉलकॉट म्हणाला – “अरे बाबा, तुझ्यानंतर उतरायचे असते त्या प्रत्येक वेळी मला त्रिक्रम (हॅट्रिक) का चुकवावा लागतो?” हा वॉलकॉट, एवर्टन विक्स आणि दस्तुरखुद्द वॉरेल यांची ‘तिडी’ इतिहासात ’थ्री डब्ल्यूज’ म्हणून प्रसिद्ध आहे. (त्रिक्रम आणि तिडी या शब्दांचे स्वामित्वहक्क माझ्याकडे आहेत!) 1960-61च्या हंगामातील (साधारणपणे एखाद्या वर्षीचा ऑक्टोबर ते पुढील वर्षाचा एप्रिल महिना हा क्रिकेटचा ‘हंगाम’ मानला जातो.) ऑस्ट्रेलिया मालिकाही त्याने गाजवली. याच मालिकेसाठी कर्णधार म्हणून त्याची निवड करण्यात आल
ी होती. विंडीज आणि ऑस्ट्रेलियादरम्यानची कसोटी मालिका आता फ्रँक वॉरेल चषक या नावाने खेळली जाते. 1963च्या इंग्लंड दौर्यात त्याच्या नेतृत्वाखालील संघाने 3-1 असा
विजय मिळवला. वॉरेल बार्बडोसमध्ये जन्मला, त्रिनिदादमध्ये वाढला, राहिला आणि त्याने अखेरचा श्वास घेतला जमैका
बेटांवर…विंडीज क्रिकेट हा राष्ट्रवादाचा एक आदर्श नमुना आहे. ‘वेस्ट इंडीज नावाचा देश आणि त्याच्या सीमारेषा एवढ्या एवढ्या’ अशी परिस्थिती नाही. वेस्ट इंडीज ही संज्ञा कॅरिबिअन बेटांच्या समूहास उद्देशून वापरली जाते. ब्रिटिश अधिपत्य संपल्यानंतरही या बेटांवरचा क्रिकेट संघ एकसंध राहिला. एक ‘कॅरिबी’ म्हणून समान संस्कृती असलेल्या या बेटांनी भारताप्रमाणेच केंद्रीय शासनाचा स्वीकार करावा असे वॉरेलचे मत होते. बार्बडोस सोडल्यामुळे त्याच्यावर टीका करणारेही भरपूर होते. तिथे त्याने छोटीशी जागा विकत घेतली होती आणि उत्तर-आयुष्य तिथेच काढण्याचा त्याचा विचार होता पण नियतीला ते मंजूर नव्हते. वयाच्या त्रेचाळिसाव्या वर्षीच श्वेतकोशिकार्बुदामुळे (रक्तातील पांढर्या पेशींचा कर्करोग = ल्यूकेमिअ) त्याच्या आयुष्याचा डाव अकालीच संपला. विज्डेनमधून (क्रिकेटला वाहिलेले अत्यंत विख्यात नियतकालिक) त्याला वाहिलेल्या श्रद्धांजलीत सर लिअरी कॉन्सटन्टाईन (हा आणखी एक कॅरिबिअन अवलिया, यथावकाश त्याच्यवर ‘फोकस’ पडेलच) लिहितो : “सर फ्रॅंक वॉरेलने एकदा असे म्हटले होते की, बार्बडोस या त्याच्या जन्मभूमीला कुणी हिरोच नाही. नेहमीप्रमाणेच तो स्वतःला कमी लेखत होता. फ्रॅंक मॅग्लीन वॉरेल हा बार्बडोसच्या नव्या राष्ट्राचा पहिला हिरो होता आणि याच्यावर विश्वास नसणारा कुणीही मार्च 1967च्या मध्यात जेव्हा त्याचे पार्थिव [बार्बडोस] बेटांवर आणण्यात आले तेव्हा तिथे हजर असावयास हवा होता.”जॅनची जानदार खेळ
ी
1 ऑगस्ट 1993 रोजी ब्रिटिश पुरुषांना आजवर न जमलेली कामगिरी महिलांनी दुसर्यांदा करून दाखविली! नाही म्हणायला आता 2010चा ‘विसविशीत’ विश्वचषक इंग्लंडच्या पुरुषांनी जिंकला आहे. 1973मध्ये झालेल्या विश्वचषकानंतर वीस वर्षांनी इंग्लंडच्या महिला संघाने पुन्हा विश्वचषक पटकाविला. लॉर्ड्स मैदानावर न्यूझीलंडवर 67 धावांनी मिळविलेल्या ‘त्यांच्या’ या विजयात सलामी‘वीरा’ जॅनेट अॅन ब्रिटिनच्या (ही ‘जॅन’ म्हणून प्रसिद्ध आहे) 48 धावांचा मोठा वाटा राहिला. आजही महिला कसोट्यांमधील कारकिर्दीतील सर्वाधिक धावांचा (1,935) आणि सर्वाधिक शतकांचा (5) विक्रम तिच्या नावावर आहे.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply