नवीन लेखन...

बाळाला द्या कॅल्शिअम

बाळ उन्हात खेळतंय. खेळू दे की! बाळ खूप दूध पितंय. पिऊ दे की! बाळाच्या हाडांच्या बळकटीसाठी ते आवश्यकच आहे. आपलं बाळ जर सकाळच्या कोवळ्या उन्हात खेळत नसेल, दूथ प्यायचा कंटाळा करीत असेल तर तीच चिंतेची बाब समजा. बाळाला कॅल्शिअमची गरज आहे, हे वेळीच ओळखा.

बाळाला दूध प्यायला आवडत नाही, खूप लवकर दूध पिणं सोडलं आहे बाळानं असं जेव्हा एखादी आई लाडानं सांगते, तेव्हा माझा चेहरा चिंताक्रांत होतो. बाळाच्या भविष्याच्या दृष्टीनं सर्वात वाईट गोष्टच ती आता लाडानं सांगत असते. बाळाची त्वचा गोरीपान राहावी म्हणून त्याला अजिबात उन्हात जाऊ देत नाही, असं जेव्हा एखादी आई प्रेमानं सांगते, तेव्हाही मी असाच हताशपणे तिच्याकडे पाहात राहतो. आपण बाळाची काळजी घेत नाही आहोत, तर त्याच्यासाठी काळजी करावी अशी परिस्थिती निर्माण करीत आहोत, हेच त्या आईला माहित नसतं.

लहान मुलांमध्ये मुडदूस वाढतो आहे. गुडघ्याखालील पायाचा बाक व फ्रॅक्चरचे प्रमाणही वाढत चाललं आहे. याला मुख्यत्वेकरून आपल्या बदललेल्या खाण्याच्या पद्धती, राहण्याच्या पद्धती व गतीमान जीवन कारणीभूत आहे. आपण अकारण व अयोग्य रीतीनं बाळ वाढवत आहोत, हेही त्यामागचं एक कारण आहे. बाळाला त्याच्या वाढत्या वयात कॅल्शिअम पुरेशी मिळत नाहीत, हे यामागचं कारण असतं.

बाळ पोटात असताना व जन्मानंतरही सहा ते नऊ महिन्यांपर्यंत बालकाला आवश्यक असलेलं कॅल्शिअम आईकडून दुधातून मिळतं. त्यानंतर मात्र ही गरज पोषक आहारातून भागवली जाणं गरजेचं असतं. त्यासाठी दूध, दही, पनीर, हिरव्या पालेभाज्या, नाचणी, सोया, मासे हे परिपूर्ण असतात. त्यामुळे बाळाला हा वरचा आहार सुरू करणं आवश्यक असतं. बालकाचं वय एक ते तीन वर्षे असताना त्याला दरदिवशी 500 मिलिग्रॅम कॅल्शिअमची गरज असते व हे कॅल्शिअम दोन कप दुधातून मिळू शकतं. मुलाचं वय चार ते आठ वर्षे असताना त्याला दर दिवशी 800 मिलिग्रॅम कॅल्शिअमची गरज असते व हे तीन कप दुधातून मिळू शकतं. वय 9 ते 18 वर्षे असताना त्याला दरदिवशी 1300 मिलिग्रॅम कॅल्शिअमची गरज असते व हे चार कप दुधातून मिळू शकतं. एवढं दूध एकाच वेळी घेण्याची गरज नाही. तर दिवसभरात तेवढं दूध घेणं आवश्यक आहे. प्रत्येक जण एवढं दूध दिवसभरात घेईलच असं नाही. जेवढं दूध घेणं शक्य आहे, तेवढं त्यानं घ्यावं. उर्वरित कॅल्शिअम मिळवण्यासाठी त्यानं आपल्या आहारात वर उल्लेखलेल्या इतर गोष्टींचा समावेश करावा. त्यामुळेही योग्य तेवढे कॅल्शिअम मिळू शकतील. कॅल्शिअमच्या गोळ्या घेण्याऐवजी अन्नातून ते मिळवण्याकडे कल असला पाहिजे.

प्रामुख्यानं मुडदूस होण्यामागे “ड‘ जीवनसत्त्वाचा अभाव असतो. “ड‘ जीवनसत्त्वाच्या गोळ्या मिळतात. परंतु नैसर्गिक प्रकारात हे जीवनसत्त्व सूर्याच्या किरणांच्या माध्यमातून त्वचेखाली तयार होतं. त्यासाठी दररोज 15 ते 20 मिनिटे कोवळ्या उन्हात बसणं जरुरी आहे. मुलांनीच नव्हे तर मोठ्या माणसांनाही उन्हाचा स्पर्श व्हायला हवा. आपण कार्यालयातून वातानुकूलित वातावरणात दहा-बारा तास काम करतो. व्यायामाचा अभाव आहे. उन्हाची झळा लागू नये यासाठी आपण सकाळीच कडेकोट बंदोबस्तात बाहेर पडतो. असे करू नये. दुपारच्या उन्हाचा तडाखा डोक्याला लागू नये हे ठीक आहे, पण सकाळी कोवळे ऊन अंगावर घ्यायला हवे. सूर्यस्नानाची कल्पना यासाठीच आहे. पूर्वजांनी घातलेल्या रीती आपण किती सहजासहजी विसरून गेलो आहोत! “ड‘ जीवनसत्त्व हेच कॅल्शिअम शोषून घेण्यास व हाडांमध्ये स्थिर करण्यास मुख्यत्वेकरून कारणीभूत असते. त्यामुळे “ड‘ जीवनसत्त्वाची कमतरता होऊ देऊ नये.
जसं वय वाढतं, तशी हाडांची घनता वाढत जाते. सर्वांत जास्त ती 15 ते 18 या वयात होते व नंतर ती हळूहळू कमी होत जाते. त्यामुळे जर लहानपणीच चांगला आहार ठेवून हाडं बळकट बनवली तर मोठ्या वयात फ्रॅक्चर व हाडांच्या ठिसूळपणाचं प्रमाण कमी होऊ शकतं.

मुडदूस हे आहारात कॅल्शिअम व “ड‘ जीवनसत्त्व कमी झाल्यास किंवा मूत्रपिंडाच्या विकारानं होऊ शकते. मुडदूसमध्ये गुडघ्याखालील पायाच्या हाडाला बाक येणं, टाळू उशिरा भरणं, मनगटावर सूज येणं असं होऊ शकतं. असं आढळल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अशावेळी रक्ततपासणी व एक्सरेद्वारे याचं निदान होऊ शकतं व औषधांनी हे पूर्णपणे बरं होऊ शकतं.

जवळजवळ सर्वच मुलांमध्ये एक वर्षापर्यंत व्ही लेग्ज (पायांमध्ये थोडी कमान) असते, जी दीड वर्षापर्यंत नाहीशी होते. दोन ते चार वर्षे वयोगटात नॉक नीज (गुडघे जवळ येऊन पावलांतील अंतर वाढणे) दिसून येतात. चार ते आठ वर्षांपर्यंत नैसर्गिकरीत्या सरळ होऊन जातात. या वयात, कुठल्याही टप्प्यावर जर कॅल्शिअम अथवा “ड‘ जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण झाली तर तो बाक तसाच राहतो. हे टाळायचं असेल तर दुधाला पर्याय नाही. म्हणून मुलांना लहान वयातच दूध पिण्याची चांगली सवय लावा. काही वेळा मुलांना दूध आवडत नाही, अशावेळी मिल्कशेक किंवा लस्सी मुलांना आवडत असेल तर द्या. पण आवश्यक तेवढे कॅल्शिअम त्यांना मिळू द्या.

Avatar
About आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप 118 Articles
आरोग्यदूत हा वैद्य सुविनय दामले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यविषयक बहुमोल माहितीची देवाणघेवाण करणारा एक अतिशय लोकप्रिय व्हॉटसअॅप ग्रुप आहे. या ग्रुपवरील निवडक पोस्ट वाचकांच्या सोयीसाठीप प्रकाशित करत आहोत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..