मनावर ताबा मिळविणे, त्याचा संयम करणे किती कठीण गोष्ट आहे ! मनाची एखाद्या वेड लागलेल्या माकडाशी तुलना केली जाते ती अगदी योग्यच होय.
एक माकड होते. माकडाचीच जात ती! सगळ्या माकडांप्रमाणेच तेही स्वभावतःच चंचल होते. त्याचा तो स्वभावसिद्ध चंचलपणा कमी वाटला म्हणून की काय, एकाजणाने त्याला यथेच्छ दारू पाजली. माकडाच्या चंचलपणाला आणखीच बहर आला. भरीत भर त्यातच त्याला चावला विंचू. विंचू चावला म्हणजे माणूस दिवसभर कसा तडातड नाचत उडत असतो हे तुम्ही पाहिलेच असेल. साहजिकच मग त्या माकडाची जी अवस्था झाली असेल तिची कल्पनाच केलेली बरी. झाली ही दुर्दशा पुरेशी नव्हती म्हणूनच की काय त्या माकडाला भूतबाधा झाली. त्यानंतरच्या त्याच्या दुर्दम्य चंचलतेचे वर्णन कोणत्या शब्दांत करावे?
मानवी मनाची स्थितीही त्या माकडासारखीच आहे. स्वभावतःच ते सदैव चंचल असते. वासनेच्या मद्याचा कैफ चढून ते आणखीच क्षुब्ध होते. वासनेचा अमल बसल्यावर त्याला मत्सराचा विंचू नांग्या मारू लागतो. दुसऱ्याचे यश वगैरे बघून त्याला त्यांचा हेवा वाटू लागतो. या सर्वावर कडी म्हणजे अखेर गर्वरूपी पिशाच्च त्याला झपाटते. त्याने मग आपणच सर्वात श्रेष्ठ आहोत, असे त्याला वाटू लागते.
या अशा मनाचा संयम करणे ही खरे तर कठीण गोष्ट आहे.
— स्वामी विवेकानंद यांच्या “राजयोग” मधून
Leave a Reply