मनुष्यबळ विकास खात्याने विश्वनाथन आनंदला डॉक्टरेट देण्याच्या प्रक्रियेत नागरिकत्त्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले. स्पेनमध्ये राहत असल्याने तो भारतीय नागरिक नसल्याचा जावईशोध या खात्याने लावला. केंद्रिय मंत्री कपिल सिब्बल यांनी आनंदची माफी मागत या
|
प्रकरणावर पडदा टाकला असला तरी एकूणच खेळाडू आणि क्रीडासंस्कृती याबाबत आपल्याकडे केवढी मोठी उदासिनता आहे, हे नव्याने पहायला मिळाले.
आपल्या देशातले मनुष्यबळ विकास खाते हे केवळ मनुष्यबळातच पारंगत दिसत आहे. या बळाला बुद्धिबळाची जोड देण्याची गरज आहे. परंतु, या खात्यामध्ये बुद्धीचे बळ अभावानेच दिसते. त्यामुळे या खात्याने शिक्षणाच्या क्षेत्रात घिसाडघाईने घेतलेले अनेक महत्त्वपूर्ण निर्णय सतत वादग्रस्त ठरले आणि त्यातले काही निर्णय या खात्याला मागेही घ्यावे लागले आहेत. अशा या खात्यामध्ये बुद्धिबळ आणि त्यात भारताची मान उंच करणारा विश्वनाथन आनंद याची काही पत्रास वाटावी अशी अपेक्षाच करता येत नाही. या खात्यामध्ये विश्वनाथन आनंद नक्की कोण आहे याची माहिती नसलेल्या लोकांची भरती झाली आहे. त्यामुळे आपल्या हातातली लेखणी लोकांची सेवा करण्यासाठी नसून लोकांना टोचे मारण्यासाठी आहे, अशा भ्रमात वावरणार्या बाबूंनी विश्वनाथन आनंद यांच्या बाबतीत दारूच्या नशेत करावा तसा व्यवहार केला.
हैदराबाद विद्यापीठाने विश्वनाथन आनंद याला सन्माननीय डॉक्टरेट पदवी देण्याचा
निर्णय घेतला. विद्यापीठाचा हा निर्णय योग्यच आहे. कारण विश्वनाथन आनंदने भारताला अनेक बुद्धिबळ स्पर्धांमध्ये आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवून दिले आहेतच, पण चार वेळा विश्व विजेतेपद मिळवले आहे. या विद्यापीठाने सरकारी कामकाजाचा एक भाग म्हणून डॉक्टरेट पदवी देण्यासाठी मनुष्यबळ विकास खात्याची परवानगी मागितली. वास्तविक पाहता या खात्याने ही परवानगी ताबडतोब द्यायला हवी होती. कारण या पदवीदानामध्ये हरकत घेण्यासारखे काहीही नाही. तसे काही असते तर २००७ साली भारत सरकारने विश्वनाथन आनंदला पद्मविभूषण किताब दिलाच नसता. ज्याअर्थी आपले सरकार या बुद्धिबळपटूला भारतरत्नच्या खालोखाल मानाचा समजला जाणारा हा किताब देते त्याअर्थी त्याला कोणताही किताब किवा पुरस्कार देण्यात अडचण असता कामा नये. परंतु मनुष्यबळ विकास खात्यातल्या खोडसाळ अधिकार्यांनी आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे त्याची चौकशी सुरू केली आणि या चौकशीच्या उपद्व्यापाचा परिणाम म्हणून हैदराबादमध्ये अप्रिय प्रकार घडला. विश्वनाथन आनंद स्पेनमध्ये राहत असल्याने तो भारतीय नागरिक नसून स्पॅनिश असल्याचा आगळावेगळा शोध या खात्याने लावला. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली. या संतापजनक प्रकारामुळे विश्वनाथन आनंदने डॉक्टरेट स्वीकरण्यासच नकार दिला. मात्र, कपिल सिब्बल यांनी दूरध्वनीवरून माफी मागितल्याने आनंदने निर्णय मागे घेतला. या सर्व प्रकारातून मनुष्यबळ विकास खात्याच्या कारभाराबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वास्तविक, या चौकशीची फाईल मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांच्याकडे २२ मे रोजी आली होती, असे खुद्द सिब्बल यांनी सांगितले. म्हणजे विश्वनाथन आनंद याचा अवमान करणारी ही चौकशी आपल्या खात्यात सुरू झालेली आहे हे खुद्द मंत्र्यांना मे मध्ये माहीत झाले होते आणि तरीही ती फाईल क्लिअर व्हायला तीन महिने लागले. म्हणजे मनुष्यबळ विकास खात्यातल्या असंवेदनशील व्यवहाराचा फटका तर या भारतीय आदर्श खेळाडूला बसला आहेच, पण लालफीत आणि दिरंगाई यांचाही फटका बसला आहे. विश्वनाथन आनंद याची पत्नी अरुणाने दिलेल्या माहितीनुसार मनुष्यबळ विकास खात्याने विश्वनाथन आनंदकडे मागच्या चार-पाच महिन्यांपूर्वीच पासपोर्ट मागितला होता. विश्वनाथन आनंद यांच्याकडे भारतीय पासपोर्ट आहे आणि तो जगभर फिरत असला तरी त्याच पासपोर्टवर फिरत असतो. त्यामुळे त्याला पासपोर्ट पाठविण्यात काही अडचण वाटली नाही आणि त्याने तो मनुष्यबळ विकास खात्याकडे फॅक्सद्वारे पाठविला. याउपर सुद्धा आतल्या आत झालेली ही अपमानास्पद चौकशी दडवून ठेवून का होईना परंतु एखाद्या दुसर्या महिन्यामध्ये हे सारे प्रकरण निर्णयाच्या अवस्थेला यायला हवे होते. मात्र, दिरंगाईच्या कार्यपद्धतीमुळे डॉक्टरेट पदवी देण्याचा दिवस जवळ आला तरी या अधिकार्यांची झोप उडाली नाही आणि शेवटच्या क्षणापर्यंत लेखणीचे टोचे मारण्याचे प्रकार सुरूच राहिले. त्यामुळे अशा वादग्रस्त परिस्थितीत असली डॉक्टरेट पदवी न घेतलेलीच बरी, असा निर्णय घेऊन, हैदराबादच्या मॅथेमॅटिकल कॉन्फरन्सचा कार्यक्रम संपवून विश्वनाथन आनंद स्पेनला रवाना झाला. तो गेल्या काही वर्षांपासून भारताचा खेळाडू म्हणूनच खेळत आहे. तो जेव्हा खेळायला बसतो तेव्हा त्याच्या बाजूला तिरंगा ध्वज ठेवलेला असतो आणि तो जिंकतो तेव्हा ‘भारताच्या विश्वनाथन आनंदचा विजय’ अशीच बातमी प्र
सिद्ध होत असते. हे सारे मनुष्यबळ खात्यातल्या कारभार्यांना माहित असायला हवे. परंतु असे असूनही त्यांची बाबूगिरी सुरूच राहिली आणि भारताचा सर्वोच्च दर्जाचा खेळाडू या असंवेदनशील व्यवहाराचा बळी ठरला.
मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी यावर त्याची माफी मागितली आहे. मात्र पत्रकारांसमोर सारवासारवी करताना त्यांनी काही घडलेले नाही, असे म्हटले आहे. त्यांनी कितीही खुलासे केले तरी ज्या अर्थी त्यांनी माफी मागितली त्याअर्थी त्यांच्या खात्यामध्ये आनंदचा अपमान व्हावा असे काही तरी नक्कीच घडलेले आहे. विश्वनाथन आनंद याने आता जरी हा कार्यक्रम रद्द केला असला तरी पुन्हा कधी तरी हा
कार्यक्रम होणार आहे. तो चांगल्याप्रकारे व्हावा आणि या निर्बुद्ध अधिकार्यांनी केलेल्या या व्यवहारामुळे भारतीय खेळप्रेमी
नागरिकांच्या मनाला झालेली जखम भरून यावी एवढीच अपेक्षा आहे.
(अद्वैत फीचर्स)
— ऋजुता जोशी
Leave a Reply