मी याचे नामकरण केले नाही व करू इच्छीत नाही. कारण तो अभिमानाला, वासनेला जागे करील. पुन्हा विचारचक्र सुरू होतील. मला एका सत्यमय वातावरणामधून संसारीक अर्थात मिथ्या जगांत नेईल. हे होणारच कारण मला माझ्या अल्प क्षमतेचे व अल्प अशा वर्तमान काळाची जाणीव आहे. ईश्वर जो जसा असेल, त्याला जाणण्यासाठी मानवी इंद्रिये परीपूर्ण नाहीत. त्यांच्या मर्यादा, झेप,क्षमता ह्या अत्यंत अल्प आहेत. त्यामध्ये तो दिव्यपणा प्राप्त नाही की ज्यामुळे त्या परमात्म्याची, त्याच्या भव्यतेची जाणीव होवू शकेल. जर तो सर्व चराचरामध्ये जीव जंतूमध्ये मानवी देहामध्येही अंश रूपाने असेल तर त्याला आपल्याच अंत:करणात शोधणे वा समजणे योग्य होईल. हा प्रयत्न दिशाहीन खचितच नसेल. ह्याचसाठी “मी कोण आहे?” ह्याचे ज्ञान होणे अत्यंत गरजेचे आहे. त्या मी च्या शोधासाठी अंतरंगात शिरणे हे प्रथम व महत्वाचे पंचेद्रिय हे कोणत्याही गोष्टीबद्दल ज्ञान मिळवतात म्हणजे त्यातील गुणाविषयी समरस होतात, त्याचे रंग, रूप, स्पर्श, रस, गंध इत्यादी समजतात. मग ते भव्य दिव्य असोत वा सूक्ष्म स्थितीमध्ये असोत वस्तूची वा त्या दिव्यतेची जाण येणे हे शेवटी आपल्यावर कसा परिणाम करते ह्यावरच मुख्यता अवलंबून असेल.
ईश्वर भेटला, दिसला वा जाणला गेला हे जर सत्य घडले तर तेव्हाच जेव्हा मनाच्या आनंदाची, शांततेची, समाधानाची अस्सीम बरसात तुमच्यावर होईल. ह्या संसारीक जगांत ज्या ज्या गोष्टीमुळे तुम्हास प्रसन्नता वाटते त्या त्या गोष्टीमध्ये ईश्वराचे अस्तित्व असतेच. त्या अस्तित्वाची जाणीव प्रखरतेने होते. म्हणजेच तुम्ही ईश्वराच्या सानिध्यात जात आहात असे होईल. तेच तुमचे लक्ष साध्य असावे.
जे मिळाले त्याहून आणखी काही असेल का? हा प्रश्न तुमच्या मनी येत राहणे म्हणजेच अशांत, असमाधानी मनाला जागृत ठेवण्यासारखेच होईल. त्याला अंत असणार नाही. जर ईश्वर अनंत, अमर्याद असा असेल, तर तो मनाच्याही कल्पनेच्या बाहेर भव्यता पावलेला असेल. तुम्हास तुमच्या मनाच्या बुध्दीच्या विचाराने त्याला जाणणे शक्यच नाही. हा तुमच्या जाणीवेने त्याचे जे अवलोकन झाले असेल, ज्या नितांत अशा आनंदाचा (Extary of joy) अनुभव आला असेल, तोच समजा. सभोवतालच्या आणि संसारीक जीवनामधल्या सुखमय गोष्टींनी तुम्हास आनंद मिळाला असेल. तुम्ही समाधानी झाला असेल. ह्यापेक्षा जर जास्त आनंद तुम्हास त्या ईश्वरी जाणीवांमुळे झाला असेल तर तेच तुमचे ईश्वरी दर्शन समजा. वाचलेल्या, ऐकलेल्या आणि इतरांच्या त्यांच्या स्वत: अनुभवलेल्या ईश्वरी सगुण दर्शनाची कल्पना वा इच्छा तुम्हास पूर्णपणे सोडून घ्यावी लागेल. कारण ते तसे दर्शन म्हणजे तुमचे इच्छीत, अपेक्षीत दर्शन असेल. कदाचित त्यांनी आनंद व समाधान मिळेलही परंतू त्यात मनाची शांतता नसेल. पुन्हा पुन्हा तेच दर्शन मिळेल ह्याची आस असेल. तेथेच साशंकता निर्माण होईल. आत्मीक समाधान टिकणारे नसेल.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply