3 सप्टेंबर 1882 रोजी लंडनच्या एका उपनगरात जन्माला आलेले एक बालक पुढे इंग्लिश क्रिकेट संघाचा कर्णधार बनले. जॉनी विल्यम हेन्री टायलर डग्लस (जेडब्ल्यूएचटी) त्याचं नाव. त्याचे वडील एक विख्यात मुष्टियुद्धपटू होते आणि त्याचा भाऊ मुष्टियुद्धाच्या सामन्यांमध्ये पंचाचे काम करी.
1920-21च्या हंगामात ऑस्ट्रेलिया दौर्यावरील इंग्लिश संघाने मलिकेतील पाचीच्या पाची कसोट्या गमावल्या होत्या तेव्हा जॉनी कर्णधार होता ! पहिल्या महायुद्धामुळे इंग्लिश प्रथमश्रेणी क्रिकेट गोत्यात आले होते आणि 5-0 असा पराभव हा त्याचाच परिपाक होता. 1911-12च्या हंगामातील दौर्यात जॉनी विजयी कर्णधार होता, नवखा असूनही. 4-1 असा विजय इंग्लंडने तेव्हा मिळविला होता. सिडनी कसोटीत इंग्लिश संघ पराभूत झाला होता. आपला नेहमीचा गोलंदाज सिडनी बार्न्सला सोडून जॉनीने त्या कसोटीत गोलंदाजीची सुरुवात केली होती. सिडही कच्च्या गुरुचा चेला नव्हता. कप्तानाला भर मैदानावर तो कचाकचा बोलला आणि गोलंदाजी करण्यासाठी जॉनीने पुन्हा चेंडू हातात घेतला नाही. सिडच्या धैर्याचे केवळ कौतुकच केले जाऊ शकेल – 1908च्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये (लंडन) जॉनीने अंतिम फेरीत स्नोवी बेकर या ऑस्ट्रेलियाई खेळाडूला पराभूत करून मध्यम वजनगटातील मुष्टियुद्धाचे विजेतेपद मिळविले होते !
काही वेळा जॉनी डग्लस अत्यंत संथ गतीने धावा जमवी. ऑस्ट्रेलियाई जनतेने त्याच्या आद्याक्षरांचा वेगळाच अर्थ लावला होता – जेडब्ल्यूएचटी = जॉनी वोन्ट हिट टुडे ! यातील ‘हिट’ त्याच्या बॉक्सिंगला उद्देशून मारलेला ठोसा होता !
1930च्या डिसेंबर महिन्यात डेन्मार्कच्या सागरी हद्दीत दोन जहाजांची (समुद्रात) टक्कर झाली. या जहाजांचे कप्तान एकमेकांचे भाऊ होते आणि क्रिस्मसच्या शुभेच्छा एकमेकांना देण्याचा ते प्रयत्न करीत होते. फिनलंडमधून लाकूडफाटा आणण्यासाठी ते गेलेले होते. आसमंत धुकाळलेला होता. ओबेरॉन नावाच्या जहाजावरील जॉनी डग्लस हा मानव पाण्यात बुडून मृत्यू पावला. एका प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार आणि मरणोत्तर
चिकित्सेनुसार जॉनी आपल्या वडलांना वाचविण्याच्या
प्रयत्नात बुडाला असावा असे दिसते.
3 सप्टेंबर 1975 – इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या सर्वात ‘लांब’ प्रथमश्रेणी सामन्याचा या दिवशी शेवट झाला. 1975 सालच्या अॅशेस मालिकेतील अखेरचा सामना उभय कर्णधारांच्या संमतीनुसार मालिकेचा निकाल ‘लावण्यासाठी’ गरज भासल्यास सहा दिवस खेळविण्याचे ठरले होते. तशी गरजही भासली पण 32 तासांहून अधिक काळ चाललेला हा सामना अनिर्णित राहिला. यजमानांवर फॉलोऑनची नामुष्की ओढवली होती पण बॉब वुल्मरच्या 149 धावांमुळे इंग्लंडने सामना वाचवला.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply