आमच्या बॅंकेच्या लोन डिफॉल्टरच्या लिस्टवर दर तीन महिन्यानी सही करायचे काम फिल्ड ऑफिसर म्हणुन माझ्याकडेच आहे , सहसा मी या यादीवर नुसती नजर टाकतो , आणि सही करुन टाकतो . यात विशेष असे काहीच बघण्यासारखे नसते. ही लिस्ट आमच्या रिकव्हरी एजन्सीकडे जाते , आणि ती एजन्सी येन केन प्रकारेण लोनची रिकव्हरी करुन बॅंकेत भरते. याबद्दल काही पर्सेंटेज रिकव्हरी एजन्सीला मिळते . आज मात्र या यादीत गजानन बंडोपंत कुलकर्णी हे नाव बघुन माझा हात थबकला. या महाशयांनी तीन महिन्यांचा कार लोनचा हप्ता चुकवला होता .हे महाशय म्हणजे माझा परममित्र गजा . वर्षभरापुर्वीच हे कारलोन घेण्यासाठी मी गजाला मदत केली होती . तसे गजा आणि त्याची बायको स्नेहा चांगल्या नोकरीत आहेत . गजा इंजिनियरींग कॉलेजला प्रोफेसर आहे , तर बायको सॉफ्टवेअर ऍनालिस्ट . दोघांनाही अत्यंत चांगला पगार आहे. त्यावरच गजाने तीन वर्षापुर्वी साठ लाखांचे घर घेतले होते , आणि मागच्या वर्षी कारलोन घेऊन होंडा सिटी घेतली . तिचाच हप्ता आता थकला होता .कारण काही कळाले नव्हते . गजाची पण बर्याच दिवसात भेट नव्हती . संध्याकाळी मी गजाच्या घरी जायचे ठरवले , आणि त्या लिस्टवर सही केली . अर्थात त्या आधी गजाच्या नावापुढे फुली मारायला मी विसरलो नव्हतो . काही प्रतिष्ठित ग्राहकांना आमची बॅंक थोडा वेळ देते , आणि त्यांच्या अडचणीपण समजावुन घेते . फिल्ड ऑफिसर म्हणुन एवढा अधिकार माझ्याकडे आहे.
’ क्लाउड नाइन ‘ या गेटेड कम्युनिटीमधे गजाचे घर आहे. स्विमिंग पुलापासुन जॅकुजीपर्यंत सर्व सुविधा या अपार्टमेंटमधे आहेत. गाडी लावली आणि गजाच्या घराची बेल वाजवली . बागेकडे माझे लक्ष गेले , गजाने बागेत अत्यंत सुंदर झाडे लावली होती. मोगर्याचा फुलांचा घमघमाट सुटला होता. गजाने दार उघडले .
” अरे तू , ये बस बस . “ गजा लुंगी आणि बनियनवरच होता . कितीही मोठा झाला तरी माणसाच्या काही सवयी बदलत नाहीत .
” बर्याच दिवसात घरी आला नाहीस ? इकडे आलो होतो , म्हटलं जरा चक्कर टाकावी . कसा आहेस ? “
” मजेत . मधे तु काय आठ दिवस दिल्लीला होतास म्हणे . स्नेहा सांगत होती . तिची आणि वहिनींची मार्केटमधे भेट झाली होती. “
” हो , गौरी म्हणाली मला . ‘ कस्टमर सॅटिसफॅक्शनच ‘ ट्रेनिंग होतं दिल्लीला . नेमकं मला पाठवलं बॅंकेनी . तुला सांगतो गजा , या ट्रेनिंग म्हणजे नुसता वैताग बघ ! या एमबीए मुलांपेक्षा आपल्या शाळेतले शिक्षक बरे. ते रागवायचे , पण किमान त्यावेळेला त्यांच्या चेहेर्यावर रागवण्याचा अविर्भाव तरी असायचा . ही एमबीए मंडळी अत्यंत सुतकी चेहेर्याने प्रेझेंटेशन करतात . आपलच सॅटिसफॅक्शन होत नाही , कस्टमरचं काय होणार बोडख्याच ! ”
यावर मी आणि गजा खदाखदा हसलो.
” बरं काय घेणार चहा , की कॉफी ? “
” चहा चालेल .”
“ स्नेहा , दोन कप चहा टाक गं , सागर आलाय “.
मधुन जोरात भांडी आपटण्याचा आवाज आला , आणि नंतर चहासुध्दा गजाच जाउन घेउन आला , मी ओळखले , नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे . चहा पिला थोड्याफार गप्पा मारल्या , आणि मी निघालो. गेटचे दार लावताना गजाला विचारले ,
” गजा , इज एव्हरीथिंग ओके ? “
” सागर , एक्चुअली थोडा प्रॉब्लेम झालाय. ” गजाचा आवाज खोल गेला .
“ कॅन आय हेल्प यु ? “
” आपण उद्या दुपारी भेटु . मी बॅंकेत येतो “ . गजा म्हणाला .
” ओके . टेक केअर . “ मी गजाच्या खांद्यावर थोपटत म्हणालो.
दुसर्या दिवशी कामात लक्षच लागेना . दुपारची वाट बघत बसुन राहिलो . एक वाजता गजा आला .
” सागर आपण बाहेरच लंचलाच जाउ या . आर यु फ्री ? “
” या शुअर . जरा पाच मिनिट थांबतोस ? मी चाव्या साहेबांकडे देउन येतो. “
“ प्लीज कंटीन्यू .”
साहेबांना चाव्या दिल्या आणि बॅंकेसमोरच्याच एका चांगल्यापैकी हॉटेलात गेलो . ऑर्डर दिली .
” आता बोल गजा . काय प्रॉब्लेम ? “
” अरे एक्चुअली – काय झालय ? स्नेहाला त्यांच्या कंपनीने पिंक स्लिप दिलीये . “
“ मग ? “
” मग काय ? त्याचा अर्थ आपण रिझाइन करायच किंवा एक महिन्याने कंपनी आपल्याला काढुन टाकणार .”
” का ? “
” का काय बाबा, त्यांच्या कंपनीचे सर्व क्लायंटस युएसचे . त्यांच्याकडे आलय रिसेशन. त्याचा फटका बसतोय आम्हाला . “
” अरे पण एवढ काय त्यात ? “
” तुला कळणार नाही सागर , तु अजुन होमलोन घेतल नाहियेस ना , मी तीन वर्षांपुर्वी साठ लाखाच लोन काढुन घर घेतलय . त्याचा हप्ता मला पन्नास हजार येतोय . तो मी माझ्या पगारातुन भरतो. तोपण थोडाथोडका नाही वीस वर्ष भरायचाय . तो भरल्यानंतर दहा हजार रुपये उरतात . मागच्या वर्षी स्नेहाच्या सॅलरीवर कारलोन घेउन होंडासिटी घेतली. तिचा हप्ता वीस हजार रुपये जातो . तिच्या पगारातले पंधरा हजार उरतात , अशा पंचवीस हजारात आमचा महिना भागतो .”
” ओके .”
” तुला खरे वाटणार नाही , इतक्या वर्षांची सर्विस झाल्यावरपण पाच पैशाचीही सेव्हिंग माझ्याकडे नाही . सगळ काही क्रेडिटवर आहे . तुला माहित आहे , मागच्या तीन महिन्यापासुन कारलोनचा हप्ताही भरला नाहीये मी .”
मला ही गोष्ट माहित असल्याचे मी बोललो नाही . गजा अत्यंत भावनाविवश झाला होता .
” आणि आता या नविन लाइफस्टाइलची इतकी सवय झालीये , दर रविवारी कंपल्सरी मल्टीप्लेक्सला जातो , रविवारी घरी जेवण बनवत नाही , बाहेर साधं हॉटेल चालत नाही , थ्री स्टार लागतं , दरवर्षी हॉलिडेला जावच लागत , इव्हन सोनुलापण या सर्वांची सवय झालीये. माहितीये , काल शाळेत रिक्शातुन जा म्हणालो तर गेला नाही . गाडी नसेल तर शाळेत जाणार नाही म्हणाला . अजुन चार वर्षाचा झाला नाही आणि याचे नखरे बघा .”
” त्याच्यावर काय चिडतोयंस गजा ? ही सवय तुम्हीच लावली ना त्याला ? “
” होय रे बाबा , तेच चुकलेय . बर त्याचेच नाही , स्नेहाचेपण तसेच . महागड्या साड्या , मॉलमधे शॉपिंग , महागडी परफ्युम्स , आमच्या घरात ब्रॅंडेड वस्तुंना फार महत्व आलयं . सकाळच दुधपण साधं चालत नाही , ब्रॅंडेड लागतं .”
“गजा चिडु नकोस . हे बघ ,या सगळ्या सवयी तूच लावल्यांस ना त्याला . मग बदल . त्यात अवघड ते काय आहे ? “
” सागर ही वेळ तुझ्यावर आली नाहियेना , म्हणुन तु सल्ला देतोयस ,एकवेळ संपुर्ण माणुसच बदलणे शक्य आहे , पण त्याच्या सवयी , अशक्य ! “
” हे बघ, स्नेहाशी एकदा समोर बसुन बोल , तिला परिस्थितीची कल्पना दे . ती समजुतदार आहे , मला वाटतय ती समजावुन घेईल. “
“सगळे प्रकार झाले सागर , म्हणुनच मी म्हणालो ना , माणसाच्या सवयी बदलणे ,अशक्य ! ती बदलायला तयार नाही . मीच चुकलो , पुर्वी लहान घरात मी सुखी होतो , थोडाचा पैसा आला आणि मी वाहावत गेलो . या वर्षी ईन्क्रीमेंट मिळाले ,या एवढ्या गोष्टीवरच खुश राहिलो. पुढच्या आयुष्याचा काडीचाही विचार केला नाही , आणि स्वतःवर ही वेळ आणुन घेतली .”
“मला वाटतय , तु तिच्याशी एकदा मोकळेपणाने बोलावस . आणि सर्व परिस्थीती समजावुन सांगावीस . मी गजाच्या हातावर हात ठेवत म्हणालो .”
“ट्राय करतो .”
जेवण करुन गजा गेला . बिल देउन मी बॅंकेत आलो. फारफारतर दोन महिने मी गजाच्या कारलोनची रिकव्हरी थांबवू शकलो असतो. त्यानंतर मात्र काहीही माझ्या हातात नव्हते .
संध्याकाळी घरी आलो. फ्रेश झालो . पेपर हातात घेउन बसलो.गौरी म्हणाली
“उद्या आमीरचा थ्री इडियटस आयनॉक्सला लागतोय . मी तिकीट बुक करायला सांगितलीयेत . नंतर बाहेरच जेवण करुन घरी येउ.”
मी चरकलो .डोळ्यासमोर गजा उभा राहीला.
“माझा मुड नाहिये ग . आपण उद्या नको, पुढच्या आठवड्यात जाउ . एखाद्या आठवड्यात बाहेर पिक्चरला आणि जेवायला नाही गेलो तर काही बिघडत नाही .”
“ते काही नाही . मला शक्य नाही . मी उद्या स्वयंपाक करणार नाही . आणि रविवारी बाहेर जेवायला नेले नाही तर पिंटु रडुन गोंधळ घालतो. त्यामुळे तुम्हाला काय करायचे ते करा , मी जाणार म्हणजे जाणारच ..”
ताडताड पाय आपटत गौरी मधे निघुन गेली. मला गजाचे शब्द आठवले
‘ एकवेळ माणसेच बदलणे शक्य आहे पण त्यांना लागलेल्या सवयी ,अशक्य ! ‘
या बदलत्या जगाने माझेच घर कधी विळख्यात घेतले होते , माझे मलाच कळाले नव्हते !
— निखिल मुदगलकर
Leave a Reply