कधी बदलत्या ऋतुचक्रामुळे तर कधी धूर,धूळ आणि प्रदूषणामुळे सर्दी खोकल्याचा त्रास वारंवार होतो, अशावेळी बाजारात मिळणारी कफ सिरप्स घेतल्याने शरीरावर घातक परिणामांची शक्यता तर असते आणि त्याने दिवसभर झोपही येते मग अशावेळी तुमच्या स्वयंपाकघरातील काही घटकच कोणताही दुष्परिणाम न करता तुमचा सर्दी खोकला दूर करु शकले तर ?
लसूण:
लसणात एन्टीऑक्सिडन्ट गुणधर्म असून सर्दी खोकल्यावर ते अत्यंत प्रभावशाली आहे. लसुणामधील ‘आलाय्झीन ‘ हा घटक जंतूंचा नाश करतो .
टीप १ -जर तुमचा कान दुखत असेल तर तुम्हाला घश्यात इन्फेक्शन असण्याची शक्यता आहे,ज्यामुळे तुम्हाला कालांतराने सर्दी खोकला होऊ शकतो . अशावेळी काही लसणाच्या पाकळ्या घ्या, त्या ठेचून कापडात बांधा व कानात वरच्यावर ठेवा . त्या कानात खाली जाणार नाहीत याची काळजी घ्या.
टीप २ -लसणाच्या ४-५ पाकळ्या ठेचून त्या तुपात परतून खा. हा सर्दी खोकल्यावरील एक सोपा उपाय आहे. याव्यतिरिक्त ४ लसणाच्या पाकळ्या , २ टोमॅटो व एका लिंबाचा रस काढून तो घेतल्यास इन्फेक्शन दूर होण्यास मदत होते. असेच तुम्ही लसूण व टोमॅटोचे एकत्र सूप बनवून त्यात थोडेसे मीठ टाकून पिऊ शकता .
हळद :
स्वयंपाकघरातील अत्यंत गुणकारी आणि बहुगुणी हळद सर्दी – खोकल्यापासून चटकन आराम देते.
टीप १ -घशाच्या खवखवीवर हळद अत्यंत उपयुक्त आहे. मुळातच हळद जंतुनाशक असल्याने ती संसर्ग वाढू देत नाही. ग्लासभर गरम दुधात चिमुटभर हळद व साखर किंवा मध घालून दुध प्या . हे दुध सर्दी – खोकला दूर करते त्याचबरोबर तुम्हाला दिवसभर उर्जा देते.
टीप २ -हळदीचा चहासुद्धा सर्दी – खोकल्याला प्रतिबंध करतो. या चहासाठी चार कप पाण्यात एक छोटा चमचा हळद टाकून उकळा. १० मिनिटांनंतर तो गळून घ्या व त्यात थोडेसे मध व लिंबू पिळून प्या . यामध्ये उकळताना तुम्ही तुळशीच्या पानांचादेखील वापर करू शकता.
टीप ३-चमचाभर हळद व मध एकत्र करून त्याचे चाटण तुम्ही दिवसातून तीनदा घेतल्यास, तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.
आयुर्वेदिक काढा:
हळदीच्या चहाप्रमाणेच गवती चहा , आलं , लवंग , काळामिरी व दालचिनी यांचा एकत्र काढा सर्दी खोकला बरं करतो तसेच शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवतो.
टीप १ -चार वेलची , काळामिरीचे दाणे, लवंगा , ताजं आलं व दालचिनीचा छोटा तुकडा पातेल्याभर पाण्यात टाकून मंद आचेवर १० -१५ मिनिटे उकळा . उकळताना पातेल्यावर झाकण ठेवा . त्यानंतर मिश्रण गाळून ते गरम गरम प्या. गोडव्यासाठी त्यात थोडेसे मध घाला.
टीप २ -१५-२० तुळशीची पाने दीड कप पाण्यात उकळा . दहा मिनिटांनी हे मिश्रण गाळून त्यात चमचाभर लिंबाचा रस मिक्स करा . यातील व्हिटामिन सी व तुळस तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवते .
टीप ३-कडूलिंब व मधाचा वापर करून तुम्ही घरच्या घरी गुळण्या करू शकता. ग्लासभर पाण्यात २-३ कडलिंबाची पाने टाकून उकळा हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात चमचाभर मध घालून त्या पाण्याने गुळण्या करा.
कंठसुधारक वडी
आज काल घशातील खवखव , सर्दी यासाठी अनेक गोळ्या बाजारात उपलब्ध आहेत मात्र आयुर्वेदाचा उगम असलेल्या भारतात पूर्वीपासून अनेक प्रकारच्या कंठसुधारक वड्या ह्या घरीच बनवल्या जात असत. ज्यामुळे सर्दी , खोकला सारख्या आजारांवर घरच्या घरीच सहज विजय मिळवता येत असे
कशी कराल कंठसुधारक वडी ?
आलं बारीक कापून त्याचा रस काढून घ्या त्यात काळामिरीच्या दाण्यांची भाजून केलेली पावडर , थोडे मध व चिमुटभर हळद टाका . हे मिश्रण एकत्र करून त्याचा लहान गोळ्या तयार करा. ह्या गोळ्या १०-१५ मिनिटे चघळा , असे दिवसातून तीनवेळेस केल्यास तुम्हाला सर्दी खोकल्यापासून आराम मिळेल .
कफजन्य खोकला
कफजन्य खोकल्यापासून वेळेत आराम मिळवणे फार गरजेचे आहे . कफजन्य खोकला हा साध्या संसर्गापासून अगदी ब्राँकायटिस , न्यूमोनिया व क्षयरोगासारख्या आजाराचे एक प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे जर तुमचा खोकला आठवडाभरापेक्षा अधिक काळ टिकला तर डॉक्टरकडे जाणे आवश्यक आहे.
टीप १-चार पाच मिरीचे दाणे , थोडे जिरे व गुळ पाण्यात एकत्र करून हे मिश्रण उकळा . हे मिश्रण एकजीव झाल्यावर गॅस बंद करा व थोडे थंड करून प्या . यामुळे तुमचा खोकला कमी होण्यास मदत होईल .
टीप २-सुपारीची पाने कुटून रस काढून घ्या. या २ चमचे रसात एक चमचा मध घालून रोज दोनदा जेवणानंतर अर्ध्या तासाने घ्या . यामुळे कफाच्या खोकल्यापासून आराम मिळण्यास मदत होइल
Leave a Reply