एक मजेदार गोष्ट आहे. सिसीली मधील एक राज्य सेरक्युज. तिथला ख्रिस्तपुर्व तिसऱ्या शतकातला राजा हिरो-II. त्याच्या दरबारात एक अवलिया होता. आर्किमिडीज त्याचं नाव. राजानं सोन्याचा एक सुंदर नक्षीदार मुकुट बनवून घेतला होता. पण सोनारानं लबाडी करून त्यात भेसळ केली असावी असा संशय त्याला आला. हे खरं की खोटं हे शोधून काढायचं कठीण काम त्यानं आर्किमिडीजला दिलं. त्या काळच्या तंत्रज्ञानानुसार सोन्याचा खरेपणा शोधायचे दोनच रूढ मार्ग होते, एकतर भट्टीत टाकून तापवून नाहीतर तीव्र आम्लामध्ये बुडवून पहाणं. दोन्हीमध्ये तो सुंदर नक्षीदार मुकुट खराब होणार. निदान तशी शक्यता होतीच. तसे न करता त्यातील सोन्याचा कस कसा मोजायचा हे एक फक्त आर्किमिडीजलाच नव्हे तर दरबारातील साऱ्याच विद्वत्तेपुढे आव्हान होते. त्यासाठी सोन्याच्या तिस-याच कुठल्यातरी गुणधर्माचा उपयोग करता येईल कां असा विचार आर्किमिडीज करीत होता. पाण्याच्या टबात उतरल्याबरोबर त्याला पाण्याच्या उध्दरणशक्तीची जाणीव झाली व त्याचा उपयोग सोन्याची घनता मोजण्यासाठी करता येईल ही नामी कल्पना सुचली. मनावरील एक मोठे दडपण उतरल्यामुळे त्याला इतका आनंद झाला की अंगावर कपडे चढवण्याचं सुध्दा भान राहिलं नाही. कुठल्याही कारणाने अत्यंत भावनावेग झाला की माणसाचं देहभानसुध्दा हरपतं. “युरेका ! युरेका !” असं ओरडतच तो राजाच्या दरबारात हजर झाला. आणि ….. आर्किमिडीजने द्रवाच्या उध्दरणशक्तीचा शोध लावला.”
गोष्ट आर्किमिडीजचीही नाही आणि द्रवाच्या उद्धरणशक्तीचीही नाही. सेरक्युजचा तिसऱ्या शतकातला राजा हिरो-II ची तर नाहीच नाही. गोष्ट आहे ती त्या सुंदर नक्षीदार मुकुटाची. मुकुटाचं सौंदर्य असं की त्यापुढे सोन्यासारख्या मौल्यवान धातुचं मोल देखील कमी झालं. त्याची शुद्धाशुद्धता गौण ठरली. त्या सोन्यातली भेसळ शोधण्यासाठी ते सौंदर्य नष्ट करणे राजालाही परवडले नाही.
जीवनाचही असंच असतं. जीवनातलं सौंदर्य जपण्यासाठी त्यातल्या शुद्धाशुद्धतेला कसलाही कस लावणं कोणालाच परवडणारं नाही.
पहा थोडा सारासार विचार करून. आणि …. सांगा कशी वाटली ही गोष्ट ?
— अशोक तपासे
Leave a Reply