हिंगोली येथील जलस्वराज्य प्रकल्पाने सौर ऊर्जेव्दारे पाण्याची मोटार चालविण्याचा यशस्वी प्रयोग करुन वीजेच्या भारनियमनावर मात केली आहे. त्यामुळे शेतकर्यांना नवी स्फूर्ती मिळाली आहे.राज्यात सध्या भरपूर पाऊस पडत आहे. त्यामुळे भारनियमन कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात १० ते १२ तासांचे भारनियमन होत असल्याने शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळायचे. वीज आलीच तर अत्यंत कमी दाबाने यायची. त्यामुळे शेतावरील विद्युत मोटार चालत नसे. मग वाट पाहण्याशिवाय पर्यायच नसे. पण सौर ऊर्जेच्या या उपकरणाने शेतकर्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण केली आहे.शेतकरी हा नेहमीच नैसर्गिक आपत्तीत भरडला जातो. त्यात भारनियमनाची भर पडते. वीज पुरवठा किती तासांनी सुरळीत होईल? झालाच तर विद्युत मोटार चालेल का? मोटार चालली नाही तर पिकाला पाणी कसे द्यायचे? या विवंचनेत तो असतो. दरवर्षी वाढणारा कर्जाचा डोंगर आणि नैसर्गिक आपत्ती हा प्रश्न त्यांच्यापुढे आ वासून उभा राहतो. जलस्वराज्य प्रकल्पाने या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी विविध प्रयोग केले. हिंगोली येथील जलस्वराज्य प्रकल्प कार्यालयाचे गटप्रमुख डॉ. गोविंद जवादे यांनी सौर ऊर्जेव्दारे पाण्याची मोटार चालविण्याचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सौर ऊर्जेसंदर्भातील विदेशी साहित्यही मागवून घेतले. हिंगोली तालुक्यातील खानापूर चित्ता व औंढा तालुक्यातील काकडधाबा या दोन गावातील प्रत्येकी एका शेतकर्याच्या विहिरीची या प्रयोगासाठी निवड केली १४ ऑगस्ट रोजी विहिरीवर सोलार ऊर्जेव्दारे ९०० वॅट वीज निर्माण करुन पाण्याची मोटार चालू केली.या मोटारीच्या माध्यमातून पाईपलाईनव्दारे दीड कि.मी. पर्यंत पाणी गेले. सूर्यप्रकाश कमी असल्याने विजेची क्षमता वाढली नाही. ९०० वॅटची क्षमता वाढविण्यासाठी
ौर ऊर्जेचे आणखी ४ पॅनल वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. हे पॅनल वाढल्यानंतर एकूण १२०० वॅट विजेची निर्मिती होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त दूरपर्यंत पाणी पोहोचेल अशी त्यांची अपेक्षा
आहे. सौर ऊर्जेव्दारे ५० फूट उंचीवर
असलेल्या टाकीमध्ये पाणी सोडण्याचे आमचे ध्येय असल्याचे डॉ. जवादे यांनी सांगितले. आणखी माहिती देताना ते म्हणतात, पाणी टंचाईने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांना उन्हाळ्यामध्ये तहान भागविण्यासाठी व शेतीसाठी सौर ऊर्जेचा हा प्रकल्प राबविण्यासाठी आणखी १० ते १२ गावांमधून प्रस्ताव आले आहेत. खानापूर चित्ता गावाच्या प्रयोगाला यश मिळाल्यास उर्वरित गावांमध्ये हा प्रयोग करण्यात येणार आहे. या प्रयोगासाठी त्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी यअधिकारी रमेश माज्रीकर यांच्यासह कार्यालयातील सहकार्यांची चांगली साथ लाभली आहे. राज्यामध्ये पहिल्यांदाच हिंगोली येथील जलस्वराज्य प्रकल्प कार्यालयाने सौर ऊर्जेव्दारे पाण्याची मोटार चालविण्याचा यशस्वी प्रयोग केल्याने त्याचा राज्यातील शेतकर्यांसाठी चांगलाच उपयोग होईल.
(सौजन्यः महान्यूज)
— नेटसोअर्स
Leave a Reply