२० सप्टेंबर १९८२ या दिवशी एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या इतिहासातील पहिला त्रिक्रम घडला. अधिकृत एदिसांच्या यादीतील हा १५८ वा सामना होता. स्थळ : नियाझ स्टेडीयम, हैदराबाद, सिंध (पाकिस्तान). कांगारू कर्णधार किम ह्युजेसने नाणेकौल जिंकून यजमानांना आमंत्रण दिले. निर्धारित ४० षटकांअखेर पाकिस्तानने ६ बाद २२९ धावा केल्या.
इम्रान खानच्या जागी संघात आलेल्या जलालुद्दीनने आपल्या वैयक्तिक सातव्या षटकाच्या अखेरच्या तीन चेंडूंवर रॉड मार्श (त्रिफळा १ धाव), ब्रूस यार्डली (झे. वसिम बारी ०) आणि जेफ लॉसन (त्रिफळा ०) यांना बाद केले. कोटा पूर्ण झाला तेव्हा जलालुद्दीनचे पृथक्करण होते : ८-१-३२-४.कांगारूंचा संघ ९ बाद १७० धावाच करू शकला. १०४ धावा काढणारा मोहसिन खान सामनावीर ठरला हे आश्चर्यच मानावे लागेल. जलालुद्दिनची कारकीर्द सुटसुटीत आहे : ६ कसोट्या, ३ धावा केल्या, ११ बळी. ८ एदिसा, ५ धावा केल्या, १४ बळी.
भारतीय गणराज्याकडून आंतराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या मुस्लिमधर्मीय खेळाडूंची संख्या नक्कीच दोनहून अधिक आहे. पाकिस्तानी इस्लामी गणराज्याकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले हिंदू मात्र अतिशय दुर्मिळ आहेत. अशा दुर्मिळ गटाचे एक सदस्य असलेल्या अनिल दलपत सोनवरियांचा जन्म २० सप्टेंबर १९६३ रोजी झाला. वसिम बारीच्या (वरच्याच फोकसमध्ये बारीचा उल्लेख आहे) निवृत्तीनंतर ज्या अनेक यष्टीरक्षकांना पाकिस्तानने संधी दिली त्यात अनिल दलपत एक होता. १९८३-८४ च्या हंगामात इंग्लंडविरुद्ध त्यांनी कसोटी पदार्पण केले आणि अब्दुल कादिरची फिरकीही व्यवस्थित ‘घेतली’. आणखी ८ कसोटी सामन्यांमध्ये तो खेळला. एकूण ९ कसोट्यांमधून २२ झेल आणि ३ यष्टीचित. १५ एदिसांमधून १३ झेल आणि २ यष्टीचित. फलंदाजीमध्ये मात्र त्याला फारसे यश मिळू शकले नाही. अनिल दलपतचाच चुलतभाऊ पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा दुसरा
हिंदूधर्मीय ठरला. दानिश कनेरिया त्याचं नाव. काही काळासाठी तो पाकिस्तानी निवडकर्त्यांच्या पहिल्या पसंतीचा फिरकी
गोलंदाज होता.
२० सप्टेंबर १९९८अखेरचा सामना जिंकून टोरॉन्टोमधील सहारा मालिका पाकिस्तानने ४-१ अशी जिंकली. १९९७ ची मालिका भारताने ४-१ अशी जिंकली होती. भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने १११ चेंडूंमध्ये १०१ धावा केल्या होत्या पण ९७ धावा काढून पाकिस्तानच्या विजयाचा पाया घालणारा आमीर सोहेल सामनावीर ठरला.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply