२१ नोव्हेंबर १९७४ रोजी अडलेडमध्ये कॅरेन लुईझ रॉल्टनचा जन्म झाला. ऑस्ट्रेलियाकडून महिला कसोट्यांमध्ये कारकिर्दीत सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम कॅरेनच्या नावावर आहे.
साऊथ ऑस्ट्रेलियन स्कॉर्पिअन्स संघातून देशांतर्गत स्पर्धांमध्ये सहभागी होणार्यान रॉल्टनने १९९५ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळून कसोटी पदार्पण केले. तेव्हापासून ते जानेवारी २०१० मधील निवृत्तीपर्यंत अवघे १४ कसोटी सामनेच
तिच्या वाट्याला आले. महिला कसोट्या अजूनही फार कमी संख्येने खेळविल्या जातात. या १४ कसोट्यांमधून ५५.६६ च्या पारंपरिक सरासरीने कॅरेनने १,००२ धावा जमविल्या. त्यात तिच्या २ शतकांचा आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाजीमध्ये १४ बळी तिने मिळविले आहेत.
२०१० मध्ये इंग्लंडच्या शार्लोट एडवर्ड्सने १४२ वा एदिसा खेळेपर्यंत कॅरेन रॉल्टन ही सर्वाधिक एदिसा खेळणारी महिला क्रिकेटपटू होती. १४१ एदिसांमधून ४ ८. १ ४ च्या सरासरीने ४ ८ १ ४ धावा तिने जमविलेल्या आहेत. दोन विसविशीत सामन्यांमध्येही ती सहभागी होती. नाबाद ९६ ही तिची विसविशीत स्पर्धांमधील सर्वाधिक धावसंख्या विश्वविक्रमी ठरलेली आहे.
१९९७ पासून ती ऑस्ट्रेलियाई संघाची उपकर्णधार होती. २००६ मध्ये बेलिंडा क्लार्कनंतर तिच्याकडे नेतृत्व आले. एदिसा आणि कसोटी या दोन्ही प्रकारांमधील तिची पन्नासच्या आसपास असणारी सरासरी पाहता तिला रोखण्याचे एकमेव तंत्र म्हणजे – ऑस्ट्रेलियाच्या सलामी‘वीरां’ना बादच न करणे ! (त्यामुळे रॉल्टन फलंदाजीला येऊच शकणार नाही.)
क्रिकेटव्यतिरिक्त कॅरेन हॉकीही उत्तम खेळते. दक्षिण ऑस्ट्रेलियात ती आता पोस्टल ऑफिसर म्हणून कार्यरत आहे.
२१ नोव्हेंबर १८७० रोजी जोसेफ ‘जो’ डार्लिंग या माजी ऑस्ट्रेलियाई कर्णधाराचा जन्म दक्षिण ऑस्ट्रेलियातील ग्लेन ऑस्मंडमध्ये झाला. ‘पॅडी’ हे डार्लिंगचे टोपणनाव.
अगदी याच दिवशी यॉर्कशायरमधील लीड्समध्ये सर फ्रान्सिस स्टॅन्ली जॅक्सन या माजी इंग्लिश कर्णधाराचा जन्म झाला. ‘जॅकर’ या टोपणनावाने ओळखल्या जाणार्या स्टॅन्लीला त्याच्या क्रीडायुष्यातील कालावधीत ‘ऑनरेबल स्टॅन्ली जॅक्सन’ म्हणून
संबोधिले जाई. जॅक्सन क्रिकेटपटू असण्यासोबतच एक सैनिक आणि कॉन्झर्वेटिव राजकारणीही होता.
डार्लिंग हा भारदस्त फटकेबाजीची क्षमता असणारा, गरज भासल्यास वेगाने धावा जमविण्याचीही कुवत असलेला पण भक्कम बचावासाठी अधिक प्रसिद्ध असलेला फलंदाज होता. कसोटी सामन्यांच्या एका मालिकेतून ५०० धावा काढणारा इतिहासातील पहिला फलंदाज डार्लिंग आहे. त्याच मालिकेदरम्यान त्याने तीन शतके काढली होती. कसोटी मालिकेत तीन शतके काढणारा पहिला फलंदाजही डार्लिंगच. कसोटी शतक काढणारा पहिला डावखुरा फलंदाजही तोच आणि कसोटी सामन्यांमध्ये पहिला षटकार मारणारी असामीही डार्लिंगच. त्या काळी “आजच्या” षटकाराला पाच धावा मिळत असत. सहा धावा मिळविण्यासाठी चेंडू थेट मैदानाबाहेर मारावा लागे !
शेतीमुळे डार्लिंगच्या क्रिकेटमध्ये अडथळे आले. दक्षिण ऑस्ट्रेलियात गव्हाची शेती, मग टास्मानियात लोकरीचा व्यवसाय, ससे-निर्मूलन मोहिमेत सहभाग अशी अनेक व्यवधाने त्याच्या मागे होती. अनेक कृषी संघटनांशी त्याचा घनिष्ट संबंध होता. खरे तर या वाक्यानंतरच मला उद्गारचिन्ह द्यायचे आहे पण जरा थांबा…
१९२१ मध्ये जो डार्लिंग राजकारणात उतरला आणि टास्मानियाच्या संसदेत अपक्ष म्हणून निवडूनही आला !! १९४६ मध्ये पित्ताशयावर झालेल्या एका शस्त्रक्रियेनंतर पाच मुलींच्या आणि दहा मुलांच्या या बापाला मृत्यू आला तोवत त्याची संसदेतील जागा शाबूत होती.
स्टॅन्ली जॅक्सन केम्ब्रिज विद्यापिठाकडून क्रिकेट खेळू लागल्याच्या काळात रणजींनी मैदाने गाजविण्यास प्रारंभ केलेला होता. जॅक्सनने रणजींची प्रतिभा हेरली. केम्ब्रिज एकादशमध्ये रणजींचा समावेश सुकर होण्यास जॅक्सनने मदत केली. १९०५ मध्ये जॅक्सनने अशेस मालिकेत इंग्लिश संघाचे नेतृत्व केले. इथे एक वर्तुळ आश्चर्यकारकरीत्या पूर्ण झाले…
१९०५ च्या अशेस मालिकेत प्रतिस्पर्धी कर्णधार होते एकाच दिवशी जन्मलेले जो डार्लिंग आणि स्टॅन्ली जॅक्सन ! दोन सामने जिंकून आणि उरलेले तीन अनिर्णित राखून स्टॅन्ली डार्लिंगला भारी पडला. पाचही सामन्यांमध्ये नाणेकौल स्टॅन्लीनेच जिंकला. मालिकेनंतर सरासरीच्या दृष्टीने विचार करता दोन्ही संघाकडून खेळलेल्या खेळाडूंमध्ये, फलंदाजी आणि गोलंदाजीतही स्टॅन्ली जॅक्सन ‘नंबर वन’ ठरला.
१९१५ साली झालेल्या एका पोटनिवडणुकीत जॅक्सन संसदेवर निवडून आला ! १९२७ मध्ये भारतातील बंगाल प्रांताच्या गव्हर्नरपदी त्याची नियुक्ती झाली. बीना दास या मुलीने कलकत्ता विद्यापिठाच्या एका समारंभात अगदी जवळून त्याच्यावर गोळ्या घालण्याचा प्रयत्न केला होता पण जॅक्सन बचावला.
आयुष्याच्या मैदानातही स्टॅन्लीची इनिंग डार्लिंगपेक्षा सुमारे दीड वर्षे अधिक टिकली.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply