दिल्लीच्या गादीवर कोण बसणार, याचे औत्सुक्य पराकोटीला पोहोचले आहे. पंतप्रधान कुणाचा असेल हा प्रश्न काही दिवसांपूर्वी द्विपर्यायी होता. रालोआचा असेल की संपुआचा, हे दोनच पर्याय उत्तरासाठी होते. आता चित्र बदलत असल्याचे दिसते. या प्रश्नाला आता अनेक पर्याय निर्माण झाले आहेत. अडवाणी, मनमोहन सिंग यांच्या पंत्त*ीत आता इतरही अनेक नावे घेतली जात आहेत.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात आली असली तरी सत्तेचे दान कुणाच्या पदरात पडेल याचे चित्र मात्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावरही हे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता नाही. कोणताही एक पक्ष किंवा आघाडी स्वबळावर सत्ता स्थापन करू शकेल, असे वाटत नाही. या पृष्ठभूमीवर दिल्लीच्या गादीवर कोण बसणार, याचे औत्सुक्य पराकोटीला पोहोचले आहे. पंतप्रधान कुणाचा असेल हा प्रश्न काही दिवसांपूर्वी द्विपर्यायी होता. रालोआचा असेल की संपुआचा, हे दोनच पर्याय उत्तरासाठी होते. आता चित्र बदलत असल्याचे दिसते. या प्रश्नाला आता अनेक पर्याय निर्माण झाले आहेत. अडवाणी, मनमोहन सिंग यांच्या पंत्त*ीत आता इतरही अनेक नावे घेतली जात आहेत. त्यात मायावती, शरद पवार, लालूप्रसाद यादव ही नावे आघाडीवर आहेत. मायावती परवाच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊन गेल्या. नागपुरात त्यांची जंगी सभा झाली. ही बाई चमत्कारी आहे. शून्यातून विश्व निर्माण करण्याची किमया ती करू शकते. उत्तर प्रदेशात तिने ते करून दाखविले आहे. आपण एक दिवस या देशाचे पंतप्रधान होऊ, ही त्यांची महत्त्वाकांक्षा आहे आणि आपण होऊच असा प्रबळ आत्मविश्वासही त्यांच्यात आहे. कांशीराम यांच्या छत्रछायेखाली राजकारणाची सुरुवात करणाऱ्या मायावतींनी कांशीराम यांच्या पश्चात आपल्या पक्षाचे कुशलतेने नेतृत्व करीत उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात स्वबळावर सरकार स्थापन केले. लोकसभेचे एेंशी खासदार निवडणाऱ्या या राज्यातून भाजपा आणि काँठोससारख्या राष्ट्रीय पक्षांना जवळपास हद्दपार करण्याची किमया त्यांनी करून दाखविली. सुरुवातीच्या काळात मायावतींनी केवळ दलितांचे राजकारण केले. स्वत:ला ‘दलित की बेटी’ म्हणवून घेत त्यांनी दलित समाजात आपले नेतृत्व प्रस्थापित केले. वर्णव्यवस्थेतील वरच्या तीन वर्णांनी शुद्र आणि दलितांचा छळ केला, त्यांचे शोषण केले, आता ही उधारी सव्याज परत करण्याची वेळ आली आहे, असे सांगत त्यांनी ‘तिलक, तराजू और तलवार, जुते मारो इनको चार’ असा नारा दिला; परंतु केवळ दलितांच्या जोरावर राजकारणात फार पुढे जाता येणार नाही, हे लक्षात येताच त्यांनी आपल्या राजकारणाला बहुजनांचे केले. आता त्या समाजातील सर्वच जातीपातींमधील पीडितांच्या कल्याणाची भाषा बोलू लागल्या आहेत. मायावतींच्या राजकारणाचा वैचारिक आधार तोच असला तरी ‘मागासले’ या संकल्पनेची व्याख्या त्यांनी व्यापक केली आहे आणि हा बदल खूप स्वागतार्ह आहे. अख्खी हयात राजकारणात घालविणाऱ्या अनेक नेत्यांना जे जमले नाही ते या बाईने अवघ्या काही वर्षांत करून दाखविले. ‘तिलक, तराजू और तलवार, जुते मारो इनको चार’पासून ‘हाथी नहीं गणेश है, ब्रह्या-विष्णू-महेश है’ हा प्रवास ज्या राजकीय चातुर्याने आणि झपाट्याने केला ते पाहता एक दिवस या देशाच्या पंतप्रधानपदावर विराजमान होण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा फलद्रूप झाली तर आश्चर्य वाटायला नको. जातीपातींच्या राजकारणामुळे जातीजातींमधील भिंती अधिक मजबूत, जातीजातींमधील द्वेष अधिक कडवा केला आहे, हे तथ्य नाकारता येणार नाही. मायावतींनीही आपल्या राजकारणाची सुरुवात जातीचा आधार घेतच केली. आजही त्या दलितांच्या ‘मसिहा’ आहेत; परंतु हे राजकारण करताना त्यांना स्वार्थासाठी का होईना, परंतु ‘सोशल इंजिनीअरिंग’चा जो प्रयोग उत्तर प्रदेशात यशस्वी करून दाखविला त्याचे कौतुक एवढ्याचसाठी की त्यातून जातीजातींमधील सहकार्याची भावना, सामंजस्य वाढीस लागले. बसपाच्या ब्राह्यण उमेदवाराच्या विजयासाठी दलितांनी घाम गाळला, दलित उमेदवाराला ब्राह्यणांनी भरघोस मताधिक्क्याने निवडून दिले. हा एक चमत्कार होता. समाज सुधारकांची मोठी परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रातही आजतागायत हे शक्य झाले नाही, ते मायावतींनी उत्तर प्रदेशसारख्या मागासलेल्या राज्यात घडवून आणले. राजकारणाची नाडी त्यांना गवसली. आता त्या केवळ दलितांच्या नेत्या राहिलेल्या नाहीत. त्या खऱ्या अर्थाने बहुजन समाजाच्या नेत्या झाल्या आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की मायावती हे एक थोपविलेले किंवा वंशपरंपरेने आलेले नेतृत्व नाही. सामान्य लोकांमधून ही बाई पुढे आली आहे आणि म्हणूनच काँठोस किंवा भाजपाच्या ‘फाईव्ह स्टार’ नेत्यांपेक्षा सामान्य लोकांना मायावती अधिक जवळच्या वाटतात. त्यांच्या सभांना गर्दी जमवावी लागत नाही. लोक स्वयंस्फूर्तीने त्यांना ऐकायला, पाहायला येतात. त्यांच्या राजकारणाचे सूत्रही अगदी सोपे आहे. आधी पडण्यासाठी, नंतर पाडण्यासाठी आणि शेवटी निवडून येण्यासाठी आम्ही उमेदवार उभे करतो, हे मायावतींनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात यावेळी कदाचित त्यांना यश येणार नाही; परंतु युती आणि आघाडीच्या अनेक दिग्गजांना त्यांचे उमेदवार घाम फोडीत आहेत. पुढच्यावेळी कदाचित बसपाचा हत्ती महाराष्ट्रातही डौलाने फिरू लागेल. महाराष्ट्रातून रसद मिळाली नाही तरी बदलत्या समीकरणात मायावतींना याचवेळी पंतप्रधान होण्याची संधी मिळू शकते. काही राजकीय उलथापालथ झाली आणि तिसऱ्या आघाडीला सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली तर मायावतींचा पंतप्रधानपदासाठीचा दावा मजबूत असेल. तीच बाब शरद पवारांच्या बाबतीतही लागू होते. प्रचंड योग्यतेचा आणि क्षमतेचा हा माणूस आजपर्यंत केवळ दुर्दैवाने पंतप्रधान होऊ शकला नाही. हे दुर्दैव जेवढे त्यांचे आहे तेवढेच या देशाचेही आहे. लोकशाहीच्या राजकारणात सगळे महत्त्व आकड्यात मोजल्या जाणाऱ्या टोप्यांना आहे, त्या खाली डोके असलेच पाहिजे ही अट नाही. नेमक्या आकड्यांच्या या गणितातच शरद पवार मागे पडले. निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर आपल्या मतदारसंघात शेवटच्या दिवसापर्यंत न फिरकणारा हा एकमेव नेता असेल. माझी काळजी माझे मतदार घेतात, कारण त्यांना हे माहीत असते की पुढची पाच वर्षे मी त्यांची काळजी घेणार आहे, असे शरद पवार नेहमीच म्हणतात आणि ते सत्य आहे. शिवसेनेसारखा कट्टर राजकीय विरोधकही शरद पवार पंतप्रधान होणार असतील तर आमचा त्यांना पाठिंबा राहील, असे सांगत असेल तर हा शरद पवारांच्या योग्यतेचा सन्मान म्हणायला हवा. शरद पवार मराठी आहेत म्हणून शिवसेना त्यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा द्यायला तयार आहे, हा प्रचारकी तर्क झाला. शरद पवारांची योग्यता बाळासाहेबांना माहीत आहे, म्हणूनच ते त्यांची पाठराखण करतात. उद्या काँठोसमधील एखाद्या मराठी नेत्याला पंतप्रधान होण्याची संधी मिळत असेल तर शिवसेना त्याला पाठिंबा देईल का? या प्रश्नाचे ठाम उत्तर नाही असेच आहे. तात्पर्य केवळ योग्यता हा निकष वापरला तर शरद पवारही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत. वेळ पडल्यास त्यासाठी कराव्या लागणाऱ्या राजकीय तडजोडीतही ते निष्णात आहे. लालूप्रसाद यादवही या शर्यतीत फार मागे नाहीत. त्यांच्या आघाडीला बिहार-उत्तर प्रदेशात चांगले यश मिळाले तर संपुआचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून ते जोर लावू शकतात. सध्या काँठोस नेते संपुआचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मनमोहन सिंग यांचे नाव पुढे करीत असले तरी ते केवळ काँठोसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत, ही बाब आता पुरेशी स्पष्ट झाली आहे. शिवाय पंतप्रधान होण्यासाठी लोकमान्यता असावी लागते. मनमोहन सिंग यांच्याकडे कायम ‘डमी’ पंतप्रधान म्हणून पाहिल्या गेले. ते पंतप्रधान कमी आणि एखाद्या कंपनीचे ‘सीईओ’ अधिक वाटतात. ते ‘मास-बेस लीडर’ नाहीत आणि म्हणूनच काँठोसच्या प्रचारातही ते फारसे दिसत नाहीत. पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि प्रचारातून गायब, हा मोठा विरोधाभासच आहे. उद्या निवडणुकीत अपयश आले तर त्याचे खापर मनमोहन सिंगांवर फोडले जाईल आणि यश मिळालेच तर त्याचे श्रेय ‘सोनिया-राहुल’ या मायलेकराच्या जोडीकडे जाईल आणि मनमोहन सिंगांचा पत्ता आपोआपच कट होईल. लोकांना हे चांगल्याप्रकारे कळते. त्यामुळे मनमोहन सिंगांना पुढे करून निवडणुकीचा फड मारण्याचा काँठोसचा मनसुबा यशस्वी होण्याची शक्यता तशी कमीच आहे. रालोआला बहुमत मिळाले किंवा सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली तर मात्र अडवाणीच पंतप्रधान होणार हे स्पष्ट आहे. एकंदरीत रालोआला बहुमत मिळाले नाही तर पंतप्रधान कुणीही होऊ शकतो अशी परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीत मायावती, शरद पवार, लालूप्रसाद यादव यांच्यापैकी कुणीतरी दिल्लीच्या गादीवर आरूढ होईल, अशी दाट शक्यता आहे.
— प्रकाश पोहरे
रविवार, 12 एप्रिल , 2009
Leave a Reply