नवीन लेखन...

१००० X १०००

श्रीनिवास जोशी हा माझ्या वर्गातील सर्वात हुषार मुलगा होता. आम्ही सर्व त्याला श्री म्हणायचो. त्याचा नंबर नेहमी फक्त वर्गातच नव्हे तर आख्या शाळेत पण पहिला असायचा. मी त्यामूळे मुद्दामुच त्याच्याशी दोस्ती करून घेतली होती. प्रशांत कासट हा आमच्या वर्गातला दुसरा मुलगा होता. तो म्हणजे विरुद्ध टोक होता कारण तो ‘ढ’ कॅटेगरीतला होता. तो दरवर्षी कसा बसा काठावर पास होत वरच्या वर्गात चढत आला होता. त्याच्या वडिलांचे वाण्याचे दुकान होते. ते माझ्या घराजवळ असल्यामूळे अनेक वेळा आम्ही त्याच्या दुकानातून किराणा माल आणत असु. बहुतेक संध्याकाळी तो दुकानाच्या गल्यावर बसलेला दिसे. वर्गातील मुले त्याला ‘वाणी’ म्हणून चिडवायची. माझी आणि प्रशांतची मात्र चांगली मैत्री जमली होती.

मॅट्रिकची परिक्षा ही त्यावेळी आयुष्यातील अत्यंत महत्वाची परिक्षा म्हणून ओळखली जात असे. त्यावेळी 11 वी ला मॅट्रिक असायचे. पुढील सर्व शिक्षण या परिक्षेतील मार्कांवर ठरायचे. त्यावेळी बोर्डात टॉपला आलेल्या पहील्या 30 मुलांची यादी वर्तमानपत्रात प्रसिद्ध व्हायची. त्याला ‘मेरिट लिस्ट’ म्हणायचे. मेरिटमध्ये येणे हा फार मोठा बहुमान समजला जायचा. अमच्या वेळच्या मॅट्रिकच्या परिक्षेमध्ये श्रीने सर्व रेकॉर्ड्स तोडली. तो फक्त आमच्या शाळेतच नव्हे तर आख्या पुणे शहरात पहिला तर आलाच पण बोर्डाच्या मेरिट लिस्टमध्ये पण चौथ्या क्रमांकावर झळकला. अर्थात आम्हाला याचा सार्थ अभिमान वाटला. प्रशांत मात्र कसा बसा 51 टक्के मार्क मिळवून सेकंड क्लासमध्ये पास झाला.

अपेक्षेप्रमाणे श्री इंजिनिअरींगकडे गेला. बी. ई. मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल झाला. इथे पण तो युनिव्हर्सिटी टॉपर होता. पुढे त्याला पुण्याच्याच एका चांगल्या कारखान्यात नोकरी मिळाली. आपल्या गुणांवर चढत चढत तो दहा वर्षांच्या आतच कंपनीचा प्रॉडक्शन मॅनेजर झाला. स्वतःचा फ्लॅट घेतला, गाडी घेतली, लग्न केले. प्रशांत मात्र कॉमर्सला गेला पण त्याला काही शिक्षण पुरे करता आले नाही. तो सेकन्ड इयरला असताना त्याचे वडील आजारी पडले. तो घरातील सर्वात मोठा असल्याने दुकानाची जबाबदारी त्याच्यावर पडली. त्यामूळे शिक्षण अर्धवट सोडून त्याला वडिलांच्या धंद्याची जबाबदारी घ्यावी लागली.

श्रीने अचानक नोकरी सोडून स्वतःचा बिझनेस सुरु केल्याचे मला कळले. त्याला कुठल्यातरी इंजिनिअरिंग प्रॉडक्ट्सची एजन्सी मिळाली होती. श्रीने हातात असलेली चांगली नोकरी सोडून बिझनेस चालु करणे ही गोष्ट टिपिकल मध्यमवर्गीय मेन्टॅलिटी असलेल्या मला काही फारशी रुचली नाही. एकदा मला तो त्याचे ऑफीस दाखवायला घेऊन गेला. त्याचे ऑफिस एकदम पॉश होते, केबीनला ए.सी. बसवलेला होता. बाहेर सुरेख रिसेप्शनिस्ट होती. श्री सुट, बूट टायमध्ये होता. तो रुबाबात त्याच्या गाडीतून ऑफीसमध्ये येतो असे मला कळले. प्रशांतने मात्र काहीतरी वेगळाच उद्योग सुरू केला होता. त्याने भोसरीला स्वतःचे वर्कशॉप काढल्याचे मला कळले. धाकटा भाऊ हाताशी येताच त्याच्याकडे दुकानाची जबाबदारी सोपवून प्रशांतने हा नवीन उद्योग सुरू केला होता. त्याला वर्कशॉपमधले काही कळते का असा यक्षप्रश्न माझ्यापूढे होता. तो रोज मला त्याच्या जुन्या व्हेस्पा स्कुटरवर वर्कशॉपमध्ये जाताना दिसे. बहुतेक वेळा जेवणाचा डबा पण बरोबर असे. त्याच्या एकूण अवतारावरून त्याचे काही फारसे बरे चालले नसावे असे मला वाटे. असे असुनही अधुन मधुन आमची भेट होत असे आणि कोपर्यासवरच्या उडप्याकडे कॉफी प्यायला म्हणून आम्ही जात असु. कारण तेथील फिल्टर कॉफी लाजबाब असे.

श्रीने अचानक त्याचा धंदा बंद केल्याचे मला कळले. कारण विचारले तेव्हा धंद्यामध्ये लॉस होतो असे सांगीतले. तो नोकरीच्या शोधात आहे असे पण मला कळले. पण तो जेव्हा प्रशांतच्या वर्कशॉपमध्ये जनरल मॅनेजर म्हणून नोकरीला लागल्याचे मला कळले तेव्हा धक्काच बसला. आमच्या वर्गातील सर्वात हुषार मुलगा आमच्याच वर्गातील एका ‘ढ’ मुलाच्या कंपनीत काम करतो ही गोष्ट, नाही म्हटले तरी मला पचवणे अवघडच गेले. पण श्री लागल्यापसून प्रशांतच्या कंपनीत लक्षणीय बदल घडू लागले. प्रशांतने आपनी कंपनी प्रायव्हेट लिमिटेड केली आणि श्रीला कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर केले. प्रशांतच्या वर्कशॉपची वेगाने तरक्की होत असल्याची लक्षणे मला दिसू लागली. प्रशांतने वडिलांचे जुने घर पाडून तेथे चार मजली पॉश इमारत उभी केली, मर्सिडिझ गाडी घेतली. जुन्या व्हेस्पा स्कुटरवरून फिरणारा प्रशांत आता मर्सिडिझमधून फिरू लागला. एक उद्योजक म्हणून तो ओळखला जाऊ लागला. तरी सुद्धा माझ्यासाठी तो पुर्वीचाच प्रशांत होता. अजुनही आम्ही कोपर्यािवरच्या उडप्याकडे कॉफी प्यायला जात होतो.

एकदा आम्ही असेच कॉफी प्यायला बसलो होतो तेव्हा श्रीचा विषय निघाला. अर्थात श्रीमुळेच आपली तरक्की झाल्याचे प्रशांत नेहमीच आवर्जून सांगायचा. यावेळचा विषय मात्र श्रीच्या बिझनेसचा निघाला. त्याने बिझनेस बंद का केला हे कोडे मला काही उलगडत नव्हते. मी प्रशांतला याचे कारण काय असेल असे विचारले.

‘कारण त्याला 1000 X 1000 हा फॉर्मुला ठाऊक नव्हता म्हणून!’ प्रशांतने उत्तर दिले.

‘ हा कसला फॉर्म्युला?’ मी प्रशांतला विचारले.

‘हा फॉर्मुला मला माझ्या वडीलांनी लहानपणीच शिकवला होता! माझे वडील फक्त सतवी पर्यंतच शिकलेले होते. पण त्यांचा हा फॉर्म्युला अगदी अचूक निघाला!’ प्रशांत म्हणाला.

‘हा कसला फॉर्म्युला आहे? मला जरा नीट समाजाऊन सांग ना!’ मी प्रशांतला म्हणालो.

‘माझे वडील म्हणायचे कि जेव्हा मूल जन्माला येते तेव्हा त्याच्या आयुष्यातील पहीले 1000 दिवस, म्हणजे 3 वर्षे अत्यंत महत्वाची असतात. मूल या तीन वर्षतच खरी प्रगती करते. म्हणजे ते आधी कुशीवर वळायला लागते, मग पालथे पडायला लागते, पोटावर सरकायला लागते, रांगायला लागते, धरून धरून उभे रहायला लागते, चालायला लागते, पळायला लागते, बोबडे बोबडे बोलायला लागते. पण याच काळात त्याची तब्येत पण नाजूक असते. ते वारंवार आजारी पडत असते. त्याला सारखा ताप येत असतो. सर्दी, पडसे, खोकला होत असतो. इन्फेक्शन होत असते. दात येताना त्रास होत असतो. याच काळात त्याला अनेक लशी टोचण्यात येतात, पोलियोचा डोस द्यावा लागतो. त्याची काळजी घ्यावी लागते. मी सुद्धा लहानपणी बराच आजारी असायचो अशी माझी आई मला सांगते. पण मूल वारंवार आजारी पडते म्हणून काही कोणी त्याला मारून टाकत नाही!’ प्रशांत मला सांगत होता पण याचा श्रीच्या बिझनेसशी काय संबंध असा प्रश्न मला वारंवार पडत होता.

‘वडील म्हणायचे की जे मूल 1000 दिवस जगते ते मूल पुढे 1000 महिने म्हणजे 84 वर्षे जगू शकते. थोडक्यात आपल्याला जर दिर्घायुष्य मिळाले तर त्याचे खरे श्रेय पहिल्या 3 वर्षांत आपले कसे पालन पोषण झाले याला असते. माझे वडील याला 1000 गुणीले 1000 फॉर्म्युला म्हणायचे. हाच फॉर्म्युला बिझनेसला पण लागू असोतो!’ प्रशांत म्हणाला

‘ते कसे काय?’ मी प्रशांतला विचारले.

‘तुम्ही जेव्हा एखादा नवीन बिझनेस सुरू करता तेव्हा एखादे नवीन मूल जन्माला घालण्यासारखेच असते. याचे पहीले 1000 दिवस फार महत्वाचे असतात. या काळात जरी धंदा वाढत असला तरी याच काळात धंद्यात अनेक अडचणी येत असतात. अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागत असते. याच काळात फसवणारी, टोप्या घालणारी माणसे भेटत असतात. तुमचे स्पर्धक तुम्हाला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करत असतात. तसेच तुम्हाला मदत करणारे लोक पण याच काळात भेटत असतात. आता माझेच बघना! मी जेव्हा वर्कशॉप सुरु करायचे ठरवले तेव्हा वडिलांनी एकच अट घातली. कोणत्याही परिस्थितीत 1000 दिवसांच्या आत वर्कशॉप बंद करायचे नाही. जसे असेल तसे चालू ठेवायचे. माझे पहिल्यांदा खूप हाल झाले. एकतर मला वर्कशॉपमधले काही ठाऊक नव्हते. लेथ म्हणजे काय, मिलींग मशीन कशाला म्हणतात, ग्राईंडरचे काय काम असे मला काही म्हणजे काही ठाऊक नव्हते. ट्रॉब सारखे मशीन तर मला स्वप्नवटच वाटायचे. ज्या पार्टनरबरोबर वर्कशॉप सुरू केले त्याने टोपी घातली. जे वर्कर्स होते ते बेकार निघाले. वर्कशॉपमध्ये चोर्याॉ व्हायच्या. फसवाफसवी तर मोठ्या प्रमाणावर होत होती. अनेक वेळा वाटायचे की कुठून या फंदात पडलो. पण वडीलांना वचन दिले होते त्याप्रमाणे वर्कशॉप चालू ठेवले. आज त्याचे काय झाले हे तू बघतो आहेस! आता आमचा 1000 दिवसांचा काळ संपला असून आता 1000 महिन्यांच्या काळात आम्ही आलो आहोत. माझ्या वडीलांच्या दुकानाची पण हीच कथा आहे. माझ्या वडिलांना पहिल्या 1000 दिवसांमध्ये दुकान चालवायला फार त्रास पडला. आज आमच्या दुकानाला 55 वर्षे पूर्ण झाली असून अजून 30 वर्षे तरी आमचे दुकान व्यवस्थीत चालू राहील याची आम्हाला खात्री आहे. माझ्या भावाने तर आता दुकानाचे रुपच पालटून टाकले आहे. आता आमच्या दुकानाचे रुपांतर भव्य स्टोअरमध्ये झाले असून लवकरच त्याचे मॉलमध्ये रुपांतर होणार आहे!’ प्रशांत म्हणाला आणि थोडे थांबून बोलू लागला

‘श्री जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे आला तेव्हा मी फक्त त्याच्या धंद्याचीच चौकशी केली आणि माहिती घेतली. माझ्या लक्षात आले की त्याचा धंदा चांगला चालू होता. पण त्याने घेतलेल्या काही चुकीच्या निर्णयांमूळे त्याला धंद्यात खोट बसली होती. म्हणून त्याने घाबरून धंदा बंद केला. थोडक्यात त्याने त्याचे मूल 1000 दिवसांच्या आतच मारले. त्याने जर त्याचा धंदा 1000 दिवस चालू ठेवला असता तर नक्कीच तो यशस्वी झाला असता आणि त्याचा धंदा 1000 महिने चालू शकला असता. पण त्याच्यात पेशन्सची कमी आहे हे माझ्या लक्षात केव्हाच आले आहे. असो’

मी जेव्हा कॉफी शॉप मधून बाहेर आलो तेव्हा माझ्या डोक्यात सतत 1000 X 1000 हा फॉर्मुला घोळत होता.

जी गोष्ट केवळ सातवीपर्यंत शिकलेल्या प्रशांतच्या वडिलांना ठाऊक होती तीच गोष्ट ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युउट, डॉक्टरेट तसेच युनिव्हर्सिटितले टॉपर असलेली मराठी मंडळींना अजुन सुद्धा का समजत नाही हे कोडे मला तरी उलगडलेले नाही.

अर्थात 1000 X 1000 हा फॉर्म्युला वापरून बिझनेस करायचा की नाही हे तुमचे तुम्हीच ठरवायचे!

उल्हास हरी जोशी,
मोः-9226846631

उल्हास हरि जोशी
About उल्हास हरि जोशी 31 Articles
श्री उल्हास जोशी हे गुंतवणूक विषयक सल्लागार असून ते Financial Health या विषयावर जनजागृती करतात. या विषयावरील त्यांचे अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. ते मेकॅनिकल इंजिनिअर असन ४० वर्षे मार्केटिंग आणि सेल्स या क्षेत्रात कार्यरत होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..