हाच तो काळा दिवस ज्या दिवशी पानिपतावर मराठ्यांची एक सबंध पिढी शहीद झाली होती .सदाशिवराव पेशवे, विश्वासराव, जनकोजी शिंदे, यशवंतराव पवार, तुकाजी शिंदे, समशेर बहाद्दर, इब्राहिमखान यांच्यासारखे असंख्य शूरवीर योद्धे शहीद झाले. १४ जानेवारी १७६१ हे भारताच्या इतिहासातील एक स्मरणीय आणि असामान्य वळण आहे. मराठा आणि अफगाणी सैन्यादरम्यान पानिपतच्या तिसर्या लढतीत त्या दिवशी झालेला रक्तपात एवढा होता, की जगात कुठेही इतकी मनुष्यहानी एका दिवसांत झाली नसावी.
पानिपत ही एक भारतासाठी दिशादर्शक घटना होती. जर मराठे जिंकले असते तर ना इंग्रज बळावले असते किंवा ना हैदरअलीचा उदय झाला असता. कदाचित दिल्लीवर त्याचवेळी मराठ्यांचा भगवा झेंडा फडकला असता.पण असे घडले नाही .पानिपतच्या लढाईमुळे मराठी माणसात न्यूनगंड निर्माण न होता, तो मराठी अस्मितेचा उच्चांक ठरला पाहिजे. तो मराठी जनतेसाठी ऊर्जेचा, स्फूर्तीचा, निस्वार्थी देशभक्तीचा एक स्रोत व्हायला हवा. प्रत्यक्ष रणांगणात ठार झालेल्या अफगाणी शिपायांची संख्या कामी आलेल्या मराठय़ांच्या दीडपट होती, हा एकमेव घटक मराठा शूरत्वाची आणि ‘मोडेन पण वाकणार नाही’, या बाण्याची ग्वाही देतो.
पानिपत युद्ध मराठ्यांच्या पराभवाचे नसून शौर्याचे प्रतिक आहे, मराठ्यांनी दिलेल्या शब्दासाठी आणि राष्ट्ररक्षणासाठी एकाकी लढताना कशी झुंज दिली त्याचे ते उदाहरण आहे ,”बचेंगे तो और लढेंगे ” असे म्हणणारे दत्ताजी शिंदे पानिपत युद्धाच्या आधी शहीद झाले पण त्या वाक्यातून छत्रपतींचे स्वराज्य राखण्या वेळीचे सूत्र मात्र दिसून येते
“पानिपत १७६१” मध्ये श्री.त्रं.शं. शेजवलकर लिहितात,” पानिपतच्या युध्दामुळे सिध्द झालेली महत्वाची गोष्ट ही की, मराठे हिंदुस्तानचे राज्यकर्ते म्हणुन वागत होते, केवळ लुटारु म्हणुन दुसर्या लुटारुंशी लढले नाहीत.हिंदुस्तानात सत्ताधिश कोणी व्हावयाचे या बद्दल वाद असो,पण हे राज्य हिंदी रहिवाश्यांचेच असले पाहीजे व तेच येथिल राज्यकर्ते राहिले पाहीजेत ,या तत्वासाठी मराठे पानीपतास लढले.”
गोविंदाग्रज पानिपत संग्रामाचे वर्णन करताना म्हणतात
कौरव – पांडव संगरतांडव द्वापारकाली होय अती !
तसे मराठे गिलचे साचे कलित लढले पानपती !!
पानिपत युद्धात “लाख बांगडी फुटली , दोन मोती गळाले , २७ मोहरा हरवल्या आणि चिल्लरखुर्दा किती गेला याची गणना नाही …!!” तरी पानिपत चे युद्ध मराठे राष्ट्र रक्षणासाठी लढले हे महत्वाचे आहे,मराठ्यांनी अब्दालीला असा तडाखा दिला कि परत त्याने दिल्लीकडे पाहण्याचे धाडस केले नाही
* पानिपतचा समरप्रसंग च्या काही घटना :-
* १४ जानेवारी १७६१ रोजी पहाटे मराठा सैन्य यमुनेच्या रोखाने निघाले.
* युद्धाची सुरवात सकाळी ९ ते १० च्या दरम्यान झाली. गारदीच्या तोफा गरजल्या व समोर रस्ता बनविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पठाणांवर प्रभाव पडला नाही.
* गारदींच्या जोरदार हल्ल्यासमोर रोहिले व बर्खुदारखानाचा निभाव लागेना व त्यांचे हजारोंनी सैनिक मरून पडले. गारदीमागे दमाजी गायकवाड व विठ्ठल शिवदेव यांचे घोडदळही घुसले. मात्र, जखमी होऊन त्यांना माघार घ्यावी लागली.
* त्यानंतर सदाशिवराव भाऊंच्या हुजुरातीसमोर वजीर शहावली खानाच्या पथकाशी युद्ध लागले. मराठ्यांचा हल्ला इतका यशस्वी होता की दुराणींना आपण युद्ध हरलो, असे वाटू लागले.
* दुपारीच दोनला माघारी आलेल्या वजीराच्या सैनिकांमुळे मराठ्यांवर दबाव वाढला. तोफखाना बंद पडून इब्राहिम खान जखमी.
* याचवेळी एक गोळी विश्वासरावांना लागल्याने ते मृत्युमुखी पडले. भाऊसाहेब घोड्यावरून दुराणी शहाला मारण्याच्या उद्देशाने पुन्हा त्वेषाने लढू लागले.
* विश्वासराव पडल्याची बातमी पसरल्यावर मल्हारराव होळकर व शिंदे मागून रणांगण सोडून मार्ग काढीत दिल्लीकडे निघाले. भाऊसाहेबांवर नव्या दिशेने हल्ला झाला.
* दुराणी शहाने स्वतःकडील सहा हजार ताज्या दमाचे सैन्य भाऊसाहेबांच्या दिशेने पाठविले. भाऊसाहेबांनी निकराने हल्ले चढविले. पठाण सैन्याच्या गर्दीत लढताना त्यांना शेवटी नाना फडणीसाने पाहिले.
* सायंकाळी चार वाजता मराठा सैन्य जणू अदृश्य झाले. युद्धात व युद्धानंतर एकूण ८० हजार ते १ लाख मराठे मारले गेले.
युध्दाचे नेतृत्व करणारे “श्री. सदाशिवराव उर्फ भाऊ पेशवे” यांना त्रिवार मानाचा मुजरा…
वयाच्या “१८-२०” वर्षी रणभूमीत पराक़म गाजवणार्या “श्री. विश्वासराव पेशवे”, “जनकोजी शिंदे” आणि “समशेर बहाद्यर” या “शूर वीरांना त्रिवार मानाचा मुजरा”…
बुर्हाङी घाटात मर्दुमकी गाजवणार्या “सरदार दत्ताजी शिँदयांना त्रिवार मानाचा मुजरा”….
शत्रूच्या हत्तीवर स्वार होऊन त्याला मात देणार्या “यशवंतराव पवार” यांना त्रिवार मानाचा मुजरा…
शत्रूच्या अमिषाला झुगारुन प्राणाची आहुती देणारा “इब्राहिम गारदी” व रात्री शत्रूच्या गोटात शिरुन त्याच्या तोफा निकामी करणारा “फत्तेखान” या दोहोँना त्रिवार मानाचा मुजरा…!!!!!!!!!!
मुजरा त्या प्रत्येक विराला जो मराठा साम्राज्यासाठी ,देशासाठी पानिपतावर लढला स्वताचे प्राण अर्पण केले,अशा प्रत्येक ज्ञात ,अज्ञात वीरांना मानाचा मुजरा ……..!!
सौजन्य : फेसबुकवरील एका वाचकाने लिहिलेला हा लेख मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी शेअर करत आहोत.
— मराठीसृष्टी व्यवस्थापन
या युद्धामुळे भारताचे भाविष्य बदलून गेले असें म्हटलें तर तें चूक ठरणार नाहीं.
– सुभाष स. नाईक