गिरीश रघुनाथ कर्नाड यांचा जन्म १९ मे १९३८ रोजी महाराष्ट्रामधील माथेरान येथे झाला. त्यांचे शिक्षण कर्नाटकमधील सिरसी येथे झाले. त्यांचे कुटूंब धारवाडला स्थलांतरित झाले तेव्हा गिरीश कर्नाड यांचे वय १४ वर्षाचे होते.
लहान असताना गावांमध्ये ज्या नाटकमंडळ्या येत असत त्यांचे गिरीश कर्नाड यांना आकर्षण वाटे . लहानपणी त्यांना गावामध्ये आलेल्या नाटकमंडळीने केलेल्या ‘ यक्षगान ‘ ने आकर्षित केले होते. लहानपणापासूनच त्यांना नाटकांची आवड होती त्यामुळे शाळेपासूनच गिरीश कर्नाड हे नाटकांशी जोडले गेले कारण त्यांच्या आई वडिलांना नाटकांची आवड होती ते बालगंधर्व , केशवराव भोळे यांची आणि अन्य मराठी नाटके ते बघत असत. त्यांचे वडील सरकारी नोकरीत होते ते १९४२ साली पुण्यामधून निवृत्त झाले. परंतु त्यांना नोकरीच्या कालावधीत वाढ देऊन कर्नाटकमधील सिरसी येथे पाठवले. ते धारवाडला होते तेथे कवी बेंद्रे , त्यांचे प्रिन्सिपॉल वी. वी. गोकाक आणि अनेकांचा प्रभाव त्यांच्यावर पडला, तेथे मराठी आणि कन्नड भाषा बोलली जायची . तेथील ‘ मनोहर ग्रंथमाले ‘ ने त्यांना लेखक बनवले असे ते म्हणतात.
गिरीश कर्नाड गणित हा विषय घेऊन बी. ए . झाले. त्यानंतर ते अर्थशास्त्र , पॉलिटिक्स आणि फिलॉसाफी घेऊन एम. ए . झाले. ते त्यांनी ऑक्सफर्डमधील लिंकॉन आणि मॅगडेलन महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतले.
गिरीश कर्नाड हे शिकागो विश्वविद्यलयातील फुलब्राईट महाविद्यालयात व्हिझिटिंग प्राध्यापक होते. गिरीश कर्नाड उत्तम नाटककार तर आहेत परंतु उत्तम अभिनेतेही आहेत. त्यांच्या कन्नड भाषेमधील अनेक नाटकांची भाषांतरे इंग्रजी आणि अन्य भाषांमध्ये झाली आहेत. त्यांच्या लिखाणामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने दिसून येते ती अशी की त्यांनी लिहिण्याची भाषा इंग्रजी नाही वापरली की जिच्यामुळे सर्वत्र प्रसिद्धी मिळते किंवा त्यांनी त्यांची स्वतःची कोकणी मातृभाषाही वापरली नाही. त्यांनी लिखाणासाठी कन्नड भाषा वापरली कारण त्यावेळी कन्नड लेखकांवर ‘ पश्चिमी साहित्यिक पुनर्जागरण ‘ चा खूप प्रभाव होता. त्यांवेळी लेखकांमध्ये अशी थोडी स्पर्धा होती की लिहावयाचे की स्थानिक लोकांना ते लिहिणे किंवा तिचा विषय-आशय वेगळा असला पाहिजे. त्यावेळी गिरीश कर्नाड यांनी ऐतिहासिक किंवा पौराणिक पात्रे घेऊन तत्कालीन व्यवस्था किंवा घटना घेऊन त्यापद्धतीने लिहावयाचे आणि मुख्य म्हणजे ते लोकप्रिय होत असे.
गिरीश कर्नाड यांनी त्यांचे पाहिले नाटक ‘ ययाति ‘ १९६१ साली लिहिले आणि दुसरे नाटक ‘ तुघलक ‘ १९६४ साली लिहिले . गिरीश कर्नाड यांच्या नाटकांना खूप प्रसिद्धी मिळाली परंतु त्यामधील ‘ तुघलक ‘ नाटकाला खूप प्रसिद्दी मिळाली. ‘ तुघलक ‘ नाटकाचे अनेक भारतीय भाषांमधून भाषांतरे झाली.
गिरीश कर्नाड यांची अनेक विधाने वादग्रस्त ठरतात कारण ती खरी असतात , अभद्र व्यवस्थेला धक्का देणारी असतात. अर्थात ज्या लेखकाला ‘ कणा ‘ नावाचा अवयव आहे त्याच्याबाबतीत असेच घडते. मला आठवतंय काही वर्षांपूर्वी इंग्रजी लिटफ़ेस्टमध्ये मुंबईला मोठा वाद निर्माण झाला होता. तो गिरीश कर्नाड यांच्या काही विधानामुळे . गिरीश कर्नाड यांनी अनेक नाटके लिहिली त्यामध्ये ययाति , तुघलक , अग्नि मत्तु मळे , ओदकलु बिम्ब , अंजुमल्लिगे , मा निषाद , टिप्पुविन कनसुगळुतलेदंड , हित्तिन हुंज , नागमंडल ह्या नाटकांचा समावेश आहे.
त्याचप्रमाणे १९७० मध्ये त्यांनी कन्नड चित्रपट ‘ संस्कार ‘ पासून पटकथा लेखन सुरु केले , तर त्यांनी ‘ वंशवृक्ष ‘ ह्या पहिल्या चित्रपटाचे निर्देशन केले होते. त्यांनी अनेक कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्ये भूमिकाही केल्या होत्या. त्यांनी ‘ जीवन मुक्त ‘ चित्रपटामध्ये काम केले होते. त्याचप्रमाणे त्यांनी ‘ इकबाल ‘ या चित्रपटामध्ये कामही केले होते. त्याचप्रमाणे त्यानी टायगर जिंदा है , शिवाय , स्वामी , निशात , मंथन , पुकार , अपने पराये या हिंदी चित्रपटांमधून कामे केली होती. त्यांनी मराठी चित्रपट ‘ उंबरठा ‘ मध्ये स्मिता पाटील यांच्याबरोबर काम केले होते.
गिरीश कर्नाड यांनी तामिळ , कन्नड , तेलगू चित्रपटांमधूनही कामे केली होती. गिरीश कर्नाड यांना स्केचेस काढण्याची आवड आहे त्यांनी टी . एस . इलियट , सर्वपल्ली राधाकृष्णन , आयरिश नाट्यलेखक सीन ओ केसी अशा अनेकांच्या स्वाक्षऱ्या त्यांनी काढलेल्या स्केचवर मिळवल्या होत्या . परंतु पुढे त्यांनी तो नाद सोडला.
त्यांची नाटके इब्राहिम अल्काझी , ब.ब. कारंत, आलोक पद्मसी, अरविंद गौड़, सत्यदेव दुबे, विजया मेहता, श्यामानंद जालान , अमल अल्लाना , शंभू मित्र , अरविंद देशपांडे अशा दिगज्जांनी त्यांची नाटके दिग्दर्शित केली आहेत.
गिरीश कर्नाड यांचा विवाह डॉ. सरस्वती गणपती यांच्याशी विवाह झाला .
गिरीश कर्नाड यांनी भारतामधील ज्या अनिष्ट राजकीय घटना झाल्या त्यांचा सतत विरोधच केला आहे. गिरीश कर्नाड हे १९७४-१९७५ मध्ये फिल्म्स अँड टेलिव्हिजन इन्स्टिटयूटचे डायरेक्टर म्हणून होते. त्याचप्रमाणे ते संगीत नाटक अकादमीचे १९८८ ते १९९३ पर्यंत चेअरमन होते तर कर्नाटक अकादमीचे अध्यक्षही होते.
गिरीश कर्नाड यांना भारत सरकारने १९७४ साली पदमश्री देऊन त्यांचा सन्मान केला तर १९९२ मध्ये पदमभूषण देऊन त्यांचा सन्मान केला . १९८० साली गोधुली साठी ऊत्कृष्ट पटकथेसाठी फिल्मफेअर अवॉर्ड गिरीश कर्नाड आणि बी.वी . कारंथ यांना विभागून दिला , १९९४ मध्ये त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. तर १९९८ साली ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना देण्यात आला.
गिरीश कर्नाड यांचे १० जून २०१९ रोजी निधन झाले.
सतीश चाफेकर
Leave a Reply