आठवी ,नववी आणि दहावी सलग तीन वर्षे यादिवशी “न्यू इंग्लीश स्कूल “, भुसावळ येथे मी शिक्षक बनून एक किंवा दोन तास घेत असे. खूप मस्त आणि वेगळं वाटायचं . रोब झाडता यायचा. आपण कोणीतरी वेगळे आहोत असं वाटत राहायचं. कळत -नकळत, वाटा -पायवाटा बदलत मी शिक्षक झालो. खूपजणांच्या आयुष्यात डोकावता आलं. काहीजणांना प्रभावित करता आलं. प्रयोजन मिळाल्यावर पुढे फारसं कठीण गेलं नाही. डिप्लोमा ,डिग्री (इंजिनिअरिंग ), एमबीए सगळी अंगणे हिंडून झाली. विद्यार्थ्यांकडून मिळणारी ऊर्जा काही वेगळीच.!
जेंव्हा शिक्षक नव्हतो तेंव्हा ” प्रशिक्षक (ट्रेनर ) झालो. प्रक्रिया थोडीफार तीच ,पण आवडली. शिक्षक बनून- learning तर प्रशिक्षक बनून unlearning followed बाय relearning ! फरक काय तो एवढाच !
सकाळपासून येणाऱ्या कृतज्ञ संदेशांमुळे मस्त वाटतंय. आजही विद्यार्थी आसपास असतात ,ओळख देतात, त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात एक कप्पा देतात. नव्या तंत्रज्ञानामुळे “मित्र “होतात. पण नातं बदलत नाहीए.
तरीही “शिक्षक” आणि “गुरू ” मध्ये फरक उरतोच. फ़ार कमी शिक्षक गुरू या पदवीला पात्र ठरतात. गुरू हे मिश्रण काही अलौकिकच ! हाती लागत नाही सहसा ! आता आठवलं की वाटतं आम्हीं नशीबवान ! माझ्या पिढीच्या वाट्याला गुरू जास्त आणि शिक्षक कमी आले.
काही दिवसांपूर्वी मी एफबी वर आमच्या जे एन पुराणिक सरांविषयी पोस्ट (गुरुपौर्णिमेनिमित्त) लिहिली होती. सरांच्या पत्नी (सौ रागिणी पुराणिक) यांनी आवर्जून उल्लेख केला ” सर ,माध्यमांवर नाहीत. पण श्याम भाटवडेकर भेटला आणि त्याने सरांना या लिखाणाबद्दल सांगितले. त्यांना ते खूप आवडले. काही दिवसांनी तू पाठविलेला लेखाचा प्रिंट आऊट मिळाला. सरांनी तुझे पत्र पोथीत ठेवले आहे.” माझ्या आणि माझ्या पत्नीच्या डोळ्यात पाणी आले.
मी “शिक्षक” कां राहिलो आणि सर “गुरू ” कां आहेत ,हे त्यादिवशी कळाले. आपल्या विद्यार्थ्यांवर एवढे उसासून प्रेम फक्त गुरूच करू शकतात.
सर्वांनी गुरू बनण्याचा प्रयत्न करावा याच माझ्या आज सर्वांना शुभेच्छा !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply