मी घरी आलो तेंव्हा खूप उशीर झाला होता. आईला काळजी वाटत होती. आप्पांना (माझ्या व़़डलांना)ही काळजी वाटत असावी. मी आईला सांगून गेलो होतो असं म्हणट्ल्यावर त्यांचं समाधान झालं.
पुढे पुढे मला छंद जडला. आईला विचारून मी नलूला भेटायला संध्याकाळी भेटायला जाऊ लागलो. कर्म धर्म संयोगाने मला नलू तिच्या घरी एकटीच भेटत असे. आमच्या बालिश गप्पा रंगत.बसवर अवलंबून न रहाता मी सायकलीवरून जात असे.वेळेचं भान रहात नसे. आई सांवरून घेत असे.
अशाच एका संध्याकाळी मी आईला विचारून निघालो. सायकल चालवली. नलू एकटीच भेटली. गप्पा रंगल्या. अंधारलं. मी परत निघालो आणि हाय् ! सायकलच्या डाव्या पेडलची पट्टी तुटली. मला ती बसवता येईना. पाऊसही लागला. जवळपास एखादं रिपेरिंगचं दुकान असेलही पण मी खिशांत पॅसे ठेवले नव्हते. नाईलाजाने मी पुन्हा नलूकडे गेलो. तिच्याकडून बस भाड्याकरता दोन आणे मागितले. तिने आपल्या पाकिट मनीमधून मला अडीच आणे दिले. चिखलाने बरबटलेल्या चाकांनिशी मी ती सायकल नलूच्या घराच्या ओसरीवर ठेवली. अत्यंत ओशाळलेल्या मनस्थितीत बसचं दोन आण्याचं तिकिट काढून घरी आलो. आप्पाना नेहेमीप्रमाणे आईला सांगून गेलो होतो ही सबब सांगितली.
कोणीतरी मागून चिडवलं. “बरसातमे हमसे मिले तुम हो सजन तुमसे मिले हम…” ते त्याकाळचं लोकप्रिय गाणं
माझा सर्वात मोठा भाऊ त्यावेळी घरी होता. घरांत आप्पांच्या पेक्षाही त्याचा धाक असे.
“अजून मिसुरडी फुटली आणि प्रेम करतोय, प्रेम याचा अर्थ तरी कळतो कां?”
या त्याच्या उद्गाराने मी चपापलो. तो रागावला आहे इतकंच समजलं. मी घाबरलो.
माझ्या मिशीचा प्रेमाशी काय़ संबंध हे मला उमगलं नाहीं. मी चुकीचं वागतोय हे समजलं.
यानंतर मी नलूचा विचार न करता माझ्या आभ्यासाकडे लक्ष देणे योग्या असा विचार केला. दुसरे दिवशी शाळेला सुट्टी होती. दादाकडून कांही पॅसे घेऊम मी बसने नलूकडे गेलो. तिचे व़़डील होते. चिखलात भरलेल्या चाकांनिशी सायकल ओसरीत ठेवली म्हणून नाराज होते. मी नलूला तिचे अडीच आणे परत देऊं लागलो तर त्यांनी विरोध केला. “धाक़ट्या बहिणीने भावाला मदत केली असं समज” ह्या त्यांच्या उद्गाराने मी हबकलो. काल दादाने केलेल्या टोंचणीपेक्षा हे मला जास्त झोंबलं. सायकल रिपेर करून घेऊन त्याच सायकलीने परतलो.
त्यानंतर ५ वर्षे मी नलूचा विचार केला नाहीं की तिला भेटलो नाही. आप्पा वारले. मी बी.कॅाम. पास झालो. चांगली नोकरी मिळाली होती. त्याकाळी २५० रुपयाहून जास्त म्हणजे खूपच. दररोज नाहीं तरी आठवड्यातून ३ दिवस दाढी करावी लागत असे. मला नलूची आठवण होत राहिली. पण निग्रहाने तिला विसरायचा प्रयत्न करत राहिलो.
आम्ही दादरचं घर सोडून खारला एका चांगल्या घरात राहू लागलो.
एके दिवशी मी पणशीकरांच्या दुकानांतून डिंक लाडू घेत होतो. आणि ती मला अचानक दिसली. ती दुकानाच्या बाहेर रस्त्यावरून जात होती. फ्रॅाक ऍवजी पातळ नेसलेली. घाईघाईने पणशीकरांच्या दुकानांतला व्यवहार संपवून ती जात असलेल्या वाटेवर मी तिचा पाठलाग केला. ती एका मोटारीत शिरत होती. त्या गाडीत तिचे वडील बसले होते. “इकडे कुठे ?” अशी जुजबी चर्चा झाली. ३ मुलीनंतर नलूच्या वडलांना मुलगा झाला होता. त्याच्या पहि्ल्या वाढदिवसाच्या निमित्ताने खरेदीकरता नलू आपल्या वडलांबरोबर आली होती. अर्थातच मला त्या समारंभाचं आमंत्रण मिळालं.
आईला मी हे सांगितलं आणि नलूच्या भावाच्या वाढदिवसाला जाऊन आलो. नलूला आमच्या नव्या घरी यायला मी बोलावलंय हेही सांगितलं. नलूच्या घरच्या लोकांची परवानगी घेतली. मीच तिला सोबत न्यावं असं ठरलं. मी तिच्या घरी गेलो. तिने आपल्या बरोबर आपला लहानगा भाऊही घेतला. आम्ही पायी चालत आलो. लहानपणी माझ्या हातांत हात मिळवून धीटपणे चालणारी नलू माझ्यापासून अंतर ठेऊन सावधपणे चालत होती. कडेवर तिचा भाऊ होता. पूर्वीप्रमाणे हंसत -खिदळत न चालता, ती बेतानेच बोलत राहिली. आम्ही घरीं आलो. आईला आनद झाला. दादाही घरी होता. “ही मुलगी जरा ठेंगणी वाटते नां? ” इतकंच म्हणाला. तिच्यामुळे सर्वांना आनंद झाला. थोड्याफार गप्पा मारून ती निघून गेली.
माझा जुना छंद उफाळून आला. आईच्या परवानगीशिवाय मी नलूच्या घरीं वारंवार भेटायला जाऊं लागलो. एकदा नलूची आई सहज बोलतांना म्हणाली.”नलू कौन्वेंट शाळेत शिकत होती तेंव्हा काळजी नव्हती. मुलींची शाळा. आत्ता ती कौलेजात शिकते जिथे मुलं-मुली एकत्र शिकतात. तिथे ती ‘लव्ह’ का कांहीतरी करतात, म्हणून काळजी वाटते ”
“मग मी इथे वरचे वर येतो, यात तुम्हांला वावगं वाटत नाहीं नां?” मी स्पष्टच विचारलं.
“तुझं प्रेम आहे, म्हणून तूं येतोस” ती माऊली म्हणाली. माझ्या प्रेमाला विरोध नव्हता अशी माझी समजूत झाली.
कालांतराने माझा भ्रम निरास झाला.
— अनिल शर्मा