शिक्षक मुलांना शिकवता शिकवता बरेच काही मुलांकडून शिकतो, अर्थात तो हे कबूल करणार नाही. काही प्रामाणिक शिक्षक मात्र हे कबूल करतीलच.
मुळातच शिक्षकाने सर्वप्रथम स्वतःचा ‘अहं’ बाजूला ठेवला पाहिजे. मला खरा चांगला शिक्षक मुलांनीच बनवले. त्याच्या समस्या इतक्या अफाट होत्या की मी त्याचा पूर्वी कधी विचार केला नव्हता. अर्थात माझा सरकारी शाळेमधील शिक्षकाप्रमाणे पगारही नव्हता. मी आपणहून चांगली नोकरी सोडून शिक्षकी पेशा पत्करला होता. मी त्याला व्यवसाय म्हणत नाही तर ती माझी उपजीविका होती. त्यामुळे कदाचित असेल मी प्रत्येकवेळी माझ्या बाबतीतही परखड होतो. एक मुलगा आला तरी शिकवायचे आणि दहा मुले आली तरी तसेच. जाहिरातबाजी करून मुले आणणे किंवा प्रत्येकाच्या घरी जाऊन पालकांना पिडणे म्हणजे विकृत मार्केटिंग करणे मला कधीच मानवणार नव्हते. मी शिक्षक होतो तासावर काम करणारा शिक्षक नव्हतो, काही शिक्षक असतात असे दोनचार क्लास पकडतात आणि फिरत असतात ज्ञान वाटत ते मला कधीच जमणार नव्हते. ह्याचा असा फायदा असा झाला की मुलांना मी पूर्ण वेळ देवू शकलो, त्याच्या समस्या सोडवू लागलो. जर चांगला शिक्षक व्हायचे असेल तर मुलांचा विश्वास मिळवणे गरजेचे आहे. परंतु तसे कमी दिसते. मुले सर्वच गोष्टी आपल्या पालकांकडे बोलू शकत नाहीत. मुलीचे पण तसेच असते कदाचित ते मित्राकडून फसवले जातील किवा त्यांचे भलतेसलते ऐकतील. जर शिक्षकाने मुलांना विश्वास दिला तर ते शिक्षकालाच आपल्या समस्या विचारतील. पण हल्ली तसे जवळजवळ नाहीच म्हणावे लागेल. मुलांनी अभ्यास तर केलाच पाहिजे पण पुढे जगताना ज्या समस्या येतील त्यानाही तोड देता आले पाहिजे इथे मात्र पालकापेक्षा शिक्षक महत्वाचा असतो.
मला आठवतंय माझ्याकडे अमित नावचा मुलगा आला. मुलगा आठवीत असेल. साधा होता पण अभ्यास मन लावून करत नव्हता अशी त्याच्या आईची तक्रार होती. हळूहळू कधी विश्वासात घेऊन तर कधी दणके हाणून गाडी रूळावर आणली. त्याच वेळेला त्याच्या ओळखीची एक मुलगी पण माझ्याकडे शिकण्यास आली ती बऱ्यापैकी हुशार होती. दोघेही अभ्यास करावयाचे. हळूहळू मुले जास्त मुले येऊ लागली. कारण मी ठरवले होते हुशार मुले घ्यायची नाहीत त्यांना खुप क्लास आहेत. अर्थात माझी बरीच डोकेफोड व्हायची आणि एकदा करायचे म्हटले म्हणजे करावयाचे असा माझा स्वभाव असल्याने मी काही मागे हटणार नव्हतो. ती दोघेही अभ्यास करायचे. पुढे दोघेही पास झाले. पण त्याचे प्रेम इथेच जमले हे मला मग समजले आणि दोघांनी दहा ते बारा वर्षानंतर लग्न केले. आता ते दोघेही अत्यंत समृद्ध आयुष्य जगत आहेत. का कुणास ठाऊक आज इतक्या वर्षानंतरही त्यांना माझ्याबद्दल आदर आहे आणि मला त्याच्याबद्दल कारण त्यांनी कुठल्याच मर्यादा ओलांडल्या नाहीत हे महत्वाचे. अशी मुले मलाही खुप शिकवून जातात.
अभ्यास तर करावयाचा असतोच असतो, पण त्याचे वयही लक्षात घ्यायचे असते. मला वाटते की पालकापेक्षा शिक्षक महत्वाचा आहे.
कधीकधी मुले वाचायला बसतात आणि बराच वेळ पुस्तकाचे पान बदलत नाहीत तेच पान बघत असतात आणि मनात वेगळेच विचार येत असतात. आई किंवा वडील ओरडतात आणि मग तो भानावर येतो आणि मग त्याचे वाचण्याचे नाटक परत सुरु होते.
घरात अभ्यास केला नाही म्हणून आई वह्या तपासते पण कधी वहीचे शेवटचे पान तपासते का? नाही पण ते पण महत्वाचे असते कारण मुलाच्या किंवा मुलीच्या मनात काय चालले आहे ते त्या पानवरून लक्षात येते. मुले जेव्हा शाळेत किवा घरी अभ्यास करताना मागच्या पानावर गिरवत असतात ते गिरवणे साधे नसते. त्याच्या मनातले विचार दिसत असतात, कधी घराच्या चित्राने, तर कधी ती मुले झाड काढतात, तर कधी बदाम आणि काही तरी लिहितात. या मधून मुले स्वतःला अर्धवटपणे व्यक्त होत असतात आणि इथूनच खरी त्यच्या जडण घडणीला सुरवात होते. ती जडण-घडणाची वेळ, वेळेवर लक्षात आली पाहिजे आणि या ठिकाणी पालकांनी-शिक्षकांनी जागरूक राहिले पाहिजे.
सतीश चाफेकर
Leave a Reply