नवीन लेखन...

८ वी ड – भाग ११

आज तो माझ्या समोर स्टेशनवर असताना उभा राहिला, कुठे निघालास मी विचारले तेव्हा त्याच्याबरोबरचा भाऊ त्याला म्हणाला ह्याला मुंबई दाखवतो. नववीपासून माझ्याकडे तो होता. गावाहून आलेला होता. दहावीची परीक्षा दिल्यानंतर त्याला बजावले होते, इथे पुढे शिकू नकोस, गावी परत जा. पण त्याने माझे ऐकले नव्हते. मुंबईच्या लोभाने परत तो आला. आत्ता चित्र बिघडले होते. हातात मोबाईल, सतत चालू होता, माझ्याशी बोलताना देखील, केस खूप वाढलेले होते. मला माहित आहे गाडी कुठल्या वळणावर जाणार ते. मी काहीही करू शकणार नाही हे मला कळून चुकले होते. त्याचे भागधेय मला दिसत होते. गाडी आली तो पुढे ‘जातो’ म्हणून निघून गेला. मी पण माझी पाटी कोरी केली. ह्या का ला माझ्याकडे उत्तर नव्हते. प्रलोभने त्याला बोलवत होती आणि त्याचा मार्ग त्याने पकडला होता. आधी घरी सांगून ठेवले होते. पण काही उपयोग झाला नाही. वाचला तर वाचेल.

हे असे अनेक वेळा माझ्या बाबतीत होते. चांगली मुले पानाच्या टपरीवर गर्दी करतात. ठराविक पानवाल्याकडे, ते का करतात याचा कोणी विचार करते का? तो पानवाला त्यांना कोणत्या प्रकारची पाने खायला देतो, त्यात असे काय घालतो की ती मुले आणि माणसे त्या पानात असे काय घालतात. खरा हा प्रश्न पोलिसांना पडला पाहिजे पण ते त्याहून भिकार कारण त्यांच्याही गाड्या अशा पानवाल्यांच्या दुकानासमोर उभ्या असतात. कोणीच नाही आणि मग ही मुले अशीच त्या अंधारात जातात. मी एकटा काय करणार. परंतु जास्तीत जस त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो.

माझ्याकडे एक आठवीतला मुलगा होता. त्याने गुटखा खाल्ला होता. मी त्याच्या आईला बोलवले, ती आली बिचारी मी तिला तुमच्या मुलाने गुटखा खाल्ला हे सांगितले तेव्हा ती रागाने त्याला म्हणाली सरांसमोर गुटखा का खाल्लास. मी साफ आडवा झालो, त्या माउलीकडे बघितले आणि मनातून हात जोडले. आत्ता बोला मी शिक्षक म्हणून काय डोस पाजणार. कारण आपली कार्टी काय करतात हे त्यांना माहित असते. आजूबाजूला तेच वातावरण असते. पोलिसांना सर्व माहित असते. पण काही उपयोग नाही. मग आमच्यासारख्या शिक्षकाला त्याला व्यसनापासून मुक्त करण्याचे काम करावे लागते. माझ्याकडे एक मुलगा होता, भरपूर मावा खायचा, तोंड धड उघडत नव्हते. एक ढोबळ परीक्षा असते मावा, गुटखा खाणाऱ्यांची ती म्हणजे तोड पूर्ण उघडल्यावर चार बोटे उभी आत गेली पाहिजे, ती नाही गेली तर समजावे याला आज ना उद्या कॅन्सरचा रोग जडणार. आज अनेक मुले कमवतात, मोठी मोठी कंत्राटे घेतात, पण तोंडात तोबरा भरलेला. मी सांगतो पण ती सांगण्यापलीकडे गेलेली असतात. प्रारब्ध त्याचे.

काहीजण खरेच सुधारतात. पण काही सुधारत नाहीत. नाविन्यापोटी एखादे व्यसन चिकटवून घेतात. इतकेच काय आज काही मुली देखील त्या बाबतीत ‘सुधारल्या’ आहेत. जरा पानाच्या टपरीजवळ पंधरा मिनिटे उभे रहा सर्व काही कळेल. यासाठी पालकांनी मुलाभोवती कोणते वातावरण आहे हे तपासले पाहिजे. त्याचे दात, उच्चार यावरून सर्व काही कळते. पण आपल्या मुलासाठी तितका वेळ द्यायला पाहिजे. आमच्याकडे त्यांना देण्यासाठी पैसा असतो पण वेळ नाही. अर्थात हे वाक्य इतके गुळगुळीत झाले आहे की त्याची सोय नाही. मुलांना प्रत्येक नवीन गोष्टीचे आकर्षण असते आणि ती त्याच्याकडे सहज खेचली जात हे सत्य कधीच नाकारता येणार नाही. आज नवीन काही तरी करण्याच्या नादात मुले नको ते करून बसतात आणि मग ते व्यसन त्याच्या ताब्यात राहत नाही. पुढे संपूर्ण घर अक्षरशः वादळात सापडते. आज आठवी-दहावी मधील मुले केवळ संगतीने, नाविन्यापोटी जे काही करतात आणि त्याला बळी पडतात, हे आत्ताच सावधपणे बघितले पाहिजे. मी परत परत सांगत आहे कारण प्रत्येकांनी आपले घर तपासून बघितले पाहिजे. कोणत्या क्षणी कुणाला कशाला सामोरे जावे लागेल याचा नेम नाही. वरती सांगितल्याप्रमाणे आपला मुलगा नाक्यावर जातो म्हणजे कुठे जातो, तो कोणत्या टपरीवर जातो, त्याचे मित्र कोणते हे बघितले पाहिजे. मुलगा जसजसा मोठा होऊ लागतो तसतसा त्याचा हात आपल्यापासून दूर जाऊ लागतो कधीकधी हे कळत नाही, उशीर झाल्यावर मात्र कळते. खरे तर अशा टपर्‍यांची तपासणी प्रशासनाने केली पाहिजे, तेथील पानाचे, कत्थ्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासून घेतले पाहिजेत. पण कुणाला काय पडली आहे, आज पिढीच्या पिढी नको त्या रोगाला बळी पडत आहे. मुलांना कळत नाही आपण काय करतो ते. ह्या मुलाच्या नाविन्याची सुरवात खरे तर शालेय जीवनापासूनच सुरु होते, त्याची सुरवात सुगंधी सुपारी आणि सुगंधी बडीशेपने होते हे प्रत्येक पालकाने लक्षात ठेवले पाहिजे. हळूहळू तो मुलगा तिथे खेचला जातो, एकएक पायरी तो कधी चढू लगतो त्याचे त्यालाच कळत नाही. साधा दिसणारा मुलगा जेव्हा घरामध्ये थुंकताना दिसला की समजावे भाईचा मार्ग बदलत आहे. पुढील १० वर्षात कॅन्सरचे इतके रुग्ण सापडतील की त्याच्यासाठी उपचार कुठे आणि कसे करायचे हा प्रश्न पडेल.

आपल्या मुलाना तुम्ही जसे बागेत नेता, चित्रपटात नेता तसे एकदा तरी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये घेऊन जा आणि माणसाचे व्यसनाने केलेलं भयानक रूप दाखवा. म्हणजे त्याला लहानपणीच कळेल आपण काय करावे आणि काय करू नये. तिथे असणारा प्रत्येकजण किती हालअपेष्टा भोगत असतो, जिवंत मरण जगत असतो हे कळेल. काही तर शाळांनी मुलाची एखादी शैक्षणिक सहल अशा हॉस्पिटलमध्ये काढावी. माझी प्रत्येक शाळेला हीच विनंती नववीच्या-दहावीच्या मुलाची एखादी सहल तेथे काढा बघा मुलांमध्ये किती आमुलाग्र बदल होतो ते, कारण मुलाच्या मनावर लहानपणी जे कोरले जाते, बघितले जाते ते ती कधीच विसरणार नाहीत. रिसोर्ट किवा बिस्किटं कंपनी दाखवण्यापेक्षा हा जिवंत मृत्यू दाखवा, मुले खूप काही शिकतील, जे रोजच्या अभ्यासाइतकेच महत्वाचे आहे आणि हो फक्त अ आणि ब तुकडीच्या मुलांना नेहमीप्रमाणे नेऊ नका तर क आणि ड तुकड्या पहिले न्या.

मग नेणार का? पुढल्या पिढीसाठी इतकेतरी कराच करा. मग त्यांना नेणार ना? बघा काय फरक पडतो ते.

सतीश चाफेकर

Avatar
About सतिश चाफेकर 448 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..