मुलांच्या आणि त्यांच्या आई-वडलांच्या समस्या कधीकधी मुलांना नाही तर आजूबाजूच्यांना अडचणीत आणतात त्यांना विचारा प्रवृत्त करतात. आज काही उच्चभ्रू पालकांची मुले मोठ-मोठ्या महागड्या शाळेत जातात. परंतु त्या उच्चभ्रूचे जे प्रोब्लेम हे आपल्या कल्पनेबाहेरचे असतात. अशाच एका शाळेत दोन मुलांनमध्ये धुसफूस व्हायची, साध्या साध्या कारणावरून व्हायची. खरे तर दोघेही एका वर्गातले नव्हते. तरीपण धुसफूस व्हायची , दोघेही एकमेकांच्या खोड्या काढायचे. शिक्षकांना कळात नव्हते हा प्रकार काय आहे . त्यानी मुलांना त्यांच्यापरीने विचारण्याचा प्रयत्न केला पण काही निष्पन्न झाले नाहे. शेवटी एका पालकसभेला त्या मुलाची आई आली होती , तिला विचारले , आधी तिने सांगितले नाही परंतु शिक्षकांनी खोदुन खोदुन विचारले तेव्हा सांगितले की तिच्या नवऱ्याचा घटस्फोट झाला आहे आहे आणि त्याने त्याच मोठ्या सोसायटीमध्ये असलेल्या एका घटस्फोटीत स्त्रीबरोबर विवाह केलेला आहे.आणि तो दुसरा मुलगा माझ्या नवऱ्याच्या दुसऱ्या बायकोचा आहे आणि हे माझ्या मुलाला माहित आहे की ते त्याचे बाबा आहेत आणि ते त्याच्याजवळ राहत नाहीत ते त्या मुलाकडे राहत आहेत. त्यामुळे दोघात कुरबुरी होत असते. अर्थात दुसऱ्या मुलाला देखील ते माहीत आहे की हे आपले बाबा नसून माझ्या मुलाचे बाबा आहेत. आता याला पर्याय काय असणार एकतर त्यांच्या शाळांच्या वेळा बदलायच्या किवा शाळा बदलायच्या. अशा अनेक समस्या शिक्षक या नात्याने बघाव्या लागतात किवा कधीकधी सोडवाव्या लागतात परंतु एका शिक्षकाने दुसऱ्याच्या आयुष्यात किती हस्तक्षेप करायचा यालासुद्धा मर्यादा असताच. तशा मलाही होत्या म्हुणुन काही गोष्टी सुधारता येत असून सुधारल्या गेल्या नाहीत याचीच खंत वावत राहते.
ह्यावरून कळते हे जग खूप लहान आहे आणि जवळही आहे फक्त एक वेगळेच अनामिक मोठे समजले जाणारे अन्तर त्यात असते. आत्ता पाहिले तर ती मुले , ती कुटुंबे मला भेटत नाहीत परंतु मला स्वतःला विचार करण्यास प्रवृत्त करून गेली. आज कुठल्याही कोर्टात जा घटस्फोटाच्या खूप केसेस येत असतात , तशाच रखडत असतात यामध्ये फरफट होत असते त्या मुलांची. ह्याचा विचार कुणी कधी केला आहे का . आपला ईगो किती जोपासावा याचाही विचार करणे आयुष्य आहे , आज या अशा केसेस ना दुर्देवाने ‘ प्याकेज ‘ म्हणतात म्हणे. एखाद्याचे ‘ प्याकेज ‘ होते परंतु अनेक नात्यांची फरफट होते , ससेहोलपट होते याचा विचार कुणी कधी केला आहे का.
आज मुलांना गोडपणे समजावले जाते परंतु ठराविक वयांनंतर मात्र ती समजावण्याच्या पलीकडे जातात याचे भान पालकांनी ठेवले पाहिजे. आपले पती-पत्नी मधील ताणताणाव किती ताणावेत याचे भान ठेवले पाहिजे. त्याचा परिणाम कळात नकळत मुलांवर सतत होतच असतो हे तर आता सर्वाना माहीत आहे तरीपण अनेक घरात हे घडतच असते. अनेक मुले मला म्हणत सर इथे आले की बरे वाटते , घरी जावेसे वाटत नाही. अर्थात त्याला एक कारण घरी अभ्यास करावा लागणार नाही हे असतेच पण हे कारण सगळ्यांचेच नसते. मुले म्हणत सर तुमच्याशी गप्पा मारल्यानानातर आम्ही एकदम फ्रेश होतो. घरी तेच ते रडगाणे असते. आपल्या घरात मुलांना राह्यला पाहिजे , आवडायला पाहिजे. ह्यासाठी खूप काही विचार करायलाहवा . सतत घरात वाद-प्रतिवाद असतील तर मुलगा घराच्या बाहेर जाण्यासाठी मार्ग शोधणारच. माझ्याकडे बरीच झोपडपट्टीमधील मुले यायची. हल्ली आपण ज्यांना झोपड्या म्हणतो त्याच्याही घरात बरेच काही असते जे मध्यमवर्गीय माणसांच्या घरात असते तरीपण काही गरीब कुटुंबे असतात , बाई बिचारी धुणी-भांडी करत असते , नवरा सध्याकाळी येतो तो डोलतच. मग घरातील मुले सगळी बाजूच्या नाक्यावर जमा होत आणि मग हळूहळू त्यांचा कल ‘ सर्वगुणसंपन्न ‘ संपन्न होण्याकडे सुरु होतो हे मला माहीत होते, म्हणून मी मुद्दामून त्याच्या झोपड्याच्या बाजूला फिरत फिरत अचानक जायचो आणि मग पळापळ व्हायची. कोणाच्या तोंडात पान तर कुणाच्या घुटका. एखाद दुसरा सापडायचा . मग तिथेच सर्वांसमोर त्याचा ‘ क्लास ‘ घ्यायचो. मग मी आल्याचे कळल्यावर घरात असलेल्या आया यायच्या आणि त्याच्याबद्दल तक्रारी सुरु व्हायच्या . महिन्यातून एक-दोन वेळा हा आमचा कार्यक्रम व्ह्यायचा . त्यामुळे मुले आजूबाजूला बघायची , मी लांबून येताना दिसलो की पान टपरीवाला ‘ सैतान ‘ आला म्हणून खुण करायचा. पण एक सांगतो कुणी माझ्या मुलाला बोलले , किवा हाणले का हा पांढरपेशी प्रश्न विचारला नाही हे महत्वाचे.
त्या ठिकाणचा मुलगा माझा विद्यार्थी होता , त्याचे लग्न झालेले मला कळले नाही. त्याची गोष्टच वेगळी कारण त्याची बायको मला म्हणाली मीच त्याला पळवले कारण त्याच्या घरात हे लग्न मान्य नव्हते. पुढे तो संसाराला लागला, आगाऊपणा मुले ‘ आतही ‘ जाऊन आला. परंतु आता सुरळीत आहे त्याचे. कधीतरी फोन येतो आठवण आली म्हणून. सुरवातीला ज्या मुलांची गोष्ट सांगीतली ती उच्चभ्रूची होती तर आत्ताची सध्या घरातील ही मुले म्हणण्यापेक्षा झोपड्यातील मुलांची होती. चाळीत रहाणारी मुले हा आणखी वेगळा प्रकार आहे , त्यांचे घरातले विश्व वेगळे परंतु बाहेरचे जवळजवळ तसेच म्हणावे लागेल. एक चाळीतला मुलगा माझ्याकडे यायचा साधा , सरळ होता तो एकदिवशी काय डोके फिरले कोण जाणे मला म्हणाला मी माझ्या काकाला हाणणार आहे. शांत मुलगा हे बड्बडलेला पाहून मी जरा चक्रावलो. तो म्हणाला माझा काका माझ्या आईला सारखा त्रास देतो , सतत चुका काढतो तिच्या, मी समजूत घातली त्याची. तशी तो थंड झाला. पण परत चार-आठ दिवसांनी तेच रडगाणे सुरु झाले. मग मात्र मी सहज एका रविवारी घरी गेलो, नकळतपणे त्या काकाला सागण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. घरात सगळेच कंटाळलेले होते पण करणार काय गावी जा म्हणत येत नाही. एक दिवशी तो मुलगा म्हणाला काकाचे घरात भांडण झाले आणि पेटी पकडून ते निघून गेले. बऱ्याच दिवसांनी कळले ते गावी गेलेच नाहीत परस्पर हरिद्वारला गेले ते परत आलेच नाहीत. अशा अनेक घटनांना मला तोड द्यावे लागले की ज्यातून निष्पन्न काही व्हायचे पण माझ्या डोक्याच्या मेंदूचा मात्र भुगा व्हायचा. हे सर्व मी मुलांसाठी करत होतो , मुले केंद्रस्थानी होती.
एके दिवशी एक क्लासचा मुलगा आला, दुपारचा आला , मी ओरडलो सकाळी का आला नाहीस म्हणून आणि शाळेत नाही गेलास. माझा आवाज आईकून तो रडकुंडीला आला म्हणाला पैसे हवे आहेत चारशे रुपये , आम्हाला टी. सी. ने पकडले आहे. नाहीतर घरी मेलोच आम्ही. माझे दोन मित्र पण आहेत. मी चारशे रुपये दिले. आणि संध्याकाळी बोलवले. संध्याकाळी तो परत चारशे रुपये घेऊन आला. सर तुमचे पैसे. मी म्हणालो घरून आणलेस ना, तेव्हा तो म्हणाला तुम्ही दिलेलेच आहेत मी परत हैराण , तो म्हणाला पैसे होते खिशात पण तुम्ही भेटला नाही असे सांगितले. थोडे आम्ही रडलो तेव्हा त्यालाच दया आली आणि त्याने आम्हाला तंबी देऊन सोडले. असली ही कार्टी.
आत्ता असे अनुभव आमच्या ‘ अ ‘ तुकडीला शिकवणाऱ्या शिक्षकांना किंवा क्लास मध्ये ‘ रतीब ‘ घालणाऱ्या शिक्षकांना येतील का ? अजिबात नाही..तुमचे काय म्हणणे आहे…
सतीश चाफेकर.
Leave a Reply