मुले भांडतात , एकत्र होतात, कधी शिक्षक त्यांना शिक्षा करतात तर कधी पालक शिक्षा करतात. माझाकडे बहुतेक मस्ती करणारी, सतत शाळेत मागे राहणारी, मागच्या बाकावर बसणारी मुले असायची. एखादाच हुशार आणि आज्ञाधारकधारक असायचा. पण ९ वी मध्ये तो गेला की त्याचे पालक भरपूर फी देऊन त्याला मोठ्या क्लासला पाठवायचे, जास्त मार्क मिळावे म्हणून, परन्तु कधीकधी तिकडे तो जास्त प्रगती करायचा नाही. खरे तर तो पाचवीपासून माझ्याकडे असायचा. त्याला दुसऱ्या क्लासला जायचे नसायचे परंतु गुणांसाठी ‘हावरट’ असेलल्या पालकांना कोण समजावणार. आज किती हुशार मुले कुठेतरी नोकरी करत असतात बाकी जास्त काहीच करू शकत नाहीत. परंतु जी मस्तीखोर मुले काहीतरी चांगले करून दाखवतात. माझ्याकडे मस्तीखोर शेवटपर्यंत टिकायची. कारण आईवडीलाना पक्के माहीत असायचे आपला मुलगा मोठ्या क्लासला गेला की संपला म्हणून समजायचे. कारण मोठ्या क्लासवाल्याचे खरे मार्केटिंग हुशार मुले करायची, जे हुशार नाहीत ते त्याचे खरे ‘बकरे’ असायचे. आजही तसेच आहे पण बिनडोक पालकांना कोण सांगणार शेवटी अपयश येतेच येते.
एकदा सकाळी मी शिकवत होतो एक पालक एके आपल्या मुलाला घेऊन आले. पालक चांगले श्रीमंत होते. मुलगा साधा दिसत होता. आम्ही बोलत असताना आणखी दोन मुली पालकांना घेऊन आल्या होत्या. त्या मुलाला बघितले आणि त्या मुली चपापल्या. त्या मुलाच्या पालकांनी मला सगळे सांगितले ह्याला तुमच्या क्लासमध्ये घ्या, मस्तीखोर आहे. मी म्हटले उद्यापासून पाठवा. ते निघून गेले. मग त्या मुली आणि त्याचे पालक आणि त्या मुलीबद्दल मी विचारले. त्यांना पण मी उद्यापासून या म्हणून सांगितले. तेवढ्यात त्या म्हणाल्या सर हा मुलगा आमच्या वर्गात आहे. तो पण येणार आहे का ? मी हो म्हणालो तेव्हा त्यातली एक म्हणाली सर तो तुम्हाला भारी पडेल. त्याला घेऊ नका. मी म्हणतो मी त्याला माझ्या क्लासमध्ये घेणार कारण मला अशाच मुलांना शिकवायाचे आहे. त्या मुली विचारात पडल्या. त्या ज्या परत गेल्या त्या परत आल्याच नाही. तो मुलगा मात्र येऊ लागला. तिसऱ्या दिवशी बाजूचे सांगायला आले, सर त्या मुलाला घेऊ नका क्लासमध्ये तुमची वाट लागेल… मी म्हणालो हे आव्हान स्वीकारुच. मुलगा हुशार पण प्रचंड मस्तीखोर. डोक्यात सणक आली की काहीपण करायचा. भाऊ डॉक्टर, बहीण शिकलेली पण कार्टे हे असे. दोन-तीन दिवस गोड बोललो, समजावले. पण फरक नाही. त्या दिवशी त्याची मोठी बहिण बरोबर आली होती तक्रार घेऊन. माझी आधीच सटकलेली त्याला त्याच्या बहिणसमोर इतका धु धु धुतला की माझ्या घराच्या दरवाजाची कडीच तुटली. त्याची बहिण रडू लागली. माझा तो अवतार पाहून इतर मुले ‘टाईट’ झाली, त्यानाही कळले आपली वाट चुकली, त्याआधी त्यांनी माझा असा अवतार बघितला नव्हता. इथे आपले काही चालणार नाही आणि त्याच्या पालकानी माझ्याशिवाय कुठलाच पर्याय त्याच्यापुढे ठेवला नव्हता. ते बिझनेस करणारे होते. त्यांना कळले की आपल्या मुलाला असाच मास्तर हवा.
खरेच मुलगा हळूहळू रुळू लागला. परंतु शाळेत शिक्का बसलेला होता तो काही पुसला जात नव्हता. अर्थात शाळेमधल्या एक बाई त्याच्या बाजूने होत्या. हे विद्वान असा काही पराक्रम करत की त्या बाई जास्त त्याची बाजू घेऊ शकत नव्हत्या. गणिताच्या मास्तरची त्याची काय दुश्मनी होती कोण जाणे. कधीही वह्या पुऱ्या नसायच्या . ते वर्गात आले की हा भाई मागच्या बाकावरून पुढे यायचा आणि मास्तरांपुढे पुढे हात करायचा आधी मास्तरला कळायचे नाही . पहिल्यांदा असा हात पुढे केल्यावर म्हणाला सर गृहपाठ केला नाही, छड्या मारा, उगाचच तुम्हाला शेवटच्या बाकापर्यंत यायचा त्रास नको. हे आईकल्यावर मास्तर मजबूत कावला . त्याने दणादण त्याला हाणले आणि वर्गाबाहेर जा म्हणून सांगितले. तो आनंदाने गेला. पण बाहेर शाळाभर फिरत होता. कुणी विचारले तर सरांनी काम सांगितले आहे म्हणून सांगितले. आणि हा त्याचा नेहमीचा दिनक्रम बनला. हळूहळू तो ताळ्यावर आणला खरा. पण त्याचे मराठीच्या बाईचे काय बिनसले ते कळले नाही. एक शिक्षिका त्याच्या आणि काही मुलीच्या मते त्या बाई कविता समजावत नाहीत आणि मुलांनी प्रश्न विचारला की तुम्हाला मर्ढेकर माहित आहेत का कधी आरती प्रभू माहेत आहेत का असे विचारायच्या त्याचे म्हणणे खरे होते, पण त्यांची विचारायची जागा चुकली होती, ८ वी ड आणि मर्ढेकर आणि आरती प्रभू यांचे नाते त्या जोडावयाला निघाल्या होत्या. माझ्याकडे कवितांची पुस्तके असायची, मी त्यांना नीट समजावयाचो, खरेच त्यांना समजावयाचे. एकदा तो म्हणाला मला पुस्तक द्या सर मी याचा अर्थ बाईना विचारतो, कारण बाई गाईडमधला अर्थ सांगतात हे मला माहित आहे, झाले त्याने बाईना पिडायला सुरवात केली, यांचे बघून एका मुलीनेही पिडायला सुरवात केली आणि ही कुठल्याही कवितेचा अर्थ स्टाफरूम मध्ये जाऊन विचारात. अर्थात बाईंना मर्ढेकरांची एक कविता ठीक आहे पण अख्या पुस्तकामधली कोणतीही कविता म्हणजे भयानकच. त्या मग ये, उद्या ये असे सांगून चुकवू लागल्या. एकदा तर म्हणे ह्या मुलांना पुस्तक घेऊन येताना बघून बाथरूम मध्ये गेल्या त्या बऱ्याच वेळ बाहेरच आल्या नाहीत. तेव्हा मी हे थांबवले.
तो मुलगा दहावी पास झाला. संपूर्ण शाळेला आश्चर्य वाटले. आई वडीलांना आनंद वाटला. पण त्यावेळी त्याच्या आईला कोण दुर्बुद्धी सुचली कोण जाणे. शेजारच्या मुले-मुली मुंबईच्या कॉलेजमध्ये जातात म्हणून आपल्या मुलालाही मुंबईच्या कॉलेजमध्ये घातले आणि इथेच घोळ झाला. भाई सकाळी गेले की संध्याकाळी उगवायचे, संपूर्ण कंट्रोल सुटला होता त्याच्यावरचा. त्याचा परिणाम म्हणजे ११ वी आणि १२ वीचा तो पंढरीचा वारकरी झाला. ऑक्टोबर – मार्च ७ – ८ वेळा वाऱ्या झाल्या. खुप समजवले. एकदा त्याला कळले काहीतरी करायला पाहिजे आणि मग खरेच त्याने मग मन लावून अभ्यास केला. आत्ता अमेरिकेत आहे, त्याची बायको शिकलेली आहे, त्याला एक मुलगी आहे. सर्व काही सुरळीत आहे. ही अशी मुले म्हणजे कळले तर सुत नाही तर भूत अशीच असतात.
सतीश चाफेकर
Leave a Reply