गेल्या ४० ते ५० वर्षांत हृदय रोगाचे प्रमाण खूपच वाढले आहे . गेल्या ४ ते ५ दशकांमध्ये लोकसंख्या खूपच वाढली आहे . तसेच पूर्वी आपल्या देशाचे सरासरी वय होते ३५ वर्षे होती . जसजशा सुधारणा घडत गेल्या , औषधोपचार पद्धतींत खूपच बदल होत गेले व नवनवीन चाचण्या येऊ लागल्या व रोगांचे निदान अचूक होऊ लागले व त्यांचे उपचार चांगल्या रीतीने होऊ लागले , तसतसे जगण्याचे प्रमाण वाढत गेले . सध्या सरासरी वय आहे ६५ वर्षे आहे . येत्या १० वर्षांत हे सरासरी वय ७५ ते ८० वर्षे होऊ शकेल असा होरा आहे .
कार्डिओग्राम , एक्स रे , २ – डी ईको , स्ट्रेस टेस्ट , सि.टी. व एम् . आर् . आय् . स्कॅन , सि.टी. अंजीओ , थॅलियम स्कॅन , स्ट्रेस इको , रक्ताच्या चाचण्या , इन्वेझिव अँजियोग्राफी ह्यांच्या आधारे हृदयाच्या निरनिराळ्या व्याधींचे निदान होऊ लागले . हृदयाचे बरेच प्रकारचे आजार असतात . त्यांचे वर्गीकरण मुख्यतः खालील प्रमाणे आहे .
हृदयांतील पडद्यामध्ये
१ ) जन्मतःचे हृदयरोग छिद्र असणे . ( ए.एस् , डी , व्हि.एस्.डी. , ओओर्टो पल्मोनरी विंडो , डक्टस् पेटंट आर्टेरिओसिस ASD , USD ,
AP Window , PDA इत्यादि .
२ ) हमॅटिक हृदयरोग हृदयांतील झडपा खराब होतात . जसे स्टेनॉसीस , ओओर्टिक स्टेनॉसीस इत्यादि .
३ ) तापांच्या आजारांचे हृदयरोग – ( जंतूंचे व विषाणूंचे आजार ) कोविड १ ९ ( करोना ) , निरनिराळ्या प्रकारचे विषाणू , डिप्थीरिया , व्हायरल
हमॅटिक तापापासून मायट्रल मायोकार्डायटिस .
४ ) क्षयरोगापासून होणारा हृदयरोग – हृदयाच्या आवरणाला येणारी सूज व त्यांत पाणी जमणे
पेरिकार्डिटिस ( Pericarditis ) .
५) ईस्किमिक हृदयरोग ( Ischemic Heart Disease ) – हार्ट अॅटॅक , ॲजायना इत्यादी रोग प्रामुख्याने मधुमेह व उच्च रक्तदाब व उच्च स्निग्ध पदार्थांचे प्रमाण ह्यापासून उद्भवतो .
६) डायल्याटेड मायोकार्डाइटिस – ह्या आजारात हृदय बरेच मोठे होते . त्याच्या स्नायूंची शक्ती क्षीण होत जाते . हृदयाचे आकुंचन बरोबर होत नाही . त्यापासून बऱ्याच प्रकारचे त्रास होतात .
७ ) उच्च रक्तदाबापासून होणारा हृदयरोग हृदयाचे स्नायू जाड होतात . त्याचा वाईट परिणाम आकुंचनावर होतो .
८ ) हृदयाचा व हृदयाच्या आवरणाचा कर्करोग . ह्या व्यतिरिक्त हृदयाचे दुसऱ्या प्रकाराचे रोग असतात . परंतु त्यांचे प्रमाण खूपच कमी आहे . त्यामुळे ते आजार ह्या लेखात दिलेले नाहीत .
हृदयरोगांत व्याधिक्षमत्व ( Immunity ) नक्कीच कमी होते . मग तो कोणत्याही प्रकारचा हृदयरोग असो . हृदयरोगात जेव्हा हृदयाची आकुंचन पावण्याची क्रिया कमी होत जाते व रक्तप्रवाह योग्यरीतीने होत नाही , त्यावेळी रक्तातील प्राणवायूचे प्रमाण कमी होते , ह्याला कंजेस्टिव कार्डियाक फेल्युअर ( CCF ) असे म्हणतात . यामध्ये भूक लागत नाही . आहार कमी होतो . त्यामुळे यकृत मोठे होते व अंगाला सूज येते. त्यामुळे व्याधिक्षमत्वाला लागणारे इम्यूनिटी प्रोटीनस् कमी होतात . ह्याचा परिणाम व्याधिक्षमत्वावर होतो . इम्यूनोग्लोब्यूलिन्स कमी होतात .
नवीन संशोधनात असे दिसून आले आहे की , हृदयरोगांत कोलेस्टरॉलचे बारीक कण इम्यूनसिस्टीम मधील बारीक कणांना उत्तेजित करते व त्यामुळे सुद्धा व्याधी विरोधी बल कमी होते , तसेच रक्तवाहिन्यांत Atherosclerosis वाढते . तेथील स्थरांना सूज येते , रक्तवाहिन्यांना अपाय होतो . त्यातूनच हृदयशूल , मेंदूत रक्ताची गाठ होणे , अर्धांगवायूचा झटका येणे व बऱ्याच रुग्णांमध्ये मृत्यू होऊ शकतो .
सायटोकाईन्स ( cytokines ) चे प्रमाण रक्तात वाढते . याचा अपाय शरीरात हृदयाव्यतिरिक्त बऱ्याच ठिकाणी दिसून येतो . हृदयाच्या Dilated Cardiomyopathy प्रकारात तर हे प्रमाण जास्त दिसून येते .
Rheumatic Heart Diease मध्ये तर हृदयाच्या झडपा खराब होतात . त्यामुळे हृदयाची आकुंचन व प्रसरण पावण्याची क्रिया बिघडत जाते व शेवटी त्या रुग्णाला Congestive Heart Failure होते व त्याच्या वाईट परिणामांतून Immunoglobulin चे प्रमाण कमी होते . Rheumatic प्रक्रियेमध्ये वारंवार ताप येणे , सांध्यांना सूज येणे , भुकेचे प्रमाण कमी होणे , वजन कमी होणे हे प्रकार घडतात व त्याचा परिणाम व्याधिक्षमतेवर होतो . हृदयाच्या झडपांवर जंतू बसतात , त्याला सूज आणतात . या प्रकाराला Subacute Bacterial Endocarditis असे संबोधतात . त्याचाही वाईट परिणाम व्याधिक्षमतेवर होतो अशा बऱ्याच प्रकारच्या वाईट परिणामांमुळे रुग्णाची कार्यक्षमता कमी होते , वजन कमी होते व त्याची प्रतिकारशक्ती आणि व्याधीविरोधी बल सारख्याच प्रमाणात कमी होते .
जसजसा हृदयविकार बळावतो , बराच काळ रहातो तसतशी रोग्याची प्रतिकारशक्ती हीन होत जाते . वरील मजकुरात बलहीन होण्याची कारणमीमांसा केलेली आहे . चिकित्सेदरम्यान व नंतरसुद्धा आजाराने ग्रासलेले रुग्ण सुधारत नाहीत व त्यांचे व्याधीविरोधी बल कमीच रहाते . हे बल व व्याधीविरोधी शक्ती प्राप्त करण्यासाठी हृदयविकाराचे अचूक निदान होणे अतिशय महत्त्वाचे आहे . जितक्या लवकर अचूक निदान होईल व त्याची योग्य ती कारणमीमांसा होऊन , योग्य ते उपचार चालू होतील त्या प्रमाणात रुग्ण लवकर बरा होऊ शकतो . त्याची Immunity ( व्याधिक्षमत्व ) पूर्ववत होण्यास मदत होते . हृदयविकाराचे निदान लवकर होणे अतिशय महत्त्वाचे आहे . कारण निरनिराळ्या प्रकारच्या हृदयरोगांमध्ये उपचार पद्धती वेगवेगळी असते . निदान जर योग्य झाले नाही , तर उपचार पद्धती चुकीची होऊ शकते . त्यातून वेगळीच गुंतागुंत होते व नवीन नवीन Complications होतात . असे झाले तर त्याचा वाईट परिणाम शरीरावर होतो . व्याधिक्षमत्व ( Immunity ) जास्त प्रमाणात कमी होते व रुग्णाला दुसऱ्याच प्रकारचे आजार उद्भवतात जसे की न्यूमोनिया , क्षयरोग , पोटांचे आजार , यकृतांचे आजार इत्यादी .
त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे , ती म्हणजे हृदयविकार तज्ज्ञांकडून योग्य निदान लवकरात लवकर करून घ्यावे व त्यांच्याकडे नियमित Follow up करावा . केव्हाही प्राथमिक स्तरावर हृदयविकाराचे उपचार करणे सोपे असते . परंतु जेवढा उशीर होईल तेवढ्या प्रमाणात आजाराची गुंतागुंत वाढते . दुसरे विकार ( Complications ) निर्माण होतात . अशावेळी त्यांचे उपचार करणे जास्त जिकिरीचे होते व रुग्णांना उपचाराचा फायदा जसा पाहिजे तसा मिळत नाही . बऱ्याच वेळा वाईट गोष्टी घडतात व त्या रुग्णांच्या प्राणावर बेततात . बऱ्याचवेळा रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येते . उपचारांचा खर्चही वाढत जातो .
आजारापासून संरक्षण
वरील लेखनातून वाचकांना कल्पना आलीच असेल की , योग्य निदान लवकरात लवकर होणे किती महत्त्वाचे आहे . त्यांचे उपचार सुद्धा लवकरात लवकर सुरू होणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे .
इंग्रजीत म्हण आहे की , ‘ Prevention is better than Cure . ‘ म्हणूनच अशा हृदयविकारापासून संरक्षण मिळणे हे खूपच महत्त्वाचे आहे . त्यासाठी खालील उपाययोजना करणे महत्वाचे आहे .
१ ) योग्य व क्षमतेप्रमाणे रोज ३० ते ६० मिनिटे व्यायाम करावा . ३ ते ४ किलोमीटर चालणे . योगासन करणे , प्राणायाम करणे , पीटीचे व्यायाम करणे , सायकलींग , आयसोमेट्रीक Contractions ( स्नायूंचे आकुंचन ) , पोहोणे हे व्यायाम उत्तम . परंतु आपल्या क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम करणे हे धोकादायक होऊ शकते .
२ ) योग्य तो व शरीराला पोषक असा आहार करावा . ह्याबाबतीत डॉक्टरांची मदत घेणे योग्य ठरेल . आहार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा . प्रामुख्याने आहारात मिठाचे प्रमाण कमी असावे , तेलकट तूपकट पदार्थ टाळावेत . रोजच्या आहारांत लोणची , चटण्या , पापड ह्यांचा समावेश नसावा . साखरेचे प्रमाण कमी ठेवणे उत्तम . गोड पदार्थ शक्यतो टाळावेत . आहाराचे प्रमाण योग्य तेवढेच असावे . एखादा पदार्थ आवडल्यास , त्याचे अतिसेवन टाळावे . आहाराच्या वेळा ठराविक असाव्यात . रात्रीचा आहार कमी घ्यावा . जेवणानंतर लगेचच झोपू नये . दोन ते अडीच तासांचे अंतर असावे . हृदयविकाराव्यतिरिक्त दुसरे आजार असल्यास , उदाहरणार्थ मधुमेह , उच्च रक्तदाब , संधिवात , गाऊट इत्यादि त्यांचीसुद्धा योग्य ती औषधे घ्यावीत . त्याप्रमाणे आहारात योग्य ते फेरफार करणे महत्त्वाचे असते . ह्या सर्व गोष्टी वैद्यकीय सल्ल्यानेच कराव्यात .
३ ) धुम्रपान , तंबाखू सेवन , दारूसेवन अशा प्रकारची व्यसने असता कामा नयेत . त्यांचा पूर्णपणे त्याग करावा .
४ ) वजन जर जास्तच असेल , B. M.I. जास्त असेल , तर वैद्यकीय सल्ल्यानुसार ते कमी करण्याचे उपाय करावेत . उंची व वजन हे योग्य असले पाहिजे . ह्यासाठी सुद्धा योग्य आहार व व्यायाम करणे इष्टप्राप्त आहे .
५ ) रक्तामध्ये चरबीचे प्रमाण जास्त असल्यास , ते कमी करण्याचे प्रयत्न करावेत . ह्यासाठी सुद्धा व्यायाम , योग्य आहार , वजन कमी करणे हे सर्व जरुरीचे असते . वैद्यकीय सल्ला जरुरीचा असतो . जरूर लागल्यास चरबी कमी करण्याची औषधे वैद्यकीय सल्ल्याने घ्यावीत .
६ ) मनःशांती खूपच महत्वाची आहे . रोज साधारणत : सात तास तरी झोप घ्यावी . मनःशांती व योग्य झोप नसेल तर व्याधिक्षमत्व नक्कीच कमी होते . चांगली Immunity असण्यासाठी ह्या बाबी जरुरीच्या आहेत .
७ ) जीवनपद्धतींत सुधारणा . ( Life style Management ) आजच्या जीवनपद्धती प्रमाणे बहुतेक मोठमोठ्या शहरांमध्ये धावपळ वाढली आहे . प्रवासाचा वेळ वाढला आहे , गर्दी व गोंगाट वाढला आहे . स्पर्धा , आशा – अपेक्षा ह्यांचे प्रमाण खूपच जास्त आहे . त्यातूनच मानसिक अशांती निर्माण होते . कामाचे प्रमाण खूपच जास्त आहे . वेळेचे व कामाचे समीकरण जमत नाही . इच्छापूर्ती न झाल्यामुळे मानसिकता बिघडली आहे . उदासीनता वाढली आहे . ह्याच्यामुळे सुद्धा हृदयरोग उद्भवतात . हे टाळण्यासाठी साधारणत : दर १ ते २ तास काम केल्यानंतर कामाच्या ठिकाणी शारीरिक व मानसिक शिथिलीकरण करणे जरुरीचे आहे . बरेच जण संगणकावर काम करतात . त्यांनी मधून मधून थोडे उठावे , २ – ३ फेऱ्या माराव्यात . मान शिथिल करावी . बसल्या जागी मानेचे व्यायाम करावेत . खांद्यांचे व्यायाम करावेत , डोळ्यावर पाणी मारावे , डोळे बंद करून ५ मिनिटे मानसिक शिथिलीकरण करावे . ह्या सर्व गोष्टी केल्यामुळे आपल्यावरील ताण कमी होतो . शारीरिक व मानसिक ऊर्जा मिळते व कामाचा उत्साह वाढतो .
आठवड्यातून एकदा दोनदा मानसिक ताण कमी करण्यासाठी मित्रांना भेटणे , गप्पा व हास्यविनोद करणे , निरनिराळ्या प्रकारचे खेळ खेळणे , आवडती गाणी ऐकणे , फिरायला जाणे , वाद्यांची आवड असल्यास त्यांचा सराव करणे , बागेत काम करणे , आवडत्या कलांमध्ये रमणे ह्या सर्व बाबींचा उपयोग मानसिक व शारीरिक शिथिलीकरणामध्ये अतिशय चांगला होतो . ताण – तणावामुळे निर्माण होणारे शरीरातील स्राव Adrenaline व Noradrenaline ह्यांचे प्रमाण कमी होते व त्यापासून हृदयाची गती रक्तदाब , शर्करेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते . शारीरिक जडपणा व डोकेदुखी सुद्धा कमी जाणवते.
हृदय रोग असणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे व्याधिक्षमत्व वाढविण्यासाठी खालील उपाय करावेत . त्याचा उपयोग त्याच्या दैनंदिन जीवनात खूपच होतो . त्यातील बऱ्याच बाबींचा उल्लेख या लेखात आधीच केला आहे .
१ ) योग्य आहार : – आहार तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे आहार घ्यावा . व्याधिक्षमत्व वाढविण्यासाठी प्रथिने ( Proteins ) आहारात जास्त असावीत . दूध , डाळी , मूग – मटकी , कडधान्ये , भाज्या , सलाड्स् , सूप , फळं , अंड्याचा पांढरा भाग , मासे , चिकन यांचा समावेश आहारांत असावा . पिष्टमय व चरबी असलेल्या पदार्थांचे सेवन कमी करावे . तूप तेलाचे प्रमाण कमी असावे .
२ ) व्यायाम : क्षमतेप्रमाणे रोज ३० ते ६० मिनिटे व्यायाम करावेत . निरनिराळ्या प्रकारच्या व्यायामांचा उल्लेख लेखांत आधीच केला आहे . साधारणतः आठवड्यातून ५ दिवस तरी व्यायाम करणे गरजेचे आहे . हल्ली जिममध्ये व्यायामाचे बरेच प्रकार करण्यासाठी योग्य ती साधन – सामग्री असते . कार्डीयोसारखे व्यायाम हृदयरोग असणाऱ्यांना खूपच उपयोगी असतात . त्यांचा अपाय हृदयाला होत नाही . उलट हृदयाच्या व इतर अवयवांच्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात , त्यातून रक्तप्रवाह सुधारतो व शरीराला प्राणवायूचा पुरवठा उत्तमरीतीने होतो . हृदयशूलाचे प्रमाण कमी होते.रक्तदाब व मधुमेह ह्यांच्यावर उत्तम नियंत्रण रहाते , शारीरिक ऊर्जा वाढते . मानसिक प्रसन्नता जाणवते .
प्राणायाम , योगासने , ध्यानसाधना , शवासन , ओंकार साधना हे नियमित केल्याने मानसिक व शारीरिक शिथिलीकरणास योग्य ती मदत होते . मन : शांती प्राप्त होते . शारीरिक सुदृढता वाढते . वयोमान वाढते .
३ ) व्यसन : – हे अतिशय घातक असते . सिगरेट , तंबाखू सेवन , धूम्रपान , दारू या सर्व बाबी शरीराला घातक असतात हे सर्वश्रुत आहे . आजकाल आपण सर्व वर्तमानपत्रांतून व टीव्हीवर अमली पदार्थाविषयी भरपूर वाचतो , ऐकतो . चित्रसृष्टीतील बरीचशी उदाहरणे आपल्या नजरेसमोर आहेतच . चरस , गांजा , अफू , एल् . एस् . डी . व इतर नवनवीन अमली पदार्थ यांचा उपयोग व सेवन खूपच वाढले आहे . याचे प्रमुख कारण म्हणजे मानसिक अशांती . या सर्व बाबी शारीरिक व मानसिक संतुलन बिघडवितात व त्यातूनच हृदयरोग उद्भवतात . व्याधिक्षमत्व खूपच कमी होते . म्हणूनच ह्या सर्व बाबींपासून दूर रहाणे योग्य . मित्रपरिवार योग्य असल्यास ह्या बाबींची जरुर भासत नाही .
इतर बाबींचा विचार या लेखात आधीच केला आहे . त्या सर्व काटेकोरपणे पाळल्यास व्याधिक्षमत्व वाढविण्यास मदत होते . आपला बचाव बऱ्याचशा व्याधींपासून होऊ शकतो .आयुष्य निरामय व सुदृढ रहाते . यातून हृदय स्वास्थ्य मिळते . जीवनाचा आनंद घेता येतो . शरीरस्वास्थ्य चांगले तर जीवन आनंदमय , परिपूर्ण होते . जीवन सार्थकी लागते .
तुमचे सर्वांचे जीवन आनंदी व स्वास्थ्यपूर्ण राहो ही प्रार्थना .
डॉ . अनिल तांबे
तांबे हार्ट अँड मेडिकल हॉस्पिटल ,
नौपाडा , ठाणे ( प ) .
०२२२५३८१६६५ , ९ ८२०५४८०४१
Leave a Reply