एस. वेंकटरामन हे नव्वद वर्षांचे गृहस्थ खरे रेल्वेप्रेमी. १९२५ साली वयाच्या आठव्या वर्षी मद्रात ते विजयवाडा असा पहिला रेल्वेप्रवास त्यांनी केला. तेव्हापासून त्यांचं आयुष्य रेल्वेशी जोडलं गेलं आहे. रेल्वेत मटिरियल मॅनेजर म्हणून हुबळी, वाराणसी, अशा विविध गावांत त्यांनी काम केलं.
रेल्वेमधून निवृत्त झाल्यावर ‘Indian Railways at a glance’ हे त्यांचं पहिलं पुस्तक प्रसिद्ध झालं. गेली ३० वर्षे ते भारतीय रेल्वेची माहिती गोळा करत होते. ती मिळवण्यासाठी त्यांनी २ वर्षे ३५० विविध प्रवासी गाड्यांमधून भारतभर प्रवास केला आणि माहितीचा अनमोल खजिना गोळा केला. त्यांतून साकारलं आहे त्यांचं नवीन पुस्तक. त्याचं नाव आहे, ‘Indian Railways the beginning upto 1900 – Encyclopaedia of Indian Railways – Coffee Table Book हा ग्रंथ ५०० पानांचा असून त्यांत २७ प्रकरणे आहेत. सोबत ६०० अतिशय दुर्मीळ फोटो आहेत. हा ग्रंथ लिहिण्यात त्यांची सुविद्य पत्नी ललिता यांनी मोलाची मदत केली होती, पण ग्रंथ प्रसिद्ध होण्याआधीच ललिता यांचे निधन झाले. हा ग्रंथ निव्वळ रेल्वे माहितीच्या व्यासंगाच्या प्रेमापोटी लिहिलेला आहे. पुस्तकाला प्रस्तावना भारतीय रेल्वेचे गाढे अभ्यासक कॅनेडियन प्रोफेसर डॉ. आयन कार यांनी लिहिली आहे. वेंकटरामन लिहितात, ‘ही प्रस्तावना माझ्या दृष्टीने लक्षावधी डॉलर्सच्या मोलाची आहे.’ वेंकटरामन यांचे भाग्य असे, की डॉ. कार यांच्याशी मुंबईत त्यांची भेट झाली. त्यांच्या जीवनाकडे पाहताना रेल्वेबाबतची एक म्हण आठवते, Once a railway man always a railway-man.
आजही संगणकासमोर बसून ते रेल्वे इतिहासाचा अभ्यास व लिखाण करीत असतात. त्यांचा उत्साह दांडगा आहे. अशा निर्मितीमधून त्यांना मिळणारा’ आनंद वर्णनातीत आहे. त्यामधून तिसरे पुस्तक तयार होत आहे. ‘Madras State Railway.’
-– डॉ. अविनाश वैद्य
I read this post completely about the resemblance of latest and previous technologies, it’s remarkable article.