नवीन लेखन...

खांदा

एक नामांकित अभिनेत्री; पण काही वर्षांपूर्वीची. एकेकाळी आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनाचा ठाव घेणारी. खरं तर अभिनयाची संधी तिला फार उशिरा मिळाल्यामुळे त्या वयानुसार भूमिका वाट्याला यायच्या, पण त्या सगळ्या तिने अजरामर केल्या. आता मात्र सगळंच चित्र बदललं होतं. एव्हाना लोकांना तिचा विसरच पडला होता. नव्याच्या झगमगाटापुढे जुनं झाकोळलं गेलं. मानमरातब, प्रसिद्धी, पैसा सगळं गेलं अन् शिवाय भरीला वार्धक्य आलं. दोन खोल्यांच्या छोट्याश्या घरात एकटीच राहायची. घरकाम, स्वयंपाकाला एक बाई यायच्या तेवढंच काय ते. बाकी दिवस ढकलणं सुरू होतं फक्त.

ही परिस्थिती का आली ? परिवार कुठे होता ? की नाहीच आहे ? इतर नातेवाईक ? या अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्यात काहीच अर्थ नव्हता कारण त्याने वास्तव बदलणार नव्हतं.

मध्येच कधीतरी कुठल्यातरी संस्थेला जाग यायची. मग कुणी आर्थिक मदत देताना स्वतःचे फोटो-व्हिडिओ काढून जायचे. कधी एखाद्या वर्तमानपत्र किंवा वृत्तवाहिनीला साक्षात्कार व्हायचा. तेव्हा बातमी छापून यायची किंवा स्टोरी वगैरे व्हायची. त्यानंतर थोडे दिवस तो सगळा ओघ सुरू राहायचा मग पुन्हा येरे माझ्या मागल्या. तीss , तिचं दोन खोल्यांचं घर, जुन्या रम्य आठवणी आणि न संपणारा एकटेपणा ss.

तिचा पूर्वीचा एक चाहता होता. साधारण तिच्या मुलाच्या वयाचा, मध्यमवयीन. तो नुकताच परदेशातून निवृत्त होऊन बऱ्याच वर्षांनी त्याच शहरात आला होता. एकदा इस्त्रीच्या कपड्यासोबत आलेल्या रद्दीच्या कागदावर तिचा फोटो दिसला. तिच्याबद्दलची एक जुनीपानी बातमी होती ती. कुतुहलापोटी भराभर वाचून काढली. त्यातल्या पत्त्याचा शोध घेत दुसऱ्यादिवशी हा तिच्या घरी पोचला. त्या अभिनेत्री काठी घेत कशाबशा थरथरत्या हाताने दार उघडायला आल्या. त्यांची बिकट अवस्था बघून त्याला खूप वाईट वाटलं. त्याने आपलं नाव वगैरे सांगितलं. जुना फॅन असल्याचं सांगितलं. तो आत जाऊन बसला, विचारपूस वगैरे केली अन् मग गप्पाच सुरू झाल्या.

“ तुम्हाला सांगतो ss , पूर्वी दर शनिवारी-रविवारी मराठी सिनेमे लागायचे दूरदर्शनवर !! आम्ही सगळे अगदी सहपरिवार बघायला बसायचो. मी लहान होतो बऱ्यापैकी पण तेव्हापासूनच मला तुमचा अभिनय खूप आवडायचा. कधी मला तुमच्यात माझी आई दिसायची, तर कधी भास व्हायचा तो लाड करणाऱ्या माझ्या आजीचा !!”.

“ अरे वा !! आठवतंय तुम्हाला अजून सगळं ?”

“ म्हणजे काय ? अहो तुमच्या चेहऱ्यावरची सात्विकता , तुमच्या चित्रपटातल्या प्रसंगातली तुमची कुटुंबवत्सलता घरोघरी असावी असं वाटायचं आम्हा प्रेक्षकांना ! .. आणि हो ss .. तुमच्या सगळ्या भूमिकांना छेद देणारी तुम्ही रंगवलेली खलनायिका सुद्धा अप्रतिम होती बरं का sss !! “.

अशा अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळत होता. काही तासातच अगदी जुनी ओळख असल्यासारखं वाटू लागलं दोघांनाही. इतकं की निघता निघता त्याने आपुलकीने चहासुद्धा करून दिला आणि त्यांनीही तो निःसंकोचपणे प्यायला.

आता तो रोजच दुपारी येऊ लागला. कधी एखादा आवडीचा पदार्थ आणायचा , कधी जेवणाचा डबा. कधी त्यांच्या सुवर्णकाळाचं स्मरण रंजन, थोड्या आत्ताच्या गप्पा, त्यांची सेवा, उठा-बसायला, औषध घ्यायला मदत असं सगळं सुरू असायचं आणि शेवटी संध्याकाळी त्याच्या हातचा चहा हा तर नित्यक्रमच झाला होता. १२-१५ दिवस हे सगळं सुरू होतं. त्यादिवशी तो निघता निघता म्हणाला ..

“ तुम्ही आमच्याकडे येता का राहायला ?” ..

“ नको रे नको बाळा !!”

“ अहो s . संकोचल्यासारखं वाटत असेल तर निदान थोड्या दिवसांसाठी या !! “

“ तसं नाही रे ss , पण माझं सगळं आता इथेच काय तेss . ये बस इथे असा माझ्याजवळ. त्या एकदम गहिवरून बोलत होत्या.

“ माझी ही अशी अवस्था झाल्यापासून बरेच जण धूमकेतूसारखे येऊन गेले पण तू इतरांसारखा नाहीस हे मात्र खरं.. याचाच खूप आनंद वाटला मला !!”

“ म्हणजे ?? “

“ अरे तू इतके वेळा आलास, खूप काही केलंस, बरंच काही दिलंस पण एकदाही फोटो काढला नाहीस की केलेल्याचा कधी टेंभा मिरवला नाहीस. चारचौघांना उगीच त्या सेलफ्या का काय ते पाठव , मित्रमंडळींना बोलाव ,पैशांची थैली दे असलं काही तू केलं नाहीस. मला आर्थिक मदतीची गरज नाही किंवा लोकांचं प्रेम मला नकोय असं अजिबात नाही ; पण त्याचा नुसता दिखावा नको वाटतो रे ss . त्यापेक्षा या गोष्टी नसलेल्याच बऱ्या असं वाटतं. गेल्या काही दिवसांत तू इतकं केलंस माझ्यासाठी पण त्याचा जराही दिखावा नाही केलास. जे केलंस ते अगदी मनापासून. अजून काय हवंय रे या म्हातारीला ? “

असं म्हणून त्यांनी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि काहीही न बोलता पुढची काही मिनिटं नुसत्या रडल्या. मन मोकळं होईपर्यंत अश्रु ढाळले. अगदी त्याच्या शर्टाची बाही ओलीचिंब होईपर्यंत.

त्या शांत झाल्यावर तो म्हणाला ..

“ चला आता निघतो मी. काळजी घ्या !. उद्या जरा उशिराने येईन. दुपारी थोडं काम आहे ते संपवून संध्याकाळीच येईन एकदम !!” .

त्यानंतर त्या जे काही म्हणाल्या ते ऐकून त्याचं मन एकदम खिन्न आणि सुन्न झालं. त्याच मनस्थितीत तो घरी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा सहज टीव्ही लावला तर “गतकाळातल्या प्रसिद्ध अभिनेत्रीचे दुःखद निधन“ या मथळ्याखाली बातमी दाखवत होते. तो चपापला. त्याने वेगवेगळ्या वाहिन्यांवर बघून खातरजमा केली. पण दुर्दैवाने तीच होती ती अभिनेत्री. या धक्कादायक बातमीची खात्री पटताच त्यांच्या घरी जाण्यासाठी म्हणून तो ताबडतोब निघाला. इतक्यात टीव्हीवर त्यांचं पार्थिव घेऊन जाणारी, त्यांना “खांदा देणारी” काही माणसं दिसली आणि त्याला आधल्या दिवशी निघता निघता झालेला संवाद आठवला. जे ऐकून तो काल व्यथित झाला होता ते शब्दन् शब्द कानात घुमू लागले.

“ तुझ्या सवडीने ये रे सावकाश. पण खरं सांगते ss , आत्ता तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून लहान मुलीसारखी रडले आणि एकदम मोकळं वाटतंय बघ. अरे sss मरणानंतर खांदा द्यायला बरेच जण येतात. अगदी बेवारस प्रेतांना सुद्धा कुणाचा ना कुणाचा खांदा मिळतो. या युगात कदाचित भाड्याने सुद्धा मरणोत्तर खांदा मिळेल एकवेळ पण “जिवंतपणी हक्कानी डोकं ठेवून रडायला खांदा मिळणं, आपलेपणाने सुखदुःख वाटायला खांदा मिळणं” जास्त गरजेचं आहे रे ss . तसा खांदा देणारेच आता दुर्मिळ झालेत. पण तो खांदा मला आज मिळाला. तू दिलास बाळा तो. असा खांदा मिळेपर्यंत हा प्राण या देहाला सोडून जायचा थांबला होता बहुतेक. आता डोळे मिटायला मोकळे झाले बघ मी !! “

हे सगळं आठवून तो स्तब्ध झाला. आता तिथे जाण्यात, “खांदा देण्यात” काहीच अर्थ नव्हता याची जाणीव झाली. ज्या खांद्यावर डोकं ठेवत त्या माऊलीने अनेक वर्ष मनात साचलेल्या सगळ्या दुःखाला वाट करून दिली होती त्या आपल्या स्वतःच्याच खांद्यावर त्याने अलगद हात ठेवला आणि पाणावलेल्या डोळ्यांनी एकटक बघत बसला मृत्यूपश्चात नाही तर हयात असताना दिलेला “ खांदा “.

©️ क्षितिज दाते , ठाणे

आवडल्यास text शेअर/फॉरवर्ड करायला माझी काहीच हरकत नाही …

Avatar
About क्षितिज दाते , ठाणे 79 Articles
केवळ एक हौस म्हणून लिखाण सुरू केलं . वेगवेगळ्या विषयांवर पण साध्या सोप्या भाषेत लेखन . आकाशवाणीवरील कार्यक्रमात काही लेखांचं प्रसारण झालं आहे .काही लेख/कथा पॉडकास्ट स्वरूपात देखील प्रसारित झाल्या आहेत . Snovel या वेबसाईट / App वर "सहज सुचलं म्हणून" या शीर्षकाखाली तुम्ही ते पॉडकास्ट ऐकू शकता.

1 Comment on खांदा

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..