नवीन लेखन...

खरा तो एकची ‘धर्म’…

भारतात टीव्ही सुरु झाला तेव्हापासून आजपर्यंत कमर्शियल जाहिरातींमधील दोन जाहिराती अविस्मरणीय ठरल्या. एक होती निरमा वाॅशिंग पावडरची व दुसरी एमडीएच मसालेची! या मसाल्याच्या जाहिरातीत जो फेटेवाला हसणारा वृद्ध दिसायचा, तो पहिल्यांदा माॅडेलिंग करणारा असेल असं वाटायचं. मात्र पाच दशकं झाली तरी उतारवयातही जाहिरातीत तोच दिसल्यावर खात्री झाली की, हाच ‘एमडीएच’ मसाल्याच्या कंपनीचा मालक आहे!

खरंच, वयाच्या ९८ व्या वर्षीदेखील एवढ्या उत्साहाने आपल्याच कंपनीच्या जाहिरातीत काम करणाऱ्या धर्मपाल गुलाटींचे कौतुक करायलाच पाहिजे. त्यांचा जन्म झाला सियालकोट येथे २७ मार्च १९२३ साली. त्यांनी चौथ्या इयत्तेनंतर शाळा सोडली व वडिलांना मसाले बनविण्याच्या कामात ते मदत करु लागले. फाळणीनंतर २७ सप्टेंबर १९४७ रोजी ते भारतात आले आणि दिल्लीला स्थायिक झाले.

फाळणीच्या मनावरील जखमा अद्याप भरल्या नव्हत्या. घरदार सोडून नवीन प्रांतात आलेल्या धर्मपालच्या ओळखीपाळखीचं कुणीही नव्हतं. नोकरीला उपयोगी पडेल असं शिक्षणही नव्हतं. खिशात भांडवल होते फक्त १५०० रुपये. ६५० रुपयांत एक टांगा खरेदी केला व तो चालवून उदरनिर्वाहाचा प्रश्र्न सोडवला. त्यातील कमाईतून एक लाकडी खोके उभं करुन मसाल्याचं दुकान टाकलं. त्या दुकानाचं नाव ठेवलं, ‘महाशय दि हट्टी’ म्हणजेच इंग्रजी अद्याक्षराचे ‘एम डी एच’!

धर्मपाल गुलाटींचं ब्रीदवाक्य एकच होतं, ‘नाम कमाना है, बडा बनना है’. सलग ७३ वर्षे अपार मेहनत घेऊन त्यांनी ते साध्य करुन दाखवलं! आज त्यांचे भारतासह दुबईतही एकूण १८ मसाल्याचे कारखाने आहेत. संपूर्ण जगभरातील शंभर देशात त्यांच्या मसाल्यांची निर्यात होते.

मेहनत, चिकाटीच्या जोरावर व्यवसायात उत्तुंग यश मिळविले. दोन मुलं व सहा मुलींचा परिवार सांभाळत मसाल्याचा व्यवसाय चालवला. आज मुलं-मुली, जावई-सुना, नातवंडांचे गोकुळ नांदतं आहे.

कोरोनाचा संसर्ग झाल्याने धर्मपाल गुलाटींचे दुःखद निधन झाले. धर्मपाल आज या जगात नसले तरी, त्यांनी जीवनात संघर्ष करुन जे अमाप यश मिळविले आहे, ते नक्कीच सर्व व्यवसायिकांना प्रेरणादायी आहे. यापुढे कधीही मसाल्याचा विषय निघाला की, दोन्ही हातांनी जाहिरातीतून आशीर्वाद देणारे धर्मपाल गुलाटींची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही….

खरा तो एकची ‘धर्म’
जगाला सुग्रास भोजन देई…

– सुरेश नावडकर ४-१२-२०
मोबाईल ९७३००३४२८४
या रचनेचे सर्वाधिकार रचयिता © सुरेश नावडकर यांच्याकडेच आहेत.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..