सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या जोडगोळीने दिलेल्या असंख्य समृद्ध जाणिवांचा ऋणी असणे एवढेच आपल्या हाती आहे. “दिठी ” या निःशब्द करणाऱ्या अनुभवाच्या वेळी सुमित्रा ताईंचे दुःखद निधन झाले आणि मी त्यांचे सगळे चित्रपट शोधू लागलो आणि राहून गेला तो एकच – “नितळ”(Transparent)! तो काल रात्री अचानक तू नळीवर सापडला आणि मी तो बघत बसलो.
दोन तास दहा मिनिटे संगणकाच्या पडद्यापासून हलू न देणारा हा नितांतसुंदर चित्रपट बघून मी भारावलो. अवघ्या पाच महिन्यांपूर्वी हा २००७ चा चित्रपट तू-नळीवर आला. ठळक कोडाचे अंश (डाग, पट्टे ) चेहेऱ्यावर बिनदिक्कत मिरवणारी आणि ते स्वीकारलेली डॉ देविका येते तिच्या रानडे नामक डॉ मित्राच्या घरी आणि तिला आपली “भावी” मानताना सगळ्यांची ओढाताण एवढा हा एक दिवसाचा चित्रपट (तरुण पिढी अपवाद, त्यांना तिच्या कोडासकट तिला स्वीकारायला काही अडचण नसते, आणि अर्थातच वृद्ध मंडळी, ज्यांच्या डोळ्यांमध्ये जगाचे असे अनेक अनुभव असतात)!
चार पातळ्यांवर याठिकाणी मी संक्षिप्त लिहितोय, अन्यथा पोस्टची लांबी हाताबाहेर(बोटाबाहेर) जाईल.
(१) अभिनेत्यांची आकाशगंगा- चक्क विजय तेंडुलकर, झालेच तर विक्रम गोखले, रीमा लागू, उत्तरा बावकर, नीना कुळकर्णी, रवींद्र मंकणी, ज्योती आणि अमृता या मायलेकी, दीपा श्रीराम, क्षणभर अनिल अवचट आणि अबोव्ह ऑल – देविका दफ्तरदार आणि किशोर कदम ! त्यांचे लाडके डॉ मोहन आगाशे का नव्हते,याचे आश्चर्य वाटले. कदाचित ते उशिरा सुमित्रा ताईंच्या जत्थ्यात सामील झाले असावेत.
डॉ माया तुळपुळे या पुण्यातील नामवंत वैद्यकीय व्यक्तीने ” कोड” या वैगुण्यावर(?) केलेल्या कामाची पार्श्वभूमी या चित्रपटाची कर्मभूमी आहे.
(२) प्रभावी संवाद- प्रत्येक प्रमुख पात्राच्या तोंडी “आयुष्याचा तळ” ढवळून टाकणारे संवाद आहेत. काही वानगी दाखल-
(अ )(नात्यांमध्ये, विशेषतः पती-पत्नीमध्ये) मास्क्स आर नेसेसरी, इफ यू वॉन्ट टू लीड ऍन हॉनरेबल लाईफ (उत्तरा)
(ब ) सामाजिक प्रतिष्ठेमध्ये तुम्हाला तुमची आत्मप्रतिष्ठा मिळतेच असे नाही. बाहेर लोकांशी ग्रेसफुली वागता-बोलता येतं, पण मग स्वतःचा चेहेरा बघणं, स्वतःशी बोलणं बंद होऊन जातं. लढाई रणांगणातील असो वा रोजच्या जगण्यातील, परिस्थितीकडे कधी पाठ दाखवू नये. अन्यथा तुम्ही स्वतःच्या नजरेच्या तुरुंगात अडकता. स्वतःच शत्रू, आणि स्वतःच युद्धकैदी ! (विक्रम)
वरील दोन्ही उदगार एका जोडप्याचे आहेत- लग्नाबद्दल ! आता दुसरे जोडपे-
(क) ” आपली बायको सुखी आहे की नाही, हा प्रश्न कधी पडतच नाही कां हो तुम्हांला” या नीना कुळकर्णीच्या प्रश्नाला उत्तर देताना रवींद्र म्हणतो- “तू दुःखी कशाला असशील? पैसा -अडका आहे, नवरा चांगला आहे, तसा सासुरवास नाहीए.” त्यांवर नीना विचारते- ” याचा अर्थ हे आहे,म्हणजे सगळं आहे.”
(ड)महामुनी जनकाने म्हटलंच आहे- अंतःचक्षू उघडा, मग सगळं नंदनवन ! सौंदर्य हे बघणाऱ्याच्या दृष्टीत असतं, फक्त आतून निश्चय व्हायला हवा.(तेंडुलकर)
(इ) भारतातून अस्पृश्यतेचं निवारण झालं असं आपण मानतो, पण ती अजून किती क्षेत्रात टिकून आहे. नव्या अनपेक्षित अनुभवांनी माणसांना गडबडायला होतं. माणुसकी आणि जीवनशैली यांचा मेळ जमत नसेल तर हा धक्का बसतो. मुख्य म्हणजे स्वतःचे मन उमजायला पाहिजे. पावलापावलागणिक एक निर्णय घेतला जात असतो, त्याची जबाबदारी टाळता येत नाही.(पुन्हा तेंडुलकर)
(ई) नियती आणि इच्छाशक्ती यांचा प्रवास जोडीने चालत असतो. पण धर्मराजाला श्रीकृष्णाने जे सांगितले ते असे- सत्य दर्शनातून निर्माण झालेली इच्छाशक्ती केव्हाही नियतीपेक्षा श्रेष्ठ असते. (पुन्हा पुन्हा तेंडुलकर)
(फ) जिथे आरसे माणसांचे सौंदर्य ठरवीत नाहीत, असं वेगळं, जाणतं जग निर्माण करायला हवं. कातडीपलीकडे ओळख असणाऱ्यांनी या जगाला तुम्ही तरी आम्हांला आपलंस करा, असं कां म्हणायचं? आपल्या आत्मसन्मानातून आपण आपला आनंद का नाही निर्माण करायचा? (सौमित्र उर्फ किशोर कदम)
(३) गीते- तीन अप्रतिम गीते या चित्रपटात आहेत, त्यापैकी एक हे अर्थपूर्ण-
उनवेड्या पावसात न्हाणं , चिंब भिजलं माझं गाणं
बेभान, बेभान, बेभान माझं गाणं
पंख फुटती गाण्याला, पंखावरती रंग
रंगले रंगात रंग, जसा दंग, दंग, दंग होई मृदंग
मृदंग दंग, दंग्याचं हे गाणं
मातीचा येतो वास, तो वास म्हणजे गाणं
मृदगंध, गंध गंधाराचं गाणं
कधी गडद गडदशा अंधाराचं गाणं
कधी पेटून उठल्या अंगाराचं गाणं
कधी खोल, खोल, खोल घेऊन जातं गाणं
कधी बोल, बोल, बोल म्हणतं गाणं
खिडकी खोल, खोल, खोल म्हणतं गाणं
उघड्या खिडकीमधून येतं, हलक्या हलक्या पिसासारखं गाणं
कधी येतं गिरक्या घेऊन, कधी येतं फिरक्या घेऊन
कधी बनून जाई विराणी, कधी सांगे एक कहाणी
कधी हिरमुसतं, कधी मुसमुसतं
बेबंद फुटले आसू म्हणती गाणं
कधी स्पेशल स्पेशलशा, दिवसांचं गाणं
कधी स्पेशल स्पेशल, दोस्तासाठी गाणं
जनात दिसतं , मनात असतं , तनात रुजतं गाणं
रानात घुमतं, कानात रुंजी घालत, राही गाणं
गाणं तुझं, गाणं माझं , गाणं तुझं माझं गाणं
तुझ्या गिटारच्या या कॉर्डस म्हणती, गाणं गाणं
माझ्या गळ्यातल्या व्होकल कॉर्डस म्हणती, गाणं गाणं
तारा छेडल्या जातात ना, तेव्हाच होतं गाणं
(४) मी भुसावळला तिसरीत असताना माझ्या डाव्या दंडावर एक पांढुरका, धूसर पॅच उगवला. आईच्या लक्षात आलं ते स्वाभाविकपणे ! तिने वडील आणि आजी यांना धसकावून सांगितलं. गल्लीत/शाळेत/नातेवाईकांमध्ये बभ्रा होऊ नये म्हणून जळगांवचे एक स्कीन स्पेशालिस्ट डॉ चौधरी वडिलांनी शोधून काढले. ही तशी दुर्मिळ जमात ! त्यांनी तपासले, सुई टोचून मला त्याजागी संवेदना होते की नाही, शरीरावर इतर कुठे असं काही नाहीं ना याची जांच-पडताल केली. एक मलम आणि काही गोळ्या लिहून दिल्या. दोन-तीन महिन्याच्या उपचारांनी तो ठिपका गेला आणि शरीरवर्ण परतला. कदाचित एखाद्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे तसा पांढरा स्पॉट उमटला असावा. आजींनी केलेले नवस फेडले आणि आई-वडील सैलावले.
२००७ सालीही हे शरीरावरील डाग (विशेषतः स्त्रीच्या) स्वीकारले जात नाहीत, तोपर्यंत असे चित्रपट काढावेच लागणार, नाही कां ?
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply