भारताच्या संरक्षणासाठी आवश्यक असणारे तंत्रज्ञान भारतातच विकसित करून, आपल्या संरक्षण दलांना उपलब्ध करून देण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य संरक्षण संशोधन आणि विकास संस्था करीत आहे. या संस्थेने विकसित केलेल्या काही आयुधांची आणि तंत्रज्ञानाची झलक आपण पत्रिकेच्या मागील अंकांमध्ये पाहिली आहे. हीच संस्था जीवन विज्ञान क्षेत्रातही मौलिक संशोधन करून, आपल्या जवानांना टोकाच्या विषम आणि प्रतिकूल परिस्थितीशी लढण्याचे बळ देते. याच संशोधनाचा हा थोडक्यात आढावा…
मराठी विज्ञान परिषदेच्या ‘पत्रिका’ या मासिकातील काशिनाथ देवधर यांचा हा पूर्वप्रकाशित लेख
भारताच्या संरक्षणासाठी तीनही सशस्त्र दले म्हणजेच भूसेना, नौसेना व वायुसेना ही अखंडपणे कार्यरत असतात. त्याचप्रमाणे इतर अनेक दलेसुद्धा सीमासुरक्षा तसेच अंतर्गत सुरक्षा प्रदान करतात. सागरी किनारा व हद्द आणि हवाई हद्द यांचेही रक्षण चालूच असते. अशा सर्व सशस्त्र दलांना आवश्यक असणारी भारतीय बनावटीची सर्व प्रकारची अद्ययावत शस्त्रात्रे व उच्च प्रतीचे तंत्रज्ञान विकसित करून डीआरडीओने सशस्त्र सेनांचे हात बळकट केले आहेत. या तंत्रज्ञानाची काही उदाहरणे म्हणजे इनसास रायफल, मशीन गन, तोफा, पिनाक रॉकेट (अग्निबाण), अर्जुन रणगाडा, तेजस विमान असोत का अरिहंत ही परमाणू ऊर्जा चलित पाणबुडी; सर्व प्रकारची अवस्वनी (सबसॉनिक) किंवा स्वनातीत (हायपरसॉनिक) क्षेपणास्त्रे, विविध प्रकारचे बॉम्ब, वरुणास्त्र टॉर्पिडो, हवाई सुरक्षा कवच, संदेश वहन प्रणाली, विशेष पदार्थ, मानवरहित वाहने, आणि सर्वात अलीकडील म्हणजे उपग्रहभेदी क्षेपणास्त्र. शस्त्रे/क्षेपणास्त्रांच्या प्रणालीबरोबरच जिथे जिथे सशस्त्र दलांना गरज आहे, त्या सर्व क्षेत्रांत संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केले आहे.
सशस्त्र दलांना नुसती अद्ययावत शस्त्रास्त्रे, साधनसामुग्री व विविध संयंत्रे देऊन मुख्य उद्देश साध्य होत नाही. कारण, जोपर्यंत या प्रणालीमध्ये जवान हा अविभाज्य घटक आहे आणि युद्धे जर त्याच्या जिवावर जिंकायची असतील, तर या मानवी घटकाचाही बारकाईने विचार व्हायला हवाच. जवानांच्या शारीरिक-मानसिक आरोग्याचा, त्यांच्या खाण्यापिण्याचा व मानसिकतेचा योग्य तो विचार झाला नसेल, तर युद्ध जिंकणे अवघड असते. त्यासाठी जवानांना विशिष्ट प्रकारचे आवश्यकतेनुसार प्रशिक्षणही द्यावे लागते. त्यांची सर्व प्रकारची काळजी घ्यावी लागते. विविध प्रकारच्या वातावरणात किंवा टोकाच्या विषम परिस्थितीत उदा. अतिशीत हवामान (शून्याखाली ४० अंश सेल्सिअसहून कमी) किंवा उष्ण तापमान (जवळपास ५०० सेल्सिअस) तसेच जंगलातील किंवा दलदलीचा प्रदेश; उच्च पर्वतीय रांगा किंवा वाळवंटी भाग अशा अनेकविध युद्धभूमी; अशा परिस्थितीत लढण्यासाठी जीवन आधार प्रणाली व संरक्षण आवश्यक असते. अशा किमान गरजा भागविणारे व मोठ्या हिमतीने शत्रूबरोबर लढण्याची क्षमता देणारे आवश्यक तंत्रज्ञान विकसित करून देण्याची गरज भागवण्यासाठी नऊ मुख्य प्रयोगशाळा/ आस्थापना संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या ‘जीवन विज्ञान’ विभागामध्ये कार्यरत आहेत.
आपल्या सैन्यदलांना हिमालयीन पर्वतरांगांमध्ये देशाचे संरक्षण करताना तिहेरी सामना एकाच वेळी करावा लागतो. प्रत्यक्ष शत्रूशी लढाण्याबरोबरच उच्च पर्वतीय युद्धभूमीवर विरळ हवामान, कडाक्याची थंडी अशा परिस्थितीबरोबरही झगडावे लागते. अशा परिस्थितीमध्ये जवानांना श्वास घेण्यासाठी लागणारा प्राणवायूही पुरेसा नसतो. जवानांचे शारीरिक-मानसिक आरोग्य राखण्यासाठी काही जीवन रक्षक आधार प्रणालीची आवश्यकता असते. तेथे होणारे रोग, त्यावरील उपाययोजना अशा विविध आयामांचा अभ्यास करावा लागतो. तसेच थंडीपासून संरक्षण करणारे पण वजनाला हलके असणारे कपडे; पुरेसा, योग्य, स्वादिष्ट, पौष्टिक व पचायला सहज, हलका आहार; यांचीही रचना विचारपूर्वक करणे व त्या सुविधा उपलब्ध करून देणेही आवश्यक असते. उच्च पर्वतीय रणभूमीवर ताज्या भाज्या, फळफळावळ, मांस हेही देणे गरजेचे असते. तसेच गरम, सुरक्षित आणि तात्पुरता का होईना, पण पक्का निवारा असावा लागतो. वेगवेगळ्या युद्धभूमीवर वेगवेगळ्या समस्यांवर उत्तरे शोधावी लागतात आण्विक, रासायनिक किंवा जैविक अशी अतिभयंकर विनाशकारी व संहारक शस्त्रे जरी जिनिव्हा करारानुसार वापरण्यास बंदी असली, तरी हल्ला झालाच तर जवानांचे त्यापासून संरक्षण करण्याची उपाययोजना हवीच असते. जंगलात, दलदलीच्या प्रदेशात, वाळवंटी प्रदेशामध्ये डास, किडे, सरपटणारे प्राणी, रोगट हवा इत्यादी विविध समस्यांवर मात करून मार्ग काढण्यासाठी कार्य करणाऱ्या डीआरडीओच्या खालील नऊ प्रयोगशाळांच्या कार्याविषयी जाणून घेऊ या.
१. अतिउच्च पर्वतीय क्षेत्र संशोधन संस्था (डिफेन्स इंस्टिट्युट ऑफ हाय अल्टिट्युड रिसर्च) या संस्थेद्वारा तीन हजार मीटरवरील पर्वतरांगांमध्ये व वर्षात आठ ते नऊ महिने बर्फाच्छादित भागामध्ये पिकणारी व पिकवता येणारी ताजी भाजी, फळभाज्या, प्राणिजन्य अन्न यांच्या उत्पादनात कशी वाढ होईल, यासाठीचे मूलभूत संशोधन; त्या भागामध्ये असणारे/ उद्भवणारे कृषी व प्राणी यांचे आजार व त्यावरील उपाययोजना यावर संशोधन केले जाते. तेथील वनसंपदा आणि उत्पादने यांचा उपयोग देशी वन संरक्षण व संवर्धन, तेथील बी-बियाण्यांचे जतन, लागवड व त्या नंतरच्या साठवणीची व्यवस्था, पीक व प्राणी यांच्या उत्पादनक्षमता वाढीसाठीचे तंत्रज्ञान, त्याचबरोबर औषधी वनस्पतींचा शोध व ओळख आणि शीतवाळवंट/ हिमसागर व उच्च पर्वतीय रांगांसाठी हरितगृह तंत्रज्ञान यांमध्ये संशोधन केले जाते. त्याचबरोबर स्थानिक लोकांना उद्योजक बनवून पिकवलेल्या मालाच्या खरेदीची हमी दिली जाते व वनवासी बंधूंचा विकास साधला जातो.
उदाहरणार्थ, लेहबेरी ही लेह, लडाख या परिसरात पिकणारी फळे. त्यामध्ये खूप पोषक तत्त्वांचा, जीवनसत्त्वांचा साठा असतो. त्याचे पीक काढणे, वाढवणे, त्यापासून विविध पेय-खाद्य पदार्थ, उदा: लेहबेरी ज्यूस, जेल चॉकलेट, हर्बल टी आदी पदार्थ तयार करणे.
या मागील अर्थकारणही समजून घेतल्यास सरकारचा कितीतरी खर्च वाचतो, हे लक्षात येईल. साधारणपणे लेह-लडाख या भागात सैन्यदलांच्या सर्व तुकड्यांतील सुमारे दहा ते बारा हजार जवान तैनात असतात. कडाक्याच्या थंडीत सर्व रस्ते बंद असतात. हिमवृष्टीमुळे साधारणत: आठ महिने रस्तावाहतूक पूर्ण बंद असते. उरलेल्या चार महिन्यांतच पूर्ण वर्षाचे धनधान्य, मसाले, तेल आदी भोजनाच्या साहित्याची साठवणूक, कडधान्ये, काही प्रमाणात भाज्या साठविण्यात येतात. डबाबंद अन्नही साठवतात. ताजी भाजी मिळण्यासाठी ती दिल्ली/चंदीगड येथून हवाई मार्गे आणली जाते. ठोकदरात ५ ते १० रु. किलोने खरेदी केलेल्या दिल्लीतील भाज्या हवाईमार्गे वाहतूक खर्च धरला तर १५० ते १६० रु. किलो पडतात. म्हणून स्थानिक बाजारातून घेतलेल्या भाज्या, फळभाज्या, फळफळावळ घेणे योग्य ठरते. शिवाय तेथील लोकांनाही उद्योग मिळतो. पिकवलेला सर्व माल हमीभावासह सैन्यदल विकत घेते. सैन्याचेही काम भागते व स्थानिक लोकही समृद्ध होतात. म्हणून तेथेच पिकतील व जास्ती उत्पादन देतील अशा भाज्या/फळे यांचे वाण शोधून त्यांचे बी बियाणे, तंत्रज्ञान यांचे विनामूल्य वाटप करण्यात येते.
२. संरक्षण जैव-ऊर्जा संशोधन संस्था (डिफेन्स इंस्टिट्युट ऑफ बायो-एनर्जी रिसर्च ) – ही संस्था हलवानी, उत्तराखंड येथे आहे. या संस्थेचा मुख्य उद्देश सशस्त्र सेनादलांना लागणाऱ्या जैवइंधनासाठीचे (बायो फ्युएलसाठीचे) पीक, कॅमेलिना साटिवा, यावर संशोधन हा आहे. ऊर्जा प्रश्नाला जैवइंधनाचे उत्तर शोधण्यासाठी आणि कॅमेलिनाच्या तेलापासून नवनवीन उत्पादने बनवण्यासाठी येथे संशोधन चालते. वापरासाठीची ऊर्जा ही जंगली वनस्पती, पाईन, सूचिपर्ण, घनकचरा यांपासून मिळवण्यासाठी संशोधन केले जाते. तसेच बंदिस्त शेती, हरितगृह पीक, खंदक शेती, छोट्या बोगद्यातील शेती यासाठी; आणि ताजा भाजीपाला जवानांच्या जेवणात मिळावा म्हणून स्थानिक पिकांचे आणि तेथील दुर्मीळ वनस्पतींचे जतन, संशोधन व संवर्धन केले जाते.
३. संरक्षण अनुसंधान आणि विकास आस्थापना (डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट) ही संस्था ग्वालियर येथे आहे. येथे रासायनिक व जैविक पदार्थांसाठीचे संवेदक (सेन्सर्स), प्रत्यक्ष संरक्षण करणारी साधने; तसेच आण्विक, जैविक आणि रासायनिक हल्ल्यापासून बचावाची साधने विकसित केली जातात. विषारी द्रव्ये हाताळण्याच्या पद्धती, प्रतिक्षम प्रणालीवर आधारित शोधक यंत्रणा, जैविक पाचन तंत्रज्ञान, रोगवाहक नियंत्रण प्रणाली (व्हेक्टर कंट्रोल सिस्टम) यांवर संशोधन केले जाते. तसेच जैविक व रासायनिक हल्ल्यासंदर्भात जागृती करण्यासाठी तज्ज्ञ लोकांची फळी उभारली जाते; व नियमितपणे आपल्या सैन्यांच्या तुकड्यांना प्रशिक्षण देणे चालू असते. या संशोधनांतून असंख्य अत्यावश्यक उत्पादने उपलब्ध झाली आहेत.
अशा प्रकारची सशस्त्र दलांना अत्यंत गरजेची असणारी आणि त्याचबरोबर सर्वसामान्यांनाही उपयोगी पडतील अशी साधने, उपकरणे, औषधे, तपासणी यंत्रणा या संस्थेद्वारे संशोधित करून, त्यांच्या उत्पादनासाठीचे तंत्रज्ञान हस्तांतरणही मोठ्या प्रमाणावर खाजगी उद्योगांना देऊन अनेकांना रोजगार याच देशांत मिळवून दिला जातो.
४. संरक्षण संशोधन प्रयोगशाळा (डिफेन्स रिसर्च लॅबोरेटरी) – ही प्रयोगशाळा आसाममधील तेजपूर येथे आहे. ह्या संस्थेद्वारे रोगवाहक जंतूंचे (व्हेक्टर) संनिरीक्षण (Surveillance), नियंत्रण, आणि प्रबंधन यावर संशोधन केले जाते. तसेच पाण्याच्या गुणवत्तेसंबंधित संशोधन, छत्रकवक (मशरूम) शेती, पर्यावरणपूरक जैविक कचरा प्रबंधन तंत्रज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्रीय विकृतिजनक (मायक्रोबियल पॅथोजेन्स), त्याचप्रमाणे स्थानिक वनस्पतीजन्य उपाययोजना, कलम तंत्रज्ञान, संरक्षित शेती/ बंदिस्त शेती यांवर संशोधन चालते.
विषाणूजन्य आजारांचा अभ्यास व उपाययोजना, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणी व गुणवत्ता वाढ, जैविक कचऱ्याची योग्य विघटन प्रक्रिया व प्रबंधन, आरोग्य संवर्धनासाठी मशरूम व्यंजने, विषबाधित पदार्थांवर अब्जांश (नॅनो) तंत्रज्ञान प्रक्रिया यांवरही येथे संशोधन केले जाते.
डास प्रतिबंधक वनस्पतीजन्य मलम आणि फवारा अशा अनेकविध
वस्तू, यंत्रणा या प्रयोगशाळेने तयार करून सशस्त्र सेनांना तर दिल्याच; परंतु यांचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांनाही होण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग व हस्तांतरण खाजगी कंपन्यांद्वारे केले.
५. केंद्रकीय वैद्यक आणि संलग्न संशोधन संस्था (इंस्टिट्युट ऑफ न्युक्लिअर मेडिसिन अँड अलाईड रिसर्च) – ही संस्था दिल्ली येथे कार्यरत असून जैव-वैद्यकीय (बायो-मेडिकल) आणि चिकित्सा यांविषयी संशोधन, विशेषत: आयनन प्रारण (आयोनायझिंग रेडीएशन) क्षेत्रात काम करत आहे.
केंद्रकीय वैद्यक ही संस्था निदानसूचक पद्धती, जैविक प्रारण संरक्षण आणि थॉयराइड विकार यांवर संशोधन व उपचार पद्धती विकसित करून मज्जातंतू व ग्रंथीकार्य मोजमाप यांवर काम करते. प्रामुख्याने उच्च उन्नतांश परिस्थितीत मज्जातंतू व ग्रंथी – विकार यासाठी अचूक निदान करणारी यंत्रणा व केंद्रकीय वैद्यकावर आधारित औषधोपचार यांचा खूप मोठ्या प्रमाणावर सशस्त्र दलांना उपयोग होतोय. हिमदंशासारख्या जखमांवर योग्य ते निदान, प्रतिबंधात्मक उपचार, तसेच बरे करण्यासाठीची उपचार पद्धती इथे शोधली गेली आहे.
६. संरक्षण शरीरक्रियाशास्त्र आणि संलग्न शास्त्रे संस्था (डिफेन्स इंस्टिट्युट ऑफ फिजिऑलॉजी अँड अलाईड सायन्सेस):
ही संस्था दिल्ली येथे कार्यरत आहे. जवानांची लढण्याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी माणसाच्या शारीरिक क्षमतांचा विकास व त्याच्या जोडीस तंत्रज्ञानातील नवनवीन शोध लावून लढायला साहाय्यभूत साधने विकसित करण्याचे काम ही संस्था करते. विषम वातावरण व उच्च उंचीवरील पर्वतरांगांमध्ये उपलब्ध प्राणवायू यांचा शरीरावर होणाऱ्या परिणामांनुसार आरोग्यपूर्ण आहार, व्यायाम आणि औषधोपचार निश्चित करणे; लढाईसाठी योग्य शरीर, मन राखणे; उपयोगात असलेल्या वस्तू व शस्त्रास्त्रे हाताळण्या योग्य व सहज सुलभ बनविणे आणि त्यासाठी विविध विज्ञान शाखांचा अभ्यास करणे; हे काम इथे केले जाते. योगासने व प्राणायाम यांचा अतिशय शास्त्रशुद्ध व खोलवर अभ्यास करून योग्य ते अभ्यासक्रम भूसेना, नौसेना आणि वायुदल यांच्या जवानांसाठी तयार केले जातात. पाठीवर सामान वाहण्यासाठी सुयोग्य पिशव्या, हलकी परंतु मजबूत पादत्राणे, शरीर संरक्षक पोशाख, अशा प्रकारची अनेक साधने विकसित करून त्याची उपयोगिता सिद्ध केली जाते. तसेच हे तंत्रज्ञान हस्तांतरण करून खाजगी उद्योगांकडे सुपुर्द केले जाते. त्याचा लाभ जवानांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनाही होतो.
७. संरक्षण जैवअभियांत्रिकी आणि विद्युत चिकित्सकीय प्रयोगशाळा (डिफेन्स बायो-इंजीनियरिंग अँड इलेक्ट्रोमेडिकल लॅबोरेटरी) – ही संस्था बेंगलोर येथे कार्य करीत असून, प्रामुख्याने वायू वैद्यकीय अभियांत्रिकी आणि जैववैद्यक तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये संशोधन करते. भूदल, नौदल आणि वायूदल यांच्या जवानांसाठी संरक्षणात्मक/ बचावात्मक साधने, कपडे यांचे तंत्रज्ञान व निर्मिती यात कार्य करते. मुख्यतः पाणबुडी चालक, वैमानिक, लढाऊ वाहन/ शस्त्रचालक आणि अत्यंत टोकाचे हवामान असणाऱ्या भागात कार्यरत असणाऱ्या सैन्यदल तुकड्यांमधील जवान यांच्यासाठी; जैविक, आण्विक अथवा रासायनिक हल्ल्यांपासून संरक्षण करणारी प्रणाली विकसित केली आहे.
८. संरक्षण अन्न संशोधन प्रयोगशाळा (डिफेन्स फूड रिसर्च लॅबोरेटरी) ही संस्था म्हैसूर येथे आहे. येथे प्रामुख्याने कृषी आणि जीवशास्त्र या विषयाधारित संशोधन, तसेच ‘विष विज्ञानाचा अभ्यास करून जवानांसाठी अन्ननिर्मिती आणि पुरवठा यावर संशोधन केले जाते. अन्न खराब का होते, त्याचे महत्त्व व उपयुक्तता कमी न होता ते जास्तीत जास्त किती दिवस राहील, याविषयी संशोधन केले जाते. रंग, रूप, गंध, चव, पौष्टिकता, सुरक्षितता आणि विश्वसनीयता वाढविण्यासाठी प्रक्रिया विकसित केल्या जातात. त्यांच्या चाचण्या घेण्यात येतात. रुचकर व ताज्यासारखेच अन्न, गरम-गरम न्याहरी, जेवण सीमांवरील जवानांसाठीही कसे पुरविता येईल, यावरही ही संस्था संशोधन करीत आहे. यासाठी अनेक महाविद्यालये, विद्यापीठे यांच्याबरोबर संशोधन करून अद्ययावत अन्न-तंत्रज्ञान विकसित केले जाते.
९. संरक्षण मनोवैज्ञानिक संशोधन संस्था (डिफेन्स इंस्टिट्युट ऑफ सायकॉलॉजिकल रिसर्च)
ही संस्था दिल्ली येथे कार्यरत आहे. मुख्यतः मनोवैज्ञानिक क्षेत्रामध्ये संशोधन व समस्यांचा अभ्यास करून उपाययोजना केली जाते. सशस्त्र दलांचे अधिकारी ते सर्वसामान्य जवान यांच्या मनावरील ताणतणावांच्या तसेच विषम हवामानाच्या बदलत्या वेळांनुसार होणाऱ्या परीणामांचा अभ्यास करून त्यांचे विचार व कृती योग्य व देशहितास पूरक कशी राहील, याचा अभ्यास केला जातो व उपाययोजना केली जाते. सेनादलांसाठी मनुष्यबळ निवडण्यासाठी त्यांच्या आवश्यक त्या म्हणजे बुद्धिमत्ता, अभिक्षमता (अॅप्टिट्युड), व्यक्तित्व, नेतृत्वक्षमता, नीतिधैर्य, अभिप्रेरणा इत्यादी गुणांचे विश्लेषण करून निवडीची प्रक्रिया तयार केली जाते.
सारांश रूपाने पाहिले तर, सशस्त्र सेनेच्या जवानांचे आरोग्य – मग ते शारीरिक, मानसिक, बौद्धिक व आध्यात्मिक नीट राहावे म्हणून अनेकविध उपाययोजना, संशोधनातून निर्माण केलेले तंत्रज्ञान, अद्ययावत औषध-योजना, रोगनिदान पद्धती, जीवनाधाराची विविध साधने, उपकरणे, आवश्यक समुपदेशन व्यवस्था, मनोविकारांचा अभ्यास अशा अनेकविध योजना, पौष्टिक व सहज पचेल असा, सुरक्षित आहार, अशा विविध आयामांवर डीआरडीओ कार्यरत आहे.
युद्ध जिंकण्यासाठी नुसतीच चांगली शस्त्रास्त्रे असून चालत नाही, तर त्या पाठीमागे लढणारा सैनिक सुस्थितीत असावा लागतो. ही सुस्थिती प्रदान करण्याचे महत्त्वाचे कार्य डीआरडीओ करत आहे. डीआरडीओचे हे योगदान सशस्त्र दलांना मदत करून भारताला स्वयंपूर्ण महासत्ता बनवेल, यात शंका नाही.
काशिनाथ देवधर
संरक्षण तज्ज्ञ
kashinath.deodhar@gmail.com
मराठी विज्ञान परिषदेच्या ‘पत्रिका’ या मासिकातील हा पूर्वप्रकाशित लेख
Leave a Reply