सुमारे तीस एक वर्षापूर्वीची गोष्ट. आते-बहिणीच्या लग्नाच्या निमित्ताने पुण्यनगरी गेलो होतो. कॉलेजचं शिक्षण चालू होतं. लग्न समारंभाला जाताना प्रवासखर्च, आहेराचा भुर्दंड, रजा यांची डोक्याला विवंचना नव्हती.
लग्नसमारभांत आपल्याला कुणी भेटलं आणि आपल्याही लग्नाचं जमलं तर पाहू असा न बोलून दाखवलेला विचार होता. त्यातून ‘पुणे तिथे काय उणे’ असंही ऐकून होतो.
लग्नसमारंभात नव्या भेटीगाठी होतील तेव्हा दाढी चकाचक केलेली बरी. फेस व्हॅल्यू वाढावी म्हणून सक्काळी उठून सलूनमध्ये जायला निघालो. सलून, दुग्धमंदिर आणि बेकऱ्या ही दुकानं पहाटेआधी उघडायला हवीत. तशी ती उघडतात असा समज मुंबईत राहून झालेला. इथे सकाळी ७.३० होऊनही एकही सलून उघडे मिळेना. शेवटी अर्धा पाऊणतास पायपीट करून झाल्यावर एक केशकर्तनकार सलून उघडताना दिसला. हायसं वाटलं. मी आसनस्थ झालो. कारागीरानं माझ्या तोंडाला फेस आणला आणि मी विचारलं, “एवढ्या उशीरा उघडलं दुकान? ” तो थांबला. मी परलोकावरचा कुणीतरी तुच्छ प्राणी असल्यासारखा तो माझ्याकडे पाहू लागला व म्हणाला, “लवकर उघडलंय आज दुकान, आणि लवकर उघडून काय हजामती करायच्येत? मी तोंड मिटलं.
पुण्यातल्या अस्सल पुणेकरानं मला दिलेला तो पहिला सूचना स्विमींग झाल्य कपडे घालून उघडयावर येऊ न हुकुमाव फटका.
पुणेकरांचा खवचट स्वभाव, पुणेकरांची काटकसर, पुणेकरांचं दुसऱ्याला कमी लेखणं, स्वतःला शहाणं समजणं, स्वत:ची जीवनाविषयक तत्व असणं आणि दुसऱ्याचं डोकं खाणं हे ज्यांनी पुणेकरांचा सहवास अनुभवला त्यांनाच ठाऊक. मुंबईसारखी घाई त्यांच्या रक्तात नाही. वाद घालणं हा त्यांचा आवडता छंद आहे. पुण्यात जो दुचाकी चालवू शकतो तो जगातल्या कुठल्याही रस्त्यावर दुचाकी हाकू शकतो. पुण्यातल्या दुकानदाराला दुपारी झोप लागतेच लागते. उध्दट बोलण्याला पुण्यात स्पष्ट बोलणे असं म्हणतात. पुण्यातला पोस्टमन मनास उमगत नाही. ज्या गावात बुधवार पेठेनंतर शुक्रवार पेठ लागते, सोमवार पेठेनंतर शनिवार पेठ लागते अशा ठिकाणी पत्रांचा बटवडा करणाऱ्यांचा दर महिन्याला शनिवारवाड्यावर सत्कार करायला हवा. पुण्यातले रिक्षावाले हा चिंतनाचा आणि पादचाऱ्यांच्या चिंतेचा विषय आहे.
पुण्यावर माझा बिलकूल राग नाही, पुणेकरांवरदेखील नाही. पुण्यातील माणसं त्यांच्या जगावेगळ्या तऱ्हेवाईक वागण्यानं वेगळी उठून दिसतात. त्यांना नावं ठेवण्याचा माझा विचार नाही, माझी योग्यताही नाही. शितावरून भाताची परीक्षा हा फॉर्म्युला एखाद्या शहराची वृत्ती ठरवायला कितपत योग्य आहे ठरवता येणं कठीण आहे. तरीही ज्याप्रमाणे व्यक्तीनं परिधान केलेल्या कपड्यांवरून आपण त्या त्या व्यक्तिबद्दल जसं मत बनवत असतो त्याप्रमाणे पुणेकरांचा पुणेरी बाणा पुण्यातील फलकांवरून, पाट्यांवरून पडताळून पाहायचा हा प्रयत्न.
पुण्यात एका ठिकाणी ‘येथे शिविर राजकारणावरून गप्पा मारू नयेत’ असा फलक निवृत्तीनाथांच्या गप्पागोष्टींच्या नाक्यावर दिसतो. जुन्या त्या फलकाच्या खालील बाकडी ‘खाली’ होती.
‘दिवाळीनंतर गेलेल्या फटाक्यांच्या वाती लावून मिळतील’ असा दिलासा मिळतो. त्या पुण्यात आम्ही वधुवरांच्या पत्रिका जमवून देतो’ असा फलक दिसला तरी आश्चर्य करण्यासारखे नाही.
ऑप्टीशियनच्या “तुमचं प्राथमिक शिक्षण झालं दुकानात नसेल तर वाचता येणारा चष्मा आमच्याकडेच काय कुठेही मिळणार नाही’ असा फलक ज्यांना वाचता येतं त्यांना वाचायला मिळतो.
उसाच्या गुऱ्हाळात ‘पूर्ण ग्लास बर्फ घालून आणि बर्फाशिवाय’ असे दोन वेगवेगळे दर असलेला फलक पुण्यातच पहायला मिळतो.
एका सलूनमध्ये तर ‘केस कापताना मान खाली करण्यास मानहानी समजू नये’ असा फलक होता.
‘फुले तोडणाऱ्याचे हात तोडले जातील’ असा फलक मधुमालतीच्या झाडाला टांगलेला पुण्यालाच दिसतो.
एका सुप्रसिध्द हलवायाच्या दुकानात ‘प्लॅस्टीकच्या पिशवीची भीक मागू नये’ असं स्पष्ट अक्षरात लिहिलेलं होतं. इस्त्रीवाल्यानं ‘२४ तासात इस्त्रीचे कपडे न नेल्यास आम्ही जबाबदार रहाणार नाही’ असा खुलासा फलकावर केला आहे.
एका रहदारीच्या रस्त्यावरच्या दुकानात ‘पत्ता सांगणे हा आमचा धंदा नाही’ अशी पाटी तर एका बोळात ‘इथे तिथे विचारत बसू नका, जोशी इथे रहातात’ अशी बाणेदारपणा दाखविणारी पाटी बघायला मिळते. पुण्यामध्ये हे वेगवेगळे फलक ऐकून बोर्डपेंटरचा धंदा तेजीत असेल असं मात्र समजू नका कारण यातील बहुतेक फलक हस्ताक्षरात लिहिलेले सापडतील. अशा पाट्या वाचल्या की लिहिणाऱ्याचे आणि त्याच्या अक्षराचेही वळण लक्षात येते.
पुण्यातल्या एका डॉक्टरनं आपल्या रोग्यांना तपासण्याच्या खोलीत ‘ सांगितल्याशिवाय तोंड उघडू नये’ अशी पाटी लिहिल्येय. ‘एका रुपयात अमृतांजन’ अशी पाटी बघून माझा एक मित्र उत्सुकतेपोटी दुकानात गेला. रुपया घेऊन अमृतांजनच्या बाटलीत बोट बुडवून एक बोट अमृतांजन मित्राच्या कपाळी गंधासारखं लावलं. आता काय बोलणार? कपाळ? पोटाचा प्रश्न सुटण्यापूर्वी पोट सुटलेला माझा एक मित्र दोरीच्या उड्या घेण्यासाठी पुण्यातल्या एका क्रीडासामान विक्रेत्याच्या दुकानी गेला. विचारलं, “दोरीच्या उड्या आहेत का? ” दुकानदारानं काय उत्तर द्यावं? तो म्हणाला, “दोरी आहे. उड्या तुमच्या घरी जाऊन मारा.’ ”
समजा, एका जनरल स्टोअर्स मधून लिफाफ्यावर लावण्यासाठी पोस्टाचा स्टॅम्प घेतलात.
स्टॅम्पसाठी गोंदाचं पाठबळ नसल्यामुळे लिफाफ्याशी तो जमवून घेत नाही. अशा वेळी मागितल्यावर दुकानदारानं गोंद दिला तर तो पुण्याचा दुकानदार नक्कीच नसणार.
पुण्याला एकदा मच्छर हटविणारी सामुग्री खरेदी करण्यास गेलो. फक्त एकच वडी मिळू शकते हा साक्षात्कार मला झाला, “कोणती वडी चांगली? ’” मी विचारलं. “सगळ्याच सारख्या.
डास कशानंही जात नाहीत”. दुकानदार म्हणाला.
अंगणात बेलाचं झाड असलेल्या कुणा बेलवलकरानं ‘बेल मागून न्यावा, चोरून नेऊ नये’ अशी पाटी लावली. कुणी शिवभक्त बेल वाजवून बेल मागायला गेल्यावर “बेलाची पाने दोन की पाच रुपयाची देऊ?” असा अडचणीत टाकणारा प्रश्न घरमालकानं टाकला. दरवेळी पाटी घरचा मालकच लिहितो असे नाही. ‘कुत्र्यांपासून सावध रहा’ मालकानं लिहिलेल्या पाटीला सप्लिमेंटरी पाटी कुणा शेजारच्यानं लिहिलेली ती अशी ‘आणि मालकापासूनही’. ‘कुत्रं चावलेलं परवडेल पण मालकानं चावणं नको.’ कौतुक याचं की ह्या दोन्ही पाट्या सलोख्यानं शेजारी नांदताहेत.
‘येथे सायकल उभी करू नये, केल्यास हवा काढली जाईल’ अशी पाटी दिसते. तिथे कुणी सायकल उभी केलीच तर दिलेल्या वचनाचं पालन केलं जाई.
‘रंग ओला आहे, हात लावू नका’ अशी पाटी तुम्ही वाचली असेल. पुण्याला ‘रंग ओला आहे हात लावून पहा’ असे आवाहन असते. पुण्यात एका हॉटेलात फक्त तीन (?) पदार्थच मिळतात. त्याचा फलक असा-‘ चहा २रु, वडापाव ३ रु. चहा वडापाव ५रु’ या फलकावरून तिसऱ्या पदार्थाचा वेगळा उल्लेख करण्याचं कारण लक्षात येत नाही. एका उसाच्या गुन्हाळात फुल आणि अर्धाग्लासचे दर नसून अमिताभ बच्चन १० रु. जयाभादुरी ७ रु.’ असा भावफलक आहे.
ससून इस्पितळात एका ठिकाणी ‘येथे १३ नंबरचा फॉर्म मिळणार नाही’ अशी पाटी आहे.
पुण्यात वडासांबार मागवलं तर बटाटावडा सांबार देतात. मेदूवडा हवा असेल तर उडीदवडा मागायला हवा.
झेरॉक्सच्या एका दुकानात ‘आम्ही हिंदी, गुजराती, मल्याळम्, मराठी, इंग्रजी, तेलगू, कन्नड सर्व भाषांमध्ये झेरॉक्स करतो’ अशी पाटी लटकवलेली बघायला मिळते.
‘जास्त वेळ बसू नये’ अशी पाटी बऱ्याच ‘विश्रांती’ गृहातून बघायला मिळते.
‘संडासची कडी डाव्या हातानं लावू नये’ अशीही सूचना वाचायला मिळते. एका इलेक्ट्रिकल वस्तू दुरुस्त करणाऱ्या दुकानी ‘आमच्याकडे टी. व्ही., रेडिओ, ट्रान्झिस्टर, सॅटेलाईट दुरुस्त करून मिळेल.
‘पुणे महानगरपालिका, पुणे महानगरातल्या कोणत्याही पालिकेचा फलक ज्याच्यापुढे महानगराचं नाव लिहिलंय असं पहायला मिळणार नाही.
लग्नाचे हॉल हे पुण्याचं आणखी एक वैशिष्ट्य. पुण्याच्या अशा हॉलमधली नियमावली म्हणजे मनोरंजनाचा खजिना. खजिन्यातलं एक माणिक सांगतो. ‘एकदा भरलेल्या पैशात एकच कार्य करावे’.
‘हे कॅरीबॅगचे दुकान नाही’ हे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी वाचायला मिळेल. जिथे लिहिलेलं नाही तिथे कॅरीबॅग मागितल्यास ऐकायला मिळेल.
एक पाटी आहे. ‘ १२ महिने २४ तास फटाके मिळतील.
‘ जोग म्हणून कुणी सद्गगृहस्थ (? ) आहेत त्यांच्या दारावरची पाटी अशी ‘बेल एकदाच वाजवावी, ५ मिनिटात दार उघडले नाही तर आपल्याशी आमचे काही काम नाही असे समजून कटावे. ‘
काही पाट्या नुसत्या वाचा. मी टीकाटिप्पणी करीत नाही.
‘रातांबे, कोकम आणि परकर मिळतील. ‘
आमच्याकडे ब्लाऊज आणि झेरॉक्स काढून मिळतील. ‘
एका बोळाच्या तोंडावर इथून पुढे १० फुटावर झेरॉक्स काढून मिळेल’ आणि दुकानात ‘पापणी मिटायच्या आत झेरॉक्स काढून मिळेल’ अशी पाटी.
ह्या पाट्या पाहायला म्हणून एकदा पुण्यावर स्वारी करायला हरकत नाही. कोण जाणे, काही आमच्याही दृष्टीस न पडलेल्या पाट्या तुम्हाला बघायला मिळतील. आम्हास कळवा बरे का!
-अनिल हर्डीकर
स. क्र. ५२७० | 9819421858
hardikarsutradhar@gmail.com
स्वयम – मे 2015
Leave a Reply