नेपाळची राजधानी काठमांडू येथे झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे प्रचंड प्रमाणात वित्त आणि मनुष्यहानी झाली आहे. सुमारे १० हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. याशिवाय, हजारो इमारती, रस्ते, पूल, वीजपुरवठा, पाणीपुरवठा यांसारख्या महत्त्वाच्या सार्वजिक सुविधा भूकंपामध्ये उद्ध्वस्त झालेल्या आहेत. यामुळे नुकसानीचा आकडा येणार्या काळामध्ये वाढणार आहे. या भूकंपानंतर नेपाळमध्ये सर्वात पहिली मदत (नेपाळ सरकार तयार होण्यापूर्वी) भारतीय सैन्यदलाची पोहोचली. त्याची दोन कारणे होती. एक – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्परतेने या घटनेचे गांभीर्य लक्षात आल्यावर तत्काळ भारतीय सैन्यदलाला नेपाळला सर्व प्रकारची मदत करण्याचे आदेश दिले. अशी तत्परता मागील सरकारच्या काळात कधीच दिसून आली नव्हती. भारतीय सैन्याची परंपरा त्वरित कारवाई करण्याची असल्यामुळे त्यांनी आदेश मिळाल्यानंतर तत्काळ आणि अत्यंत जलदगतीने हालचाली सुरू केल्या. भारतीय हवाई दलाच्या ५०० जणांची क्षमता असणार्या आयएल-७६ आणि १०० प्रवाशांची क्षमता असणार्या एएन ३२ या विमानांच्या माध्यमातून सैन्यदलाच्या अनेक तुकड्या तेथे दाखल झाल्या. केवळ आपले सैनिक तेथे गेले नाहीत, तर तेथे काम करण्यासाठी अभियांत्रिकी आराखडे, डोझर, संपर्कासाठी सिग्नल यंत्रणा, तात्पुरते पूल बनवण्यासाठी अभियंते अशा सर्वांना घेऊन परिपूर्ण तयारीनिशी भारतीय विमाने काठमांडूत उतरवण्यात आली.
३० हजार नेपाळी गुरखा सैनिक
भारतीय सैन्यदलाकडे सी-१३२ सुपर हरक्युलस हे एक प्रचंड मोठे विमान असल्यामुळे मदत ही मोठ्या प्रमाणात आणि पटकन पाठवता आली. कारण या विमानांमधून मोठमोठाले ट्रक्स आणि इतर वजनदार इंजिनीयरिंग साहित्यही पाठवता येते. भारतीय सैन्यदलामध्ये आज २८ ते ३० हजार नेपाळी गुरखा सैनिक आहेत. त्यांच्यामुळे नेपाळमधील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येण्यासाठी मदत झाली. भारतीय सैन्याचे सल्लागार काठमांडूमधील भारतीय दूतावासामध्ये आहेत. याशिवाय जवळजवळ दीड ते दोन लाख निवृत्त भारतीय सैन्याचे गुरखा जवान या भागात असल्यामुळे भूकंप झालेल्या वेगवेगळ्या भागांमध्ये तत्परतेने पोहोचण्यास मदत मिळाली. तेथे असलेले जवानांचे कुंटुंबीय आणि निवृत्त झालेले जवान हे आजच्या या परिस्थितीमध्ये मदत करणार्या भारतीय सैन्याला माहिती देण्यासाठी कान आणि डोळे बनून महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
भारतीय सैन्यदलाचे प्रमुख जनरल दलबिरसिंग सुहाग हे स्वत: गुरखा रेजिमेंटचे आहेत. त्यांनी नेपाळच्या सैन्यप्रमुख जनरल राणाशी दूरध्वनीद्वारे बोलणी करून मोठ्या प्रमाणात भारतीय डॉक्टर आणि इतर मदत तिथे पाठवली. जनरल सुहाग यांनी जनरल सिंधू आणि ब्रिगेडियर गामलिन (गुरखा रेजिमेंटचे) या भारतीय सैन्याच्या दोन अधिकार्यांना तिथे होणार्या कार्यामध्ये समन्वय साधण्यासाठी काठमांडूला पाठवले. भारतीय सैन्याने स्वत:चे एक मुख्यालय त्या भागामध्ये तयार करून येणारी मदत कुठे, कधी आणि केव्हा पाठवायची याचे नियोजन चांगल्या पद्धतीने केले. आज भारतीय सैन्याने नेपाळमध्ये १८ रुग्णालये तयार केली आहेत. तसेच तात्पुरते रस्ते, पूल बनवण्यासाठी, पाणीपुरवठा आणि वीज पुरवठा पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी १० इंजिनीअरिंग टास्क फोर्सेस कार्यान्वित असून यामध्ये सुमारे चार हजारांहून अधिक जवानांचा समावेश आहे. याशिवाय या भागातले दळणवळण पूर्णपणे तुटल्यामुळे सॅटेलाईट फोनही या भागात पाठवण्यात आले आहेत. भारतीय सैन्याची पाच मोठी हेलिकॉप्टर्स आणि चिता हेलिकॉप्टरही नेपाळमध्ये कार्यरत आहे. तसेच गुरखा रेजिमेंटच्या अनेक सैनिकांना या मदतकार्यासाठी तेथे पाठवण्यात आलेले आहे. हे सैनिक नेपाळमधीलच असल्यामुळे त्यांना तेथील भौगोलिक परिस्थितीची माहिती आहे, त्यामुळे नियोजन प्रक्रिया सुकर होण्यास मदत होत आहे. भारत सरकारने दाखवलेल्या पुढाकाराबाबत आणि भारतीय सैन्याच्या अजोड कामाबाबत जगभरातून कौतुकवर्षाव होत आहे.
नेपाळमध्ये पोखरा-दरभंगा या भूकंप प्रभाव क्षेत्रामध्ये भारतीय सैन्याने मोठा कॅम्प उभारून वेगाने मदत कार्य सुरू केले आहे. याशिवाय नेपाळमध्ये पर्यटनासाठी आलेल्यांपैकी भूकंपामुळे अडकून पडलेल्या हजारो भारतीय पर्यटकांना तेथून सहीसलामत बाहेर काढण्यामध्ये सैन्याने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.
नेपाळ सैन्याचे पूर्ण प्रशिक्षण हे भारतीय सैन्यदलाच्या नेतृत्वाखाली झालेले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारतीय सैन्याने केलेल्या कामाचे कौतुक केलेले आहे. सध्या सुरू असलेले मदतकार्य आणखी बराच काळ चालण्याची शक्यता आहे. जसजसे ढिगारे उपसण्याचे काम पुढे जाईल तसतसे आत झालेल्या नुकसानीची कल्पना येत जाणार आहे. भारतीय सैन्याने पाठवलेल्या हेलिकॉप्टर्समुळे दूरच्या भागामध्ये टेहळणी केली जात आहे. त्यातून तातडीची मदत कोठे आवश्यक आहे, याबाबतची माहिती मिळत आहे. पण त्या भागातल्या रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे तिथे पोहोचणे कठीण जात आहे. भारत सरकार रस्ते ठीक करण्याकरता दिर्घकालीन योजना बनवत आहे.
सैन्यदलांची सर्वात महत्त्वाची भूमिका
देशांतर्गत आपत्तींच्या काळात भारतीय सैन्याला अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये मदतीकरिता नेहमीच बोलवले जाते. यामध्ये ईशान्य भारतामध्ये किंवा काश्मीरमध्ये आणि भारताच्या इतर भागामध्ये येणारे पूर यांचा समावेश आहे. भारतीय सैन्याकडे आपत्कालीन परिस्थितीमध्ये लागणारे इंजिनीयरिंग सामान मोठ्या प्रमाणात आहे. पुराच्या वेळेला सैन्याकडे असलेल्या बोटी, लाईफ जॅकेट, रिकव्हरी व्हेईकल, डोजर्स, जेसीबी, पूल दुरुस्ती करणारी सामग्री अशा अनेक प्रकारच्या इंजिनीयरिंग साधनांमुळे बचाव कार्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मदत होते. ही मदत अतिशय तत्परतेने त्या भागामध्ये पोहोचल्याने आपत्तीमध्ये होणारे नुकसान कमीत कमी राखणे शक्य होते. सैन्याची परंपरा अकस्मात आलेल्या, आपाद संकटावर मात करण्याची असल्यामुळे अशा परिस्थितीमध्ये भारतीय सैन्यदले नेहमीच अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. आजवर देशामध्ये घडलेल्या अनेक आपत्कालीन परिस्थितीमध्ये भारतीय सैन्याने नियोजित, कार्यक्षम, शिस्तबद्ध मदत केलेली आहे. यामध्ये २०१४ काश्मीरमध्ये आलेला महापूर, २०११ मध्ये सिक्कीममध्ये, २०१३ उत्तराखंड मध्ये, लातूरमधे झालेल्या भूकंपामध्ये, समुद्र किनार्यालगतच्या भागात त्सुनामी, काश्मीरमध्येच आलेली बर्फाची त्सुनामी अशा अनेक मोठ्या नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये देशामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये सैन्याने अतिशय तत्परतेने मदत केलेली आहे. याशिवाय भारतीय सैन्याने बांगलादेश, श्रीलंका, भूतान, तसेच मालदीव, इंडोनेशिया, फिलिपाईन्स यांसारख्या राष्ट्रांमध्येही तत्परतेने मदत करून आपल्या कार्यक्षमतेची/कर्तृत्वाची चुणूक दाखवली आहे. काश्मीरमधे आलेल्या पुरादरम्यान सैन्यावर अनेक ठिकाणी दगडफेक झाली, गोळीबार झाला, पण सैन्याचा बाणा निष्काम कर्मयोग असल्यामुळे त्यांनी आपले काम सुरूच ठेवले.
माध्यमांचा उतावळेपणा
नेपाळमध्ये सध्या सुरू असलेल्या बचावकार्याबाबत एक गोष्ट प्रकर्षाने नमूद करावीशी वाटते. ती म्हणजे, अशा आपत्तींच्या काळात माध्यमांकडून दाखवला जाणारा उतावळेपणा. काठमांडूमधील आपत्तीनंतर तेथे वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी भाऊगर्दी केली आहे. या प्रतिनिधींकडून जखमी झालेल्या, मृत पावलेल्या व्यक्तींवर अधिक फोकस केला जात आहे. तसेच पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेल्या नागरिकांच्या मुलाखती घेऊन तुम्हाला आता काय वाटते? भारत सरकारकडून तुम्हाला मदत मिळते आहे का, असे प्रश्न विचारून त्यांना भंडावून सोडण्यात येत आहे. अर्थात, हा प्रकार काही नवीन नाही. मध्यंतरी काश्मीरमध्ये आलेल्या पुरामध्ये भारतीय सैन्याच्या हेलिकॉप्टरमध्ये बसलेले काही कॅमेरामन पाण्यातून बाहेर काढलेल्या अर्धमेल्या माणसांना तुम्हाला कसे वाटते आहे, असा प्रश्न विचारत होते. एखाद्या बाईटसाठी, टीआरपीसाठी अशा प्रकारे मरणाच्या दारातून परतलेल्या अथवा संकटात सापडलेल्या व्यक्तींवर प्रश्नांचा भडीमार करणे हे असंवेदनशीलतेचे आणि असभ्यतेचे दर्शन आहे. अशा परिस्थितीचे अवलोकन हे अतिशय काळजीपूर्वक होणे महत्त्वाचे आहे. भारतातील वृत्तवाहिन्यांनी सरकार किंवा सैन्यावर आरोप करण्यावर लक्ष केंद्रित करू नये, जसे येमेनमधे झाले. सगळे जग सैन्यदलाने येमेनमधे केलेल्या कामाचे कौतुक करत होते, पण काही वाहिन्यांचे प्रतिनिधी जनरल व्हीके सिंग यांच्याशी वादविवाद करण्यात गुंतले होते. देशाबाहेरचे आपले शत्रू अशा बातम्यांचा गैरवापर करतात.
भारताची प्रतिमा सांभाळा
भौगोलिक किंवा राजकीयदृष्ट्या नेपाळ हा केवळ आपला शेजारील देश आहे. या देशाशी आपले प्राचीन काळापासून मैत्रीचे, व्यापाराचे, सांस्कृतिक संबंध आहेत. म्हणून नेपाळ प्रलयंकारी भूकंपाने हादरला आणि या देशाचे उद्ध्वस्तपण प्रसारमाध्यमांतून जगापुढे आले, तेव्हा सामान्य भारतीयही मनापासून हादरला. भारतीयांचे क्लेश, वेदना मातीच्या हजारो टन ढिगार्यांखाली अडकलेल्या हजारो नेपाळी नागरिकांसाठी होत्या हे महत्त्वाचे.
नेपाळ आणि भारताचे ऐतिहासिक संबंध आहेत. आज लाखो नेपाळी भारतामध्ये रोजी-रोटीसाठी येतात. सगळ्या परिस्थितीमध्ये ते भारताचे मित्र राहतात. आज अशा गंभीर परिस्थितीमुळे इतर अनेक देश भारताप्रमाणेच नेपाळला मदत करायला तयार आहेत. यामुळे प्रत्येक देश आम्ही किती अधिक मदत केली हे दाखवण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. खास करून चीनकडून हा प्रयत्न होण्याची दाट शक्यता आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, भारताएवढी मदत भौगोलिक परिस्थितीमुळे कधीही चीन देऊ शकणार नाही. भारतामधून अनेक रस्ते नेपाळमध्ये जातात. असे रस्ते चीनमधून नेपाळला जात नाहीत. नेपाळमध्ये असलेल्या एकमेव विमानतळावर झालेल्या प्रचंड गर्दीमुळे तेथे विमानाने मदत पाठवणे अशक्य झाले आहे. भौगोलिक परिस्थितीमुळे भारतीय सैन्याच्या अनेक तुकड्या यांत्रिक सामग्री घेऊन रस्तामार्गे गोरखपूरकडून नेपाळमध्ये अनेक ठिकाणी पोहोचलेले आहेत. प्रसारमाध्यमांनी येमेनसारखी चूक या वेळेस करू नये. नेपाळी लोकांना भारताविषयी अतिशय प्रेम असले तरी तेथील काही माध्यमे, काही संस्था आणि काही चीनप्रेमी नागरिक या कार्यादरम्यान अनावधानाने राहिलेल्या चुकांचा अधिक गवगवा करून, आपल्याला दोष देण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण सर्वांनीच या घटनेचे गांभीर्य ओळखून त्याचे अवलोकन सुयोग्यरीत्या करण्याचा आणि त्याचा भारताच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता घेण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.
भूकंपात उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात देताना, सुरक्षिततेची हमी देणारी जीवनशैली या भागात कशी रुजवता येईल, याचाही विचार व्हायला हवा. आशियात, भारतीय उपखंडात सार्वजनिक जीवनाला शिस्त नाही. हक्कांच्या तुलनेत कर्तव्यांबाबतची जागृती नाही. ही दोन मूल्ये एकत्र रुजवणे हाही सुरक्षिततेचा एक मार्ग होय. नेपाळवरचे संकट लक्षात घेता भारताने आपत्कालीन परिस्थितीचा कायमस्वरूपी सामना करण्यासाठी सार्क देशांशी चर्चा करून स्वत:कडे नेतृत्व घेण्याची गरज आहे. अशा नेतृत्वामुळे सार्क देशांमध्ये भारताविषयीची धारणा बदलेल. सार्क गटातील सर्वच देश भूकंप, महापूर, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तींच्या तडाख्यांना तोंड देतच असतात. अशा आपत्तींशी सामना करण्यासाठी भारताने सार्कच्या साहाय्याने एक आर्थिक निधी उभा करून व्यापक स्वरूपाची आपत्कालीन व्यवस्था उभी केल्यास भारतीय उपखंडातील वित्तहानी व जीवित हानीवर नियंत्रण येऊ शकते. भारतीय उपखंडातील राजकारण हे आर्थिक मदत व लष्करी सामर्थ्याच्या जोरावर रेटले जाते. आपात्काळात तत्काळ मदत व नंतर पुनर्निर्माण सहकार्य हाच शेजारील देशांशी शांतता व सामंजस्य टिकवण्याचा मार्ग आहे. नेपाळला त्याच्या पायावर उभे करणे महत्त्वाचे आहे.
ब्रिगेडियर हेमंत महाजन-९०९६७०१२५३
Leave a Reply