दोन दिवसापूर्वी मी एका कंपनीचा सामाजिक उपक्रम म्हणून दिवाळी मेळावा आयोजित केला होता तो एका वृद्धाश्रमात . त्या कार्यक्रमाचे फोटो दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच पेनड्राईव्ह मध्ये पाठवतो असे व्यवस्थापकांनी सांगितले . वाटलं ..कोणी ऑफिसबॉय येईल पेनड्राईव्ह घेऊन म्हणून मी दुसऱ्या दिवशी वाट बघत होते .
7.30 ला मोबाईल वरून फोन आला . जरा थकलेला ..पण मार्दवपूर्ण असा एका आजींचा आवाज होता . ” मी आलेय फोटो घेऊन . डेक्कन च्या बस स्टॉप वर उतरलेय. पत्ता समजावून सांगता का ?” अरे बाप रे ..एवढ्या वयस्क आजी . मी माझ्या लेकीला गाडीने पिटाळले त्यांना आणायला . झक्कपैकी टू व्हिलर वर बसून आजी आल्या . फिकटस नऊवारी पातळ , सुपारीएवढा अंबाडा , हसतमुख चेहरा आणि हातात मोबाईल आणि पेनड्राईव्ह छोट्याशा बटव्यात .
ब्रेकफास्ट ची वेळ होती . नवरा ग्राऊंडवरून 10 मिनिटात येणार होता . मी बटाटे पोह्यांची तयारी केली होती . मला कंपनीत फोटो आणि न्यूज पाठवायची होती . लेक पसार झाली काहीतरी काम काढून . शेवटी मी डाईनिंग टेबलवर लॅपटॉप घेतला नि गॅसवर कढई ठेवली . माझी धांदल पाहून आजी म्हणाल्या , ” मी करते ग पोहे , तू निश्चिनतीने फोटोचे काम हातावेगळे कर .” मी जरा संकोचले पण पर्याय नव्हता म्हणून तेथून बाजूला झाले . माझे काम होस्तोवर पोहे तय्यार .
भरपूर ओला खोबरं आणि कोथिंबीर घालून आजीनी मस्त पोहे केले होते . हक्कानी पापड मागून घेतले . मी भाजते म्हंटलं तर म्हणाल्या ” थांब मी तळते कि “.
एव्हाना लेक आणि नवरा घरी आले आणि आम्ही एकत्र ब्रेकफास्ट करायला घेतला .आजींच्या हातचे चविष्ट पोहे खाऊन घरातले खुश . जाते जाते म्हणत आजी जेवण करूनच निघाल्या इतका आग्रह माझ्या माणूसवेल्हाळ लेकीने आणि नवऱ्याने त्यांना केला . आणि आजीने पण खान्देशी भरीत करून त्यांच्या आग्रहाला पोच दिली.
निघताना मी जरा संकोचून आजींना म्हंटले , ” आजी खूप त्रास घेतलात हो .”
आजी जे उतरल्या त्यात समाधान होते आणि वेदनाही . त्या म्हणाल्या ” नांदत्या घरात खूप दिवसांनी वावरले , अगदी स्वयंपाकघरातही हक्क दाखवला …खूप छान वाटलं ग ”
या एका वाक्यात मीच रडवेली झाले . ” पुन्हा याल ना ? ” त्या उत्तरादाखल किंचित हसल्या अन म्हणाल्या ” परमेश्वराची इच्छा ”
खरा सांगू ..सणासुदीला पाव्हण्यारावळ्यांचा मर्यादेपेक्षा जास्त राबता झाला कि मी जरा वैतागायचे …..आजींच्या ” नांदत्या ” या एका शब्दाने मला ती किंमत कळली .
दिवाळी निमित्ताने आजी ची आठवण झाली ..म्हणून हे सारे तुमच्याबरोबर share केले
Leave a Reply