१५ नोव्हेंबर, २०१६. पुण्याहून सकाळी ६ वाजता निघून सातारा–कोरेगाव– खटाव–वडूज अशी मजल दरमजल करीत चार तासांच्या प्रवासानंतर ‘कलेढोण’ नावाच्या खटाव तालुक्यातील एका छोटयाशा गावात माझ्या ‘स्वयंसिध्द शेतकरी’ या कार्यशाळेसाठी दाखल झालो. प्रवासादरम्यान शेतकऱ्यांना भेटणे व त्यांच्या समस्या समजावून घेण्यासाठी त्यांच्याशी गप्पा मारणे या जुन्या सवयीमुळे सभोवतालच्या शेतांमध्ये शेतकऱ्यांना शोधण्यासाठी माझी नजर भिरभिरू लागली आणि नेहमीपेक्षा आजचा दिवस वेगळा आहे याची प्रकर्षाने जाणीव झाली. आज शेतकरी शेतात नव्हते तर आमच्या दोनशे कि.मी.च्या प्रवासातील प्रत्येक गावात सकाळी आठपासूनच ते विविध बँकांसमोर रांगा लावून उभे होते. ११ वाजता सुरु होणाऱ्या कार्यशाळेचं भवितव्य मला दिसू लागलं. १ वाजेपर्यंत काहीही घडलं नाही कारण सभागृहात केवळ तीन शेतकऱ्यांनी हजेरी लावली. गेल्या वीस वर्षांमध्ये असं कधीही घडलं नव्हतं. पण आज नोटांपेक्षा कोणताही विषय महत्त्वाचा नव्हता. आजची कार्यशाळा नेहमीपेक्षा खूप उशीरा सुरु होण्याची शक्यता असल्यामुळे बँकांच्या समोर रांगा लावलेल्या शेतकऱ्यांच्या मनाचा कानोसा घेण्याची सुवर्णसंधी माझ्यासाठी चालून आली होती.
सभागृहाच्या शेजारीच स्टेट बँक असल्यामुळे मी थोडाही वेळ वाया न घालवता रांगेत ताटकळत असलेल्या शेतकऱ्यांना भेटायला गेलो. “माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही व मी पत्रकारही नाही. मीही तुमच्यासारखाच शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे जुन्या नोटा बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांवर काय परिणाम झाला आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हा सर्वांना भेटायला आलो आहे.” असं त्यांना सांगताच ते मोकळेपणाने बोलू लागले.
१. राज्य सहकारी बँकांवर बंधनं आल्यामुळे आम्ही खूप अडचणीत आलो आहोत.
२. भामटेगिरी करणाऱ्या नेत्यांच्या गडगंज काळ्या पैशाची काही तासांमध्ये अक्षरशः रद्दी झाली म्हणून आम्हाला प्रचंड आनंद झाला आहे.
३. जनतेला कितीही त्रास झाला तरी सरकारने काळा पैसा जमा करणाऱ्यांच्या विरुध्द आणखी कडक उपाय योजायला पाहिजेत असं आम्हाला वाटतं.
४. राजकीय नेते व मोठ्या उद्योगपतींनी आपल्या देशाला लुटून जो त्रास दिला आहे त्याच्या तुलनेत दिवसभर रांगेत उभे राहण्याचा त्रास काहीच नाही.
५. खरा त्रास आम्हाला नाही तर ज्यांच्याजवळ प्रचंड काळा पैसा आहे त्यांना होतो आहे आणि म्हणूनच ते सरकारच्या नावाने ठणाणा करत आहेत.
६. नविन नोटांच्या वितरणाचं व्यवस्थित नियोजन केलं असतं तर आपला देश सरकारला डोक्यावर घेऊन नाचला असता.
सर्वांचा निरोप घेऊन निघत असताना एक वयोवृध्द शेतकरी म्हणाला “रांगेत तासनतास उभे राहण्याचा त्रास होतो म्हणून तक्रार करण्यात काय अर्थ आहे? लवकरच जन्माला येणाऱ्या गोंडस बाळाची स्वप्नं बघायची की पोट दुखतं व कोरडया वांत्या होतात म्हणून रात्रंदिवस तक्रार करायची?” आपल्या देशातील प्रत्येकाला अंतर्मुख होण्यास भाग पडणाऱ्या त्या वयोवृध्द शेतकऱ्याचे शब्द डोक्यात घोळवतच सभागृहात परतलो. कार्यशाळेत शेतकरी येण्यास सुरवात झाली होती !
श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
Leave a Reply