नवीन लेखन...

तुम्ही फकीर झालात, लोकांनी तिराळं व्हायचं की मुखिया ! 

‘माझ्याच देशातील काही लोक माझ्यावर आरोप करतात, त्याचे मला आश्‍चर्य वाटते, आजपर्यंत देशाला लुटणार्‍यांना जबाबदारीची जाणीव करून देणं चूक आहे का? भ्रष्टाचार आणि काळ्या पैशावर हल्ला करून मी गुन्हा केलाय का? मी तुमच्यासाठी लढाई लढतो आहे, भ्रष्टाचारी करून करून काय करतील, मी फकीर आहे, मी झोळी घेईल आणि चालू लागेल
– इति नरेंद्र मोदी 
नोटबंदीच्या निर्णयाने नक्की काय होणार, काळा पैसा बाहेर येणार काय? याबाबत अद्याप तरी सर्वजण अंधारातच आहेत. आजही जनता रांगेत उभी राहिलेली दिसेल. स्वत:च्या पैशासाठी सर्वसामान्यांना सरणावर जावे लागत आहे. खरचं अच्छे दिनची गुहार लावणार्‍या सरकारने घेतलेल्या या निर्णयाची दिशा भारताला आर्थिक महासत्ताकतेकडे घेऊन जाणारी आहे काय? तशी असेलच तर गेल्या चार आठवड्यांच्या कालखंडात देशातील कुठली परिस्थिती सुधारली? काळ्या पैशाविरुद्ध फास आवळले जात असल्याची आवई उठवली जाते, किती काळ्या पैशावाल्यांना या चार आठवड्यात पकडलं. याचं उत्तर सध्यातरी हो आणि नाही अशा प्रकारचं देण्यापेक्षा नंदी बैलाला पाऊस येणार का? असा प्रश्‍न विचारल्यागत बैल जी मुंडी हलवतो त्याच मुंड्या आता हलताना दिसतायत. आम्हालाही काळ्या पैशाच्या विरुद्ध चिड आहे, नव्हे नव्हे तर देशातील प्रत्येक नागरिकाला याची चिड असणारच. परंतु चार आठवड्यांचा कालखंड उलटला तरी सरकारच्या हाती काहीच लागत नाही. उलट ज्या रयतेसाठी हा खटाटोप चालू आहे त्या रयतेला मात्र प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. मात्र अशा स्थितीतही केवळ अच्छे दिनचे स्वप्न पाहता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम’च्या मनसुब्याखातर नोटबंदीचा निर्णय योग्य असल्याचे सांगत देशवासीय मोदींच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत. ते केवळ आणि केवळ तिराळ्यापणामुळे.

एका गावात एक बांगा, तिराळा राहत होता. गावातले लोक त्याला आंधळा, डुचका म्हणून चिडवत. त्याला लोकांचा राग येई. याचा बदला घेण्याचंही तो ठरवी.परंतु त्याला बदला घेता येत नव्हता. एके दिवशी त्याने स्वत:चा एक डोळा फोडला आणि गावभर डोळा फोडल्याने देव दिसतो म्हणून डांगोरा पिटवला. ही माहिती गावच्या मुखियापर्यंत गेली. देव पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या मुखियाने आपले दोन्ही डोळे फोडून घेतले. मुखियाला देव काही दिसला नाही. मुखिया तिराळ्याकडे गेला, देव दिसत नसल्याचे सांगितले. तिराळा म्हणला, मुखियाजी , तुम्ही जर देव दिसत नाही म्हणून सांगितलं तर लोक तुम्हाला मुर्खात काढतील. आपण मुर्खात निघू नये म्हणून मुखियाही गावभर डोळे फोडल्याने देव दिसतो म्हणून डांगोरा पिटू लागला. बघता-बघता अख्ख्या गावाने देव पाहण्यासाठी डोळे फोडून घेतले. पदरी मात्र भविष्याचा अंधार आला. तिराळ्याचा बदला पूर्ण झाला, तशी परिस्थिती आज नोटाबंदीच्या बाबतीत घडती की काय, देशातील सर्वजण म्हणतात, निर्णय चांगला परंतु प्रतिप्रश्‍न निर्णय कसा चांगला याला उत्तर मात्र कोणाला देता येत नाही. अर्थतज्ज्ञांनी एकाच अर्थशास्त्रावर अभ्यास केला, परंतु अर्थतज्ज्ञांचे मत मात्र भिन्न-विभिन्न पहावयास मिळाले. आजची परिस्थिती पाहितली तर धनदांडग्यांचं कुठंही वाकडं झालेलं दिसलं नाही. सर्वसामान्यांच्या लेकीबाळींना बँकेच्या रांगेत उभे राहून बाळांत व्हावं लागलं. म्हातार्‍या बाबाला दोन-पाच हजार रुपये काढण्यासाठी रांगेत उभं राहता-राहता मरण पत्कारावं लागलं. रांगेत उभे राहून राहून आतापर्यंत 50 पेक्षा जास्त लोकांना मरण स्वीकारावं लागलं आहे. दवाखान्यामध्ये हलगर्जीपणामुळे एखाद्याचा मृत्यू झाला तर तिथं डॉक्टरला जबाबदार धरलं जातं. नोटबंदीच्या निर्णयावर देशभरात पन्नासपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. याची जबाबदारी कोण घेणार? सरकारला दोषी ठरवलं जाणार आहे की नाही? की नोटबंदीच्या निर्णयावर मुखियाच्या पाठिशी डोळे फोडून घेणार्‍या देव पाहण्यासाठी आशावादी असणार्‍या लोकांच्या पाठिराख्यावर ‘मी फकीर आहे,’ मी झोळी घेऊन जाईन, एवढ्याशा भावनिक आवाहनावर देशातली विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा व्यवस्थित बसणार आहे का? असे एक ना अनेक प्रश्‍न उपस्थित राहण्याचे कारण एवढेच, काळ्या पैशावाल्यांचे मुस्काट रंगविण्यासाठी आखलेली ही योजना एखाद्या ‘तिराळ्या’च्या बदल्याच्या मनसुब्यासारखी तर नव्हे ना? कारण आज आपण देशात कुठेही जा सर्वसामान्यांना नोटबंदीचा फटका मोठ्या प्रमाणावर बसल्याचं दिसून येतं. आमच्या मराठवाड्यामध्ये गेल्या चार वर्षात दुष्काळ होता, आमच्याकडे दोन पैसे पहायला मिळत नव्हते.

योगायोगाने यावर्षी पाऊस झाला. कापसाला बोंडं फुटली, पांढरं सोनं दारात आलं, परंतु नोटबंदीमुळं ते बाजारात घेऊन जाताना मात्र तोंडाला फेस आला. नव्या नोटा पाहिजे तर 4 हजार क्विंटल आणि जुन्या नोटांवर साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटल म्हणजे इथेही सर्वसामान्यांची दीड हजाराला चांगली मारली! हे बहुदा फकीर असणार्‍या व्यक्तिांना  आणि झोळी उचलण्याची भाषा करणार्‍या 21 व्या शतकातील कौटल्यांना माहित नसावं. देशातला सर्वसामान्य नोटबंदीमुळे जेवढा त्रस्त झाला आहे तेवढ्या प्रमाणावर खरचं काळा पैसा बाळगणारा त्रस्त झाला आहे काय? टॅक्स बुडविणारे इमानदारीने बँकेच्या रांगेत उभे राहिलेले पाहिले आहेत काय? ज्या हिमतीने आणि ज्या दिमतीने हा निर्णय घेतला आणि काळा पैसा गंगेत वाहिला जाईल, असा आशावाद ठेवला त्या सरकारच्या आशावादाला काळ्या पैशावाल्यांनी हरताळ लावली आणि काळ्याचे पांढरे पैसे करण्याची मोहीम उघडत ती मोहीम जणू काही फत्तेही झाली. मग आमचा प्रश्‍न आहे, लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालविलेल्या लोकशाहीच्या राज्यात सर्वच बेईमान आहेत का? अख्ख्या देशवासियांना आम्ही इमानदार ! आहोत. हे फकीराला का सांगावं, झोळीवाल्याला का सांगावं? असा जळजळीत सवाल आम्ही जर विचारला तर नक्कीच आमचा राग येईल. परंतु मोदीजी, तुम्ही जेंव्हा माईकवर येता आणि ‘मेरे भाईयो और बहनो,’ असा सूर आवळता तेव्हा बेईमानापासून सर्व इमानदारांना गळ्याला फास आवळल्यागत वाटतं, ते केवळ दहा-पाच बेईमानांमुळे अवघ्या देशातील नागरिकांना आम्ही इमानदार आहोत आम्ही इमानदार आहोत हे बँकेच्या रांगेत उभे राहून सांगावे लागते, पटवून द्यावे लागते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सांगतो, या देशाचा कायदा सांगतो, शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील परंतु एका बेकसुराला शिक्षा झाली नाही पाहिजे. मग आता तर काळ्या पैशेवाले बिनदिक्कत घरात पडून आहेत. त्यांची तूपरोटी चालू आहे, परंतु जे इमानदार आहेत, ज्यांना रोज रोजीरोटीसाठी कामावर जावं लागतं त्यांना मात्र बँकेच्या रांगेत उभा राहून आम्ही इमानदार असल्याचं सर्टिफिकेट द्यावं लागतं. मालवणी भाषेमध्ये एक म्हण आहे, ‘वाहघ पडला वाळी आणि केल्डा दाखवतो नाळी,’ म्हणजेच जंगलचा राजा वाघ पिंजर्‍यात अडकल्यानंतर क्षुद्र माकड त्या पिंजर्‍यासमोर येऊन स्वत:च्या जनेंद्रिया हलवत त्या वाघाची अवहेलना करतो.

तीच परिस्थिती माझ्या देशातल्या इमानदार, कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळे, इमानदार व्यापारी, उद्योगपती यांची आज झाली आहे. आम्ही नोटबंदीच्या निर्णयाचं स्वागत केलं, आम्ही म्हटलंही काळ्या पैशावाल्यांना झोप येणार नाही, आम्ही मात्र निवांत झोपू, परंतु अर्थव्यवस्थेची घडी जेवढ्या गतीने बसायला हवी होती तेवढ्या गतीने ती बसली नाही किंवा सरकारला ती बसविता आली नाही. याचं कारण शोधणंही गरजेचं आहे. एवढा मोठा निर्णय घेऊन देशाला आर्थिक गोंधळात टाकून, व्यवहार ठप्प ठेवून यातून चांगलं घडलच नाही, तर मग या दोन महिन्याच्या कालखंडात देशातल्या 125 करोडपैकी शंभर करोड सर्वसामान्य लोकांना जो त्रास झाला त्याचं देणं कोण देणार? त्या पापाचे भागिदार कोण होणार? आज जी परिस्थिती आहे, नोटबंदीच्या ऐतिहासिक दृष्टीने सर्वसामान्य सहन करण्याच्या मानसिकतेत आहेत परंतु यातून अघटीत घडलं आणि सहनशीलतेचा बांध फुटला तर त्या परिणामांना सामोरे जाण्यास देशाला परवडेल काय? आज या निर्णयामुळे देशात जी परिस्थिती निर्माण झाली ती परिस्थिती सावरण्याचं काम जेव्हा मोदी करतील आणि सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसांना या दोन महिन्याच्या कालखंडात झालेल्या त्रासाचा मोबदला महागाई कमी करून शिक्षण, आरोग्य आणि देशवासियांच्या मुलभूत गरजा पूर्ण करून जेव्हा देतील तेव्हा नोटबंदी ही सर्वसामान्यांसाठी चांदी दिसेल.

— गणेश सावंत
ganesh.sawant4@gmail.com

Avatar
About Guest Author 523 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..