एक जुनी आठवण
डॉ. भगवान नागापूरकर याना मातृशोक
जीवनाच्या रगाडयातून ह्या मराठी ब्लॉगचे लेखक – डॉ. भगवान नागापूरकर यांच्या मातोश्री ति. लक्ष्मीबाई केशवराव नागापूरकर यांचे नुकतेच निधन झाले. मृत्यु समयीं त्या औरंगाबादीं होत्या. सर्व मुले मुली नातवंड पतवंड सख्येनातेसंबंधी, मित्रपरीवार ह्यांच्या प्रचंड उपस्थितीने त्याना शेवटचा निरोप दिला. अतिशय शांत आणि धीरोदात्त वातावरणात त्यानी शेवटचा श्वास घेतला. त्याना शेवटपर्यंत कोणतीही व्याधी जडलेली नव्हती. जीवनाचे शतक अर्थात १०० वर्षे पूर्ण करीतच त्यानी सर्वांचा निरोप घेतला. जीवनांत त्यांचे व त्यांचे पति कै. केशवराव नागापूरकर यांचे सामाजिक कार्य महान होते. मृत्युनंतर त्यांची नोंद अनेक दैनिकांनी घेत संपूर्ण बातमी वर्तमान पत्रांत दीली. त्याच प्रमाणे स्थानिक लोकसभा सदस्य माननिय श्री. चंद्रकांत खैरै ह्यानी व्यक्तीशः सांतवनपर संदेस दिला. अनेक प्रतिष्ठीत व्यक्ती , समाजसेवक, नगरसेवक यांनी येऊन नातेवाईकांचे सांतवन केले.
कै. ति. लक्ष्मीबाई केशवराव नागापूरकर ह्यांच्या संबंधी एक लिखान त्यांचीच लहान मुलगी, लेखक साहित्तीक, उच्य शिक्षीत सौ. सुलोचना कुलकर्णी हीने पाठवले आहे. ते येथे सामान्यासाठी देत आहे.
माझी आई लक्ष्मीबाई उर्फ ठकुताई
‘ स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ‘ आमची आई आम्हाला सोडून गेली आणि खऱ्या अर्थाने वरील वाक्याची प्रचिती आली. आई म्हणजे प्रेम, त्याग, वात्सल्य, करुना, यांचे मुर्तीमंत रुप आहे. आज मात्र सर्व भावंडे खऱ्या अर्थाने पोरके झाले.
माझी आजी आणि आजोबाना वाटले की, आपल्याला मुलगाच होणार, पण मुलगी झाली. माझ्या आईने सर्वाना ठकविले म्हणून तिचे नांव ‘ ठकु ‘ असे ठेवण्यांत आले. अर्थात हे घरांतले. खरे नांव होते लक्ष्मीबाई. लहानपणापासून अतिशय हूशार, चाणाक्ष, आणि कर्तव्यदक्ष आशी माझी आई होती. खेड्यांत बालपण गेले. १०० वर्षा पूर्वीचा काळ होता तो. शिक्षण फक्त चौथी पर्यंत झाले. प्रकृती अतिशय उत्तम होती. लहानपणीच धावपळ, घोडदौडसुद्धा, खेड्यामधले शारिरीक खेळ व व्यायाम ह्यात प्राविण्य मिळवले. सावळा रंग परंतु अतिशय बांधेसुद शरीर यष्टी लाभली होती. घरची लाभलेली वडीलोपार्जीत श्रीमंती. सर्वांत महत्वाचे म्हणजे लक्ष्मीबाईचे अर्थात ठकुचे नशिब फार बलवत्तर होते. तीला तरुण तडफदार शिक्षीत भव्य व्यक्तीमत्वाचा सहकारी मिळाला. त्यानी पुढे शासकिय सेवेत मराठवाड्यांत प्रचंड नांव लौकीक कमविले. त्यांचे नांव होते कै. केशवराव कुलकर्णी नागापूरकर. ते डेप्युटी कमिशनर म्हणून औरंगाबाद येथे कार्यारत होते.
एक फार जुनी घटना आठवली. मी ऐकलेली. पासष्ट वर्षापूर्वीची असावी.माझे वडील बिड जिल्ह्यातील माजलगांव येथे तहसीलदार ( मामलेदार ) म्हणून होते. गांवाच्या जवळून सिंदफना ही नदी वाहते. नदीला प्रचंड पूर आला होता. पाण्याने सर्व गावाला वेढा दिला होता. पाणी गांवात शिरले. कित्येक घरे पाण्यांत बुडू लागली. लोकांचे संसार उध्वस्त होऊ लागले. पाण्याची पातळी वाढण्याचे कांही केल्या थांबेना. आमचे घर आमच्या नशिबाने उंच टेकडीवर होते. परंतु एका स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्याचे घर, प्रचंड लोकांची गर्दी मदतीची अपेक्षा करित तेथे जमा झाली. तेथील जमलेल्या अनेक स्त्रीया माझ्या आईशी परिस्थीतीची चर्चा करु लागल्या. वादळ, वारा, पाऊस आणि पूर ह्यानी सर्व रहवाशी हैरान झाले होते. कोणताच मार्ग सुचत नव्हता. अशावेळी माणस ईश्वराचा आसरा घेतात. माझी आई सर्वाना घेऊन नदी किनारी गेली.
भक्तीभावाने तिची खणा नारळाने ओटी भरुन पुजा केली. सरीता देवीस शांत होण्याची प्रर्थना केली. सारेजण तेथेच बसून होते. चार तासांत दैवी चमत्कार झालेला दिसू लागला. पाणी प्रचंड वेगाने ओसरु लागले. गावांतील मंडळीना त्याक्षणी आमच्या आईत एक दैवी शक्ती असल्याचे भासले. एक वेगळाच मान तीला मिळू लागला. सकाळी पाणी खूपच ओसरले होते.
अंबेजोगाइला माझ्या आई-वडीलांच्या प्रयत्न्याने पहीली कन्या शाळा स्थापीली गेली. शाळेच्या पायाभरणी समारंभ माझ्या आईच्याच हस्ते झाला. आजही तेथील एका सभागृहाला त्यांचे नांव दिले गेले आहे.
खूप वर्षापूर्वीची एकलेली गोष्ट आठवली. गुलबर्ग्याला भारताचे पहीले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु आले होते. एका मोठ्या Project उभारणीचा पायाभरणी समारंभ होता.
तीन स्त्रीयांनी तीन रंगाच्या ( लाल-पांढरा-हीरवा ) वेगवेगळ्या नऊवारी साड्या परीधान केल्या होत्या. तीघीनी प. जवाहरलाल नेहरुना औक्षण करुन त्यांचे स्वागत केले गेले. ह्यांत माझ्या आईचा प्रमुख सहभाग होता. प. नेहरुनीही हात ऊंचावून आशिर्वाद दिले. तिच्या आयुष्यातील हा क्षण अत्यंत आनंदाचा होता.
माझे आजोबा (आईचे वडील) लवकर वारले. त्यामुळे छोट्या भावाची ( माझ्या मामांची ) सर्व जबाबदारी तिने पार पाडली. आपल्या मुलापैकी एक समजून त्याचा सांभाळ केला. बंधूप्रेम काय असते हे आम्ही तिच्याकडून शिकलो.
आमचे नागापूरकर कुटूंब हे एकत्र होते व आजही आहे. त्यामुळे घरामध्यें दीर, नणद, जावा, यांचे सर्वांचे संबंध अतिशय जीव्हाळ्याचे होते. आमच्या आईचे दोनही काकांवर खूप प्रेम होते. काकांनी मोठ्या वहीनीवर तितकेच प्रेम केले. आईला कधी अंतर दिले नाही. धाकट्या जावांवर बहीणीसारखे प्रेम होते. कंटाळा वा कामचुकारपणा हे शब्द तिच्या शब्दकोशांतच नव्हते. ती म्हणायची काम केल्यानी शरीर निरोगी राहते. त्यातूनच आपल्याला उर्जा मिळत असते. तिने तीच्या दोनही नणदेवर खूप प्रेम केले. तिच्यामते ‘सासर आणि माहेर’ हे तराजुचे दोन पारडे आहेत. त्याचा समतोल राखला पाहीजे.
‘ एकीकडे प्रेम आणि दुसरीकडे लोकेशन ‘
एकंदरीत तिच्या जीवनाचा प्रवास खुपच सुखांत, एश्वर्यांत झाला. शेवटपर्यंत लक्ष्मीने तिला साथ दिली. ती नुसतीच लक्ष्मीबाई नव्हती तर ‘ भाग्यलक्ष्मी ‘ होती. तिच्या मुलांनीही तिच्यावर खऱ्या अर्थाने प्रेम केले. सुनानी तिचा शब्द ‘ प्रमाण ‘ मानला जाई. डॉ. भगवान व डॉ. सौ. शालिनीवहिनीने तिला विमानातून यात्रा करुन आणली. सौ. पुष्पा वहिनी व सदूभाऊनी ‘ पुंडलीकासारखी ‘ सेवा केली. नातु जीवन व नात जयश्री तिचा शब्द झेलावयास सदैव तयार असत. नुकताच एक नातु चि. रवी ( अमेरिकेत स्थायिक ) पत्नी सौ. दिप्तीसह येथे आला व त्याने दोन मुलांच्या मौंजी पणजीच्या आशिर्वाद छायेत पार पाडल्या. शेवटच्या काळांत तिची लहान बहीण अर्थात चंदामावशी हीने तिची खूप सेवा केली.
खऱ्या अर्थाने ती भाग्यवान होती. सर्व पणतु चि. सार्थक, आदित्य, आणि आकाश ह्यांचा जन्मप्रसंगी ‘ सुवर्ण फुले वाहण्याचा ‘ धार्मिक कार्यक्रम सर्व नातेसंबंधाच्या उपस्थितीत पार पडला. तिचा
‘ सहस्र चंद्रर्शन ‘ हा कार्यक्रम देखील तिच्यांत आनंद व समाधान देऊन पार पडला. तिने नुकतेच जीवनाचे शतक अर्थात शंभर वर्षे पूर्ण केले होते. निसर्गाने मानव योनीसाठी जीवनाची जी शतकपुर्ती मर्यादा देऊ केलेली आहे, तीचा तिने हिम्मत आणि कष्टाने आदर केला. ती पूर्ण करुन त्या निर्सगाचा , त्या ईश्वराचा सन्मान केला. तिने जीवन सार्थकी घातले.
आमच्या सर्व परिवारातर्फे ती. आईला श्रद्धांजली अर्पण करते. ‘ परमेश्र्वर तिच्या आत्म्यास शांती देवो. ‘
आई तूझ्या प्रेमाची सदैव ऋणी
सौ. सुलोचना कुलकर्णी
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
Leave a Reply