‘आई, बाबा! हे पत्र जरूर जरूर वाचा!‘ स्थळ- आईचे महन्मंगल गर्भस्थान वेळ- २१ व्या शतकातील पहिली पहाट माझ्या प्रेमळ आईस,
माझे हे छोटे पत्र जरूर वाच. मी या क्षणी खूप आनंदात आहे.
मी ईश्वराला प्रार्थना करते की, माझ्या आईला खूप आनंदात व कुशल ठेव. आई, मी एक सनसनाटी बातमी वाचली आहे. तुझ्या गर्भात एका मुलीचा जीव वाढत आहे, ही बातमी तुला समजली आहे आणि नऊ महिने भरण्याच्या आत माझी हत्या करून तू मला या निष्ठूर धरतीवर फेकून देणार आहेस.
काय आई, हे खरे आहे? माझा तर या गोष्टीवर विश्वासच बसत नाही. माझी आई हे निष्ठूर कर्म करणार नाही. ती आपल्या गर्भातील एका नाजूक देहावर सुर्या-कात्र्यांचे घाव कसे सहन करील? हे मुळीच शक्य नाही! काय आई, मी खरं बोलत आहे ना? आई, तू फक्त एकदाच सांग की, हे सर्व खोटे आहे. मग माझ्या इवल्याशा धडकणार्या हृदयाला शांती मिळेल. मी हे सर्व ऐकून खूपच घाबरले आहे.
आई, माझे हे हात किती इवल्याशा पानाप्रमाणे आहेत! तू क्लिनिकमध्ये जाताना मी तुला अडवून तुझा पदरसुद्धा ओढू शकणार नाही. माझे हातसुद्धा किती छोटे आहेत. या छोट्या गवताच्या लुसलुशीत निर्बल हाताने तुझ्या गळ्याभोवती वेढासुद्धा टाकू शकणार नाही. मी तुला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. मला भीती वाटते की, माझ्या आसपास ते विषारी औषध टोचतील. मी एखाद्या निसरड्या साबणाप्रमाणे तुझ्या शरीरापासून दूर बाहेर फेकली जाईल. नाही. आई, असे मुळीच करू नकोस! माझा आवाजसुद्धा किती बारीक आहे! माझी प्रार्थना किंवा फिर्यादसुद्धा मी बाबांकडे पोहचवू शकणार नाही. मी फक्त हे पत्र तुलाच लिहीत आहे. प्लीज आई, हे पत्र जरूर वाच.
माझे एवढे ऐक आई! मला जगायचे आहे. मला तुझ्या अंगणात इवल्याशा पावलांनी नाचायचे आहे! मला तू खेळणी घेऊ नकोस, ताईचे जुने कपडे मी घालेन. मला नवे कपडे नको आहेत.
मी ही जमीन, आकाश, चंद्र, तारे तर पाहू शकेन! ते तर चिरंजीव आहेत ना आई? मी तुझी मुलगी आहे. तुझ्या लाडाची राणी! मला तुझ्या घरात उतरू दे! स्कॅंनिग करताच तुझे हात-पाय का कापू लागले आहेत. मुलगा असता तर तू वाढवला असतास आणि मुलगी असती तर तू नकार दिला असतास? नाही. आई, नाही! मी तुझ्यावर भार होऊन जगणार नाही. माझ्या लग्नाच्या हुंड्यावरून जर तू हा निर्णय घेत असशील तर तो चुकीचा आहे. तू स्वतःच स्वतःला फसवू नकोस, आई! काहीतरी मार्ग शोध. तू असे का नाही करत, की भय्याच्या लग्नाकरिता एखादी गरीब कुटुंबातील मुलगी शोध व तिला सर्व आनंद बहाल कर. सर्वच बायका असे का करीत नाहीत? त्यांनासुद्धा मुली आहेत. ज्याप्रमाणे त्या मुलांचा सांभाळ करीत आहेत, त्याप्रमाणे मुलींचा सांभाळ का करीत नाहीत? हे मला बिलकूल पटत नाही, की स्वतःच्या मुलीचा जन्माअगोदर बळी घ्यायचा व मुलांच्या लग्नात हुंड्यासाठी अडून बसायचे. ही स्वतःची फसवणूक आहे. देवाघरी न्याय आंधळा नसतो.
आई, एक लक्षात ठेव- मुलासाठी जेवढ्या गर्भांची तू हत्या करशील, तेवढे पाप त्या मुलाच्या भाळावर लिहिले जाईल. हे पापाचे ओझे घेऊन तो कसा जगेल? आई, तू पापी बनू नकोस, तू थोडी हिंमत दाखव, थोडी हिंमत मी करेन. मी माझ्या पायावर उभी राहीन. माझ्या हातावर मेंदी रंगेल. मीसुद्धा सात फेरे घेऊन तुझ्या अंगणातून माझा पिंजरा घेऊन उडेन…
तू मला आताच असे उडवून लावू नकोस… कदाचित या जगात मी महान कार्य करून दाखवेन.
मी तुझ्या प्रेमाचे बीज आहे. मला तुझ्या पोटी जन्म घेऊ दे! या फुलाला फुलू दे, आई! हे बघ- मी नाजूक, कोवळ्या हातांनी तुला विनवणी करते. मला समजून घे. मला वाचव, आई! आता पपा येतीलच तुला क्लिनिकमध्ये घेऊन जाण्यासाठी! तू त्यांना नकार दे! माझी शप्पथ आहे तुला! त्यांना तू समजावून सांग! माझी हत्या करण्यासाठी कोठेही जाऊ नकोस! त्यांनी तुला क्लिनिकला नेलेच बळजबरीने, तरीसुद्धा तू परत घरी निघून ये, आई! मी इवलासा श्वास घेऊन जगत आहे. माझे जीवन तू हिसकावून घेऊ नकोस! मला निर्दयपणे मारू नकोस आई! आई, हे तू कधीच करू नकोस!
न जन्मलेली कन्या!
— विजय प्रभाकर नगरकर
Leave a Reply