१९९२ पासून जागतिकीकरण व खुल्या अर्थव्यवस्थेचे वारे वाहू लागल्यावर भारतीय अर्थव्यवस्था अतिशय वेगाने शेतीप्रधानतेकडून उद्योगप्रधानतेकडे वाटचाल करू लागली आहे. आज भारतात शेती व्यवसायानंतर मोठ्या प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध करून देणारे दुसर्या क्रमांकावरील क्षेत्र म्हणजे सूक्ष्म, लघु व मध्यम ( “सुलम”- MSME )उद्योगक्षेत्र. देशाच्या निर्यातीत ४०% हून अधिक सहभाग,४५% हून अधिक उत्पादन, सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP ) सुमारे ८% असा सिंहाचा वाटा अशी नेत्रदीपक आकडेवारी असलेल्या सुलम उद्योगाचे महत्त्व जाणून या क्षेत्राच्या विकासासाठी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्यम विकास कायदा २००६ – MSMED Act पारित करण्यात आला व स्वतंत्र मंत्रालय,राष्ट्रीय MSMED बोर्ड व स्वतंत्र विकास आयुक्तालय स्थापन करण्यात आले व अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेत.. २००९ च्या आकडेवारी नुसार आज देशभरात १५ लाखाहून अधिक नोंदणीकृत उद्योगासह सुमारे २ कोटी ४५ लाख सुलम उद्योगआहेत व ते सुमारे ६ कोटी ४० लाख लोकांना रोजगार देत आहेत.
विकसनशील देशात ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे होणारे स्थलांतर हा विकास प्रक्रियेचा अपरिहार्य भाग आहे.आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणार्या उज्वल भविष्याची स्वप्नं उराशी बाळगीत ही युवाशक्ती शहराकडे धाव घेते.अशा स्थलांतरित तसेच शहरी युवाशक्तीला मनाजोगते काम मिळतेच असे नाही ,तरीही खेड्यात राहून शेतावर मोल मजूरी करण्यापेक्षा शहरात निश्चित व जादा रोजगार मिळण्याची शक्यता व शहरातील चंगळवादी जीवनशैलीचे नैसर्गिक आकर्षण यामुळे हा ओघ थांबवता येणे अशक्य आहे.
अशा अर्धशिक्षित व अप्रशिक्षित युवकांना सरकारमान्य पदवी, पदविका अथवा अनुभव नसल्याने कुठल्याही खाजगी किंवा सार्वजनिक क्षेत्रातल्या मोठ्या उद्योगात नोकरी मिळू शकत नाही.एसेस्सी म्हणजे माध्यमिक शिक्षण देखिल पुरे नसल्याने पदविका किंवा तंत्रशिक्षण संस्थेत प्रवेश मिळणे अशक्य असते.अशा युवकांना शहरात सामावून घेत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतात ते “सुलम” उद्योग.
याशिवाय नामवंत उच्च शिक्षण संस्था व महाविद्यालयांना सोडून इतर महाविद्यालयांच्या – कुठलाही अनुभव नसलेल्या स्नातक , पदविका धारक तरुणांना, कुठलीही मोठी कंपनी काम देत नाही. याचे कारण तौलनिक बुध्यांक कमी असल्यामुळे प्रशिक्षण देऊनही अशा तरुणांची कायम स्वरूपी ठेवण्या योग्य प्रगती होण्याची खात्री नसते. या दोन्ही प्रकारच्या तरुणांना “सुलम” उद्योग मात्र सामावून घेतात व विविध खात्यांमधून शिकण्याच्या संधी देतात.
आज अशा अननुभवी तरुणांना कामावर ठेवल्यास त्यांना कामगार विमा योजना, किमान वेतन कायदा, भविष्य निर्वाह निधी इ. सर्व कायद्याखाली नोंदणी करावी लागते व एकंदर ६४ कायदे लागू होतात. प्रमाणित अर्हता असली तरी शिक्षणाचा दर्जा घसरला असल्यामुळे विषयाचे किमान अपेक्षित ज्ञान देखील नसते.ज्ञानात भर घालावी लागते व काम शिकवावे लागते. एवढे करून एकीकडे तुलनेने कमी हुशार तरुण नको असले तरी नुकसान भरपाई दिल्याशिवाय काढता येत नाहीत. दुसरीकडे हुशार तरुण सुलम क्षेत्रातील पगार तुलनेने कमी असल्यामुळे येत नाहीत किंवा आलेत तरी विशिष्ठ कामात प्रशिक्षण पुरे होऊन प्राविण्य मिळाले की एक दीड वर्षात मोठ्या कंपनीत – मोठी पगारवाढ घेऊन निघून जातात.त्यांना दिलेले शिक्षण,नवशिकेपणामुळे झालेले नुकसान, भरलेले विविध फॉर्म्स, भरलेले ESIC / PF चे पैसे, दिलेला पगार इ. सर्व वाया जाते. सुलम उद्योजकाला पुन्हा Hire-train-loose लोक घेणे, त्यांची नोंदणी, शिक्षण इ. चे दुष्टचक्र नव्याने सुरु करावे लागते.व त्याची शाळा होऊन बसते.
सुलम उद्योगातील प्रशिक्षणात भरपूर प्रात्यक्षिकाचा अनुभव मिळाल्याने ते जास्त उपयुक्त व परिणामकारी ठरते व थोड्या अवधीत प्राविण्य मिळविता येते.ITI मध्ये २ वर्षाचा कोर्स करून वेल्डिंग येत नाही पण सुलम उद्योगात कार्यानुभव घेऊन उत्तम दर्जाचा क्ष – किरण प्रमाणित वेल्डर बनता येते ही वस्तुस्थिती आहे.
या साठी नवा अननुभवी कामगार कायदा आणून त्या अंतर्गत सुलम उद्योगाला दोन वर्षासाठी किमान वेतनाच्या अनुक्रमे ७०% व ८०% विद्यावेतनावर अननुभवी तरुणांना प्रशिक्षणार्थी म्हणून ठेवण्याची मुभा द्यावी. आयकरात या विद्यावेतनाच्या दुप्पट वजावट द्यावी.दोन वर्षे पूर्ण झाल्यावर कायम स्वरूपी काम द्यावे किंवा स्वीकारावे याची प्रशिक्षणार्थी व कंपनी दोघांनाही मुभा असावी. असे प्रशिक्षणार्थी कामगार कायद्यांच्या कक्षेबाहेर असावेत व त्यांना विद्यावेतन व अपघात विमा या शिवाय कुठलेही इतर कायदे अथवा भत्ते लागू करण्याचे बंधन नसावे.लघुउद्योजक संघटनातर्फे विविध व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम ठरविण्यासाठी समिती नेमावी व तज्ञांकडून विषयाचा आवश्यक तो अभ्यासक्रम पुरा करावा. व दोन वर्षाच्या शेवटी परीक्षा घेऊन अनुभवाचे प्रमाणपत्र द्यावे.
क्लिष्ट फॉर्म्स व जाचक कायद्यांचा त्रास नसल्याने व कायम स्वरूपी कामावर घेण्याचे बंधन नसल्याने सुलम उद्योग अनेक तरुणांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यास उद्युक्त होतील.अननुभवी तरुणांना प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील व या क्षेत्रात सुमारे ६० लाख नवीन रोजगार उपलब्ध होईल.
पुरुषोत्तम आगवण
मानद सचिव
कोसिया
चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन्स
Leave a Reply