जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग ९२ ; आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक ११
जे जे देवासाठी ते ते देहासाठी – भाग ४९
एक इंदुरी म्हण आहे,
पानाला चुना लावावा उणा,
कात घालावा दुणा,
सुपारी घालावी थोडी,
विड्याची चाखावी गोडी.
त्रयोदशगुणी विडा म्हणजे नेमका काय ? हे तेरा गुण कोणते ते चार ओळीत सांगितले आहेत.
ताम्बूलकटुतिक्तमुष्णमधुरं क्षौरं कषायान्वितं ।
वातघ्नंकृमिनाशनं द्युतिकरं दुर्गन्धनिर्नाशनम् ।
वक्त्रस्याभरणं विशुदिकरणं कामाग्निसंदीपनम ।
ताम्बूलस्य सखे त्रयोदशगुणाः स्वर्गेऽप्यमो दुर्लभम् ।।
विडा हा चवीने 1तिखट, 2कडू, 3मधुर, 4क्षारीय, 5तुरट या चवींचा असतो. म्हणजे फक्त अम्ल रस नाही. बाकी सर्व रस यामधे आहेत.
परिणामाने 6 उष्ण असून 7वातनाशक 8 कृमीनाशक आहे. 9 अग्नि किंवा तेज वाढवणारा, तसेच 10 तोंडाची दुर्गंधी कमी करणारा आहे. मुखाचा जणु काही दागिनाच म्हणजे 11 चेहेऱ्याचे सौंदर्य वाढवणारा, (विडा सतत चावल्याने चेहेऱ्याचे सर्व स्नायु कार्यक्षम होतात, आणि चेहेऱ्याच्या सुरकुत्या कमी होतात, असे संशोधन परदेशात झाले आहे. म्हणून त्यांनी च्युईंगगम शोधून काढली असावी. त्यांच्या संस्कृती मध्ये विड्याचे पानच नाही ना! काय करणार !!! ) 12 स्रोतसांची शुद्धी करणारा, म्हणजेच आतील चिकट पदार्थांना सोडवणारा आणि 13 कामभावना वाढवणारा आहे.
हे तेरा गुण पानामधे असतात.
पान कसे खावे याचेही एक शास्त्र आहे. पानामधे सर्व मसाला घालून तो चावावा आणि पहिली पिंक टाकून द्यावी. दुसऱ्या वेळी चावून आलेली पिंक देखील टाकूनच द्यावी. पहिली पिंक ही विषाप्रमाणे, दुसरी पिंक रोग निर्माण करणारी असते. त्यानंतर येणारा पानाचा रस हा अमृताप्रमाणे असतो. नंतर हे पान सावकाश चघळीत राहावे आणि या अमृतरसाचे पान करीत रहावे. याने आरोग्य वाढते.
भरद्वाज मतानुसार विद्वान मनुष्याने दिवसा भोजन झाल्यावर चार वेळा, आणि सायं भोजनानंतर दोन वेळा असा सहा वेळा विडा भक्षण करावा. हे उत्तम प्रमाण जाणावे.
स्वर्गात देखील असे पान दुर्लभ आहे ते खाण्यासाठी देवतांना देखील पृथ्वीवर यावे लागते. विष्णुरूप मानलेल्या नवऱ्याला रूखवत झाल्यानंतर असा विडा देऊन लग्नाला उभे करण्याची पद्धत आहे.
विडा देणे हा मान आहे. घरात आलेल्या पाहुण्यांचे स्वागत पानाचे तबक देऊन करण्याची आपली आरोग्यदायी भारतीय परंपरा होती. आता पाहुण्यांचे स्वागत विदेशी आणि विषारी कोल्ड्रींक्स पाजवून केले जाते. कलियुग म्हणतात ते हेच !
पैजेचा विडा वगैरे शब्द आपल्याला प्रचलीत असतीलच. छत्रपती शिवाजीराजांना पकडून आणण्यासाठी अफजल्ल्याने उचललेला पैजेचा विडा आपल्या लक्षात असेलच ! असा आत्मघातकी विडा उचलण्यापूर्वी अनेक वेळा विचार करावा, हे आपल्या लक्षात आणून देण्यासाठी लिहिले आहे.
कोणतेही शुभकार्य करत असताना देवाला देखील मानाचा विडा द्यायची श्रद्धा आहे. त्यामागे असलेले आरोग्याचे तेरा संदेश मात्र ओळखता यायला हवेत. पाश्चात्य बुद्धीने विचार केलात तर मात्र तीन तेरा वाजलेच म्हणून समजा !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
12.07.2017
Leave a Reply